Hardik Pandya on Mumbai Indians: हार्दिक पंड्याशी संबंधित ऐतिहासिक कराराबद्दल दिवसेंदिवस वेगवेगळी माहिती समोर येत आहेत. पंड्या गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये जाण्याच्या अफवाही चाहत्यांमध्ये होत्या. त्याला मिळणार्‍या फीपासून ते कर्णधार बनवायचे की नाही, यावर चाहते आणि माजी क्रिकेटपटूही आपली मते मांडत आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत यांनी हार्दिक पंड्याच्या कराराबाबत आणखी एक पैलू मांडला आहे. माजी भारतीय कर्णधाराने पंड्याच्या मुंबई इंडियन्समधील हस्तांतरणाचा जसप्रीत बुमराहशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, “ हार्दिकच्या येण्याने जसप्रीत बुमराहचे मुंबई संघातील स्थान धोक्यात आले आहे.”

आपल्या यूट्यूब चॅनलवर श्रीकांत यांचा मुलगा अनिरुद्धबरोबर बोलताना, नुकत्याच झालेल्या कराराबद्दल श्रीकांत यांनी सूचक विधान केले आहे. ते म्हणाले की, “वेगवान गोलंदाज बुमराह रोहित शर्मानंतर एमआयचा पुढचा कर्णधार होण्याची आशा बाळगत होता, पण पंड्याच्या येण्याने त्याची ही संधी गेली आहे.

श्रीकांत म्हणाले की, “तो (बुमराह) जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. कसोटी असो वा टी-२०, एकदिवसीय क्रिकेट. त्याने विश्वचषकात भारतासाठी दुखापत बाजूला ठेवत शानदार कामगिरी केली. २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या ५व्या कसोटीत तो भारताचा स्टँड-इन कर्णधार होता. त्याला हार्दिकच्या येण्याने नक्कीच वाईट वाटत असणार. याला तुम्ही राग, अहंकार म्हणू शकता. त्याला वाईट वाटले असेल असे म्हणणे योग्य आहे कारण, रोहित शर्मानंतर तोच मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला असता.”

हेही वाचा: IND vs SA: पुजारा-रहाणे यांना कसोटी संघात स्थान मिळेल की BCCI नव्या चेहऱ्याला संधी देईल? जाणून घ्या

श्रीकांत पुढे म्हणाले, “बुमराह कदाचित असा विचार करत असेल की मी इतके दिवस संघासाठी मेहनत करत आहे आणि तुम्ही माझा विश्वासघात केला. ज्याने आधी संघ सोडला आणि आता पुनरागमन करत आहे, त्यालाच तुम्ही कर्णधार करणार. कदाचित हार्दिकला कर्णधारपद मिळणार असल्याने त्याचा मुंबई इंडियन्समध्ये समावेश करण्यात आला. यामुळे बुमराहला असे वाटते की, गोष्टी त्याच्यासाठी योग्य झाल्या नाहीत.”

श्रीकांत पुढे म्हणाले की, “संघ व्यवस्थापन (एमआय) रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांच्यात बसून गोष्टी सोडवेल.” बुमराहचे कौतुक करताना, श्रीकांत यांनी सोशल मीडियावरील जसप्रीत बुमराहच्या गूढ पोस्टचा संदर्भ देत असा अंदाज लावला की, “हार्दिकच्या मुंबई इंडियन्समधील हस्तांतरण करारामुळे वेगवान गोलंदाज नाराज झाला होता.”

हेही वाचा: Rahul Dravid Coach: राहुल द्रविडला टीम इंडियाचा पुन्हा प्रशिक्षक करण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जसप्रीत बुमराहची ‘मौन’ पोस्ट

हार्दिक पंड्याने फ्रँचायझीमध्ये परतण्याची घोषणा केल्यानंतर एक दिवस, जसप्रीत बुमराहने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामुळे तो हार्दिकच्या पुनरागमनामुळे नाराज असल्याची अंदाज बांधला जात होता. जसप्रीत बुमराहने त्याच्या अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आणि लिहिले, “कधीकधी मौन हे सर्वोत्तम उत्तर असते.”