४३ वर्षीय पेस नदालकडून शिकण्यासाठी उत्सुक

सतत नवनवीन तंत्र शिकण्याची इच्छाशक्ती असेल, तर खेळाचा आनंद घेता येतो, हे लक्षात घेऊनच मीदेखील राफेल नदाल याच्याकडून शिकण्यासाठी उत्सुक आहे, असे भारताचा टेनिसपटू लिएण्डर पेसने सांगितले.

४३ वर्षीय पेसने कारकीर्दीत आतापर्यंत १८ ग्रँड स्लॅम विजेतेपदे मिळवली आहेत. स्पेनविरुद्ध येथे १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान डेव्हिस चषक लढत होणार आहे. या लढतीमधील दुहेरीच्या सामन्यात पेस हा रोहन बोपण्णाच्या साथीने खेळणार आहे. साकेत मायनेनी व रामकुमार रामनाथन हे एकेरीत खेळणार आहेत. स्पेन संघाकडून नदाल व जागतिक क्रमवारीतील १३वा मानांकित खेळाडू डेव्हिड फेरर हे एकेरीचे सामने खेळणार आहेत. दुहेरीत फ्रेंच विजेते मार्क व फेलिसिआनो लोपेझ हे प्रतिनिधित्व करीत आहेत.

‘‘वय वाढले तरी शिकण्याची वृत्ती कमी होत नाही. नदाल हा महान खेळाडू आहे. त्याच्या खेळातील नजाकत व शैली पाहत राहावी असेच वाटत असते. त्यामुळेच मी जरी ३० वर्षे खेळत असलो, तरी नदालकडून मला खूप काही शिकायला मिळणार आहे. आक्रमक खेळ करण्यासाठी आवश्यक असलेले पदलालित्य, ताकद, लवचकिता या सर्व गुणांबाबत तो माहीर आहे,’’ असे पेसने सांगितले.

‘‘स्पेनचा संघ व्यावसायिक वृत्तीचा संघ आहे. ते डेव्हिस चषक स्पर्धेत सांघिक कौशल्याचा सुरेख प्रत्यय दाखवीत असतात.  पॅरिस मास्टर्स स्पर्धेत गतवर्षी मला त्याच्याबरोबर खेळण्याची संधी मिळाली होती. माझ्यासाठी तो संस्मरणीय क्षण होता,’’ असे पेसने सांगितले.

तो पुढे म्हणाला, ‘‘टेनिसचा तो महान सदिच्छादूत आहे. त्याचे फोरहँडचे फटके पाहण्याजोगेच असतात. जागतिक प्ले-ऑफ गटाचा सामना घरच्या मैदानावर होणार आहे, ही भारतासाठी फायदेशीर बाजू आहे.  . डेव्हिस चषक स्पर्धा म्हणजे शिकवणीची शिदोरीच असते,’

विद्युतप्रकाशात खेळण्याचा निर्णय योग्यच -पेस

डेव्हिस चषक सामने विद्युतप्रकाशात घेण्याचा निर्णय दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनने घेतला आहे. भारतीय संघाचे न खेळणारे कर्णधार आनंद अमृतराज यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र पेसने या निर्णयाचे समर्थन केले आहे.  तो म्हणाला, ‘‘दक्षिण कोरियाविरुद्धच्या लढतीत घरच्या मैदानावर परंतु कडक उन्हात खेळताना भारतीय खेळाडूंना खूप त्रास झाला होता. त्यामुळे विद्युतप्रकाशात सामने घेण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. नदाल व फेरर यांच्यासारख्या महान खेळाडूंना कोणत्याही मैदानावर व कोणत्याही प्रकाशात खेळताना फारशी अडचण येत नाही.’’