पुण्यात अलीकडेच ६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत नांदेडच्या शिवराज राक्षेनं सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला हरवत मानाची गदा पटकावली. हा सामना पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. पण हा सामना पाहण्यासाठी शिवराज राक्षे यांचे वडील उपस्थित नव्हते. ते का उपस्थित नव्हते यांचं मन जिंकणारं कारण राक्षे याने सांगितलं आहे.

खंर तर, शिवराज राक्षे हा शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. त्याच्या घरी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो. त्यामुळे त्याच्या घरी काही दुभती जनावरं आहेत. या जनावरांसाठी सतत घरी कुणी ना कुणी थांबणं आवश्यक असतं. याच कारणामुळे वडील महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना पाहायला आले नाहीत, असं उत्तर शिवराज राक्षेनं दिलं. तो ‘एबीपी माझा’च्या एका मुलाखतीत बोलत होता.

एकेकाळचे कुस्तीपटू असलेले वडील महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना पाहायला आले होते का? असं विचारलं असता शिवराज म्हणाला, “आई आणि वडील दोघंही कुस्तीचा अंतिम सामना पाहायला आले नव्हते. दोघंही घरीच होते. आमचा दुधाचा व्यवसाय आहे. त्यामुळे एवढी मुकी जनावरं सोडून आई-वडिलांना कुठेही जाता येत नाही. त्यामुळे ते पहिल्यापासून कुस्ती पाहायला आलेच नाहीत. एरवीही कुस्ती पाहायला वडील येत नाही. सामन्याच्या ठिकाणी केवळ माझा भाऊ येतो. कारण घरची जनावरं सांभाळण्यासाठी घरी कुणीतरी एक माणूस हवाच असतो.”

हेही वाचा- Maharashtra Kesari 2023: “माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सपण नाही…”, भेट मिळालेल्या महिंद्रा ‘थार’ विषयी शिवराजने केली मिश्कील टिप्पणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“घरची सर्व कामं उरकली की माझे वडील कुस्ती पाहतात. माझ्यासह इतर सर्व मल्लांची कुस्ती ते पाहतात. त्यावरून ते अभ्यास करतात. याची माहिती सतत मला फोनवरून देत असतात. कोणता मल्ल कसा डाव टाकतो आणि कसा बचाव करतो, याचं मार्गदर्शन वडील करत असतात,” असंही शिवराज म्हणाला.