Ravichandran Ashwin believes that Karun Nair can replace Ambati Rayudu in CSK : आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. त्याआधी फ्रँचायझींनी खेळाडूंना कायम ठेवण्याचे आणि सोडण्याचे काम पूर्ण केले आहे. दरवेळेप्रमाणेच पुन्हा एकदा लिलावात सर्वांच्या नजरा चेन्नई सुपर किंग्जवर असणार आहेत. महेंद्रसिंग धोनीचा संघ नेहमीच अशा काही खेळाडूंना खरेदी करतो, ज्यांचे आंतरराष्ट्रीय करिअर जवळपास संपले असते. यानंतर या खेळाडूंना चेन्नईत सामील झाल्यानंतर पुन्हा सूर गवसतो. तत्पूर्वी अश्विनने सीएसकेला अंबाती रायुडूचा बदली खेळाडू सुचवला आहे.
अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने गेल्या वेळी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली होती. यानंतर त्याने टीम इंडियातही पुनरागमन केले. यावेळी चेन्नई संघाला अंबाती रायुडूची उणीव भासेल. रायुडू निवृत्त झाला असून प्लेइंग इलेव्हनमधील त्याची जागा रिक्त झाली आहे. आता धोनी कोणत्या खेळाडूला संधी देतो हे पाहायचे आहे. चेन्नई सुपर किंग्जचा माजी फिरकीपटू आणि सध्या राजस्थान रॉयल्स संघात असलेल्या रविचंद्रन अश्विनने याबाबत आपले मत मांडले आहे.
चेन्नई सुपर किंग्जमध्ये करुण नायर अंबाती रायडूची जागा घेऊ शकतो, असा विश्वास अश्विनला आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना आश्विन म्हणाला, “मला वाटते सीएसके करुण नायरसाठी बोली लावेल. कारण संघ अंबाती रायुडूच्या बदली खेळाडूच्या शोधात आहे. चौथ्या क्रमांकावर शाहरुख खान त्याच्यासाठी योग्य नाही. चेन्नईचा संघ चौथ्या क्रमांकावर कोणाला खेळवेल हे मला माहीत नाही. संघ कोणताही डावखुरा फलंदाज आजमावू शकतो, पण सीएसकेचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला तर ते कोणत्याही अनोळखी खेळाडूवर डाव लावत नसल्याचे दिसून येते.” करुण नायरने कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावले आहे.
हेही वाचा – IND vs AUS T20 Series : ऋतुराज गायकवाडने मोडला मार्टिन गप्टिलचा विक्रम, इशान किशनलाही ‘या’ बाबतीत टाकले मागे
रविचंद्रन अश्विन म्हणाला, ”करुण नायर हा खेळाडू आहे, जो फिरकी गोलंदाजांविरुद्ध चांगला खेळू शकतो. महेंद्रसिंग धोनीला असे खेळाडू आवडतात. माझ्या मते करुण नायर त्यांच्यासाठी योग्य आहे. मनीष पांडेला चेन्नईमध्ये फिरकी गोलंदाजांविरुद्ध फारसे खेळताना पाहिलेले नाही, पण करुण नायरने चेन्नईत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावले आहे.” अश्विनला असेही वाटते की सनरायझर्स हैदराबाद ही अशी फ्रँचायझी आहे, जी करुण नायरसाठी रस दाखवू शकते.
अश्विन पुढे म्हणाला, “तो चांगल्या किमतीत सनरायझर्समध्येही जाऊ शकतो. त्याने अलीकडे काऊंटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. गेल्या काही वर्षांत त्याने कठीण प्रसंगांचा सामना केला आहे. हे सोपे नाही. होय, कारण कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावले आहे, पण नंतर तो अपयशी ठरला. कोणत्याही व्यक्तीच्या मानसिक स्थितीसाठी हे खूप कठीण आहे, पण त्याने त्याचा सामना केला आहे. त्याबद्दल करुणला सलाम.”