Verbal spat between Ollie Pope and Jasprit Bumrah : हैदराबाद कसोटी सामन्यात ऑली पोपने शानदार फलंदाजी करून भारतीय गोलंदाजांना निराश केले, त्याचा प्रभाव चौथ्या दिवशी पहिल्या सत्रातही दिसून आला, जेव्हा बुमराह जाणूनबुजून फलंदाज ऑली पोपशी भांडताना दिसला. जसप्रीत बुमराहने टाकलेल्या चेंडूवर ऑली पोप एकेरी धावा घेण्यासाठी धावला, त्यानंतर बुमराह जाणूनबुजून त्याच्या धावा घेण्याच्या आड आल्याचे पाहायला मिळाले, या दोघांमध्ये कोणतीही टक्कर झाली नसली तरी बुमराहच्या वागण्यावर ऑली पोप नाराज दिसला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याविषयी ऑलीने बुमराहशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, बुमराहने हाताने हावभाव करून दाखविण्याचा प्रयत्न केला की मी त्याच्या मार्गात नाही, तो त्याच्या मार्गात आला होता. त्याचवेळी पोप आणि बुमराह एकमेकांशी वाद घालण्याचा प्रयत्न करत असताना कर्णधार रोहितने फलंदाज पोपकडे जाऊन वातावरण शांत केले.
भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १५० किंवा त्याहून अधिक धावा करणारा ओली पोप हा इंग्लंडचा चौथा फलंदाज ठरला आहे. या खेळीच्या जोरावर ऑली पोपने माईक गॅटिंग, टॉम ग्रेव्हनी आणि केन बॅरिंग्टन यांची बरोबरी करण्यात यश मिळवले आहे. केन बॅरिंग्टनने भारताविरुद्ध दोनदा हा पराक्रम केला आहे.
माइक गॅटिंगने १९८५ मध्ये चेन्नई कसोटी सामन्यात २०७ धावांची खेळी साकारली होती. त्याच वेळी, टॉम ग्रेव्हनीने १९५१ मध्ये ब्रेबॉर्नमध्ये १७५ धावा केल्या होत्या. याशिवाय केन बॅरिंग्टनने १९६१ मध्ये कानपूरमध्ये १७२ धावांची आणि ब्रेबॉर्नमध्ये १५१ धावांची नाबाद खेळी खेळली होती. त्याचवेळी, आता हैदराबादमध्ये ओली पोपने १९६ धावांची इनिंग खेळून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे.
हेही वाचा – IND vs ENG 1st Test : इंग्लंडने टीम इंडियासमोर विजयासाठी ठेवले २३१ धावांचे लक्ष्य, ऑली पोपचे हुकले द्विशतक
सामन्याबद्दल बोलायचे तर, या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात २४६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ४३६ धावा करत आघाडी घेतली. दुसऱ्या डावात इंग्लंडने ४२० धावा केल्या आणि भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात इंग्लंडसाठी ऑली पोपने सर्वाधिक १९६ धावांची खेळी करत महत्त्वाचे योगदान दिले. त्याचबरोबर भारतासाठी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या.