Shubman Gill Catch Video Viral : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना लंडनच्या ओव्हल मैदानात रंगत आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद ४६९ धावा कुटल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारताने सर्वबाद २९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर आज चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने त्यांची इनिंग घोषीत केलीय. ऑस्ट्रेलियाने ८४.३ षटकांमध्ये ८ विकेट्स गमावात २७० धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ४४३ धावांची आघाडी घेतली असून भारताल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकण्यासाठी ४४४ धावांचं तगडं लक्ष्य गाठावं लागणार आहे. त्यानंतर भारताचे सलामीवर फलंदाज कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल कांगांरुंचा समाचार घेण्यासाठी मैदानात उतरले आणि भारताला चांगली सुरुवात करून दिली.

मात्र, स्कॉट बोलॅंडच्या गोलंदाजीवर शुबमन १८ धावांवर खेळत असताना त्याने स्लिपमध्ये चेंडू मारला आणि कॅमरून ग्रीनने झेल पकडला. मात्र, झेल पकडल्यानंतर चेंडू जमिनीला लागल्याचं व्हिडीओत पाहायला मिळालं. तसंच आधुनिक तंत्रज्ञान असतानाही थर्ड अंपायरने व्हिडीओ झूम आणि फ्रिझ केला नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांसह समालोचकांनी नाराजी व्यक्त केली. गिलला अंपायरने बाद दिल्यानंतर रोहित शर्माने अंपायरशी चर्चा केली. पंरतु, त्यानंतरही गिलला बाद देण्यात आलं आण टीम इंडियाला पहिला धक्का बसला.