ICC T20 World Cup 2024 Final: भारतीय क्रिकेट चाहते आजचा दिवस कधीच विसरू शकणार नाही. जे २००७ नंतर घडलं नव्हतं, ते २०२४ मध्ये घडलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आयसीसी टी –२० वर्ल्डकप २०२५ स्पर्धेच्या जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. हा सामना भारतीय संघाच्या हातून जवळपास निसटला होता. दक्षिण आफ्रिकेने या ट्रॉफीवर कब्जा केला होता. मात्र, सूर्यकुमार यादवने सीमारेषेजवळ टिपलेल्या भन्नाट कॅचच्या बळावर भारतीय संघाने हा सामना जिंकला आणि दुसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली.

दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेनने दक्षिण आफ्रिकेसाठी विजय खेचून आणला होता. त्याने अक्षर पटेलच्या १५ व्या षटकात २ चौकार आणि २ षटकार मारले. या षटकात त्याने २४ धावा वसूल केल्या. दक्षिण आफ्रिकेला इथून पुढे विजयासाठी केवळ ३० चेंडूत ३० धावा करायच्या होत्या. टी –२० क्रिकेटमध्ये इतक्या धावांचा पाठलाग करणं काही कठीण काम नाही. त्यामुळे सर्वांना असं वाटलं होतं की, दक्षिण आफ्रिका ट्रॉफी उंचावणार. मात्र सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर घेतलेल्या झेलमुळे सामना भारतीय संघाच्या बाजूने झुकला.

या सामन्यातील १७ वे षटक टाकण्यासाठी हार्दिक पांड्या गोलंदाजीला आला. या षटकात त्याने दक्षिण आफ्रिकेला सर्वात मोठा धक्का दिला. ज्या फलंदाजाने दक्षिण आफ्रिकेला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं. तो हेनरिक क्लासेन ५२ धावांवर माघारी परतला. विकेट काढण्यासह हार्दिकने अवघ्या ४ धावा खर्च केल्या. इथून पुढेही विजय दक्षिण आफ्रिकेचा होणार असं वाटत होतं. पण सूर्यकुमारच्या झेलमुळे सामना फिरला.

सूर्यकुमार यादवचा मॅचविनिंग झेल

तर झाले असे की, भारतीय संघाकडून शेवटचे षटक टाकण्यासाठी हार्दिक पांड्या गोलंदाजीला आला. या षटकातील पहिलाच चेंडू हार्दिकने फुल टॉस टाकला. या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या डेव्हिड मिलरने मोठा फटका मारला. हा चेंडू लाँग ऑफच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर जात होता. मात्र सूर्यकुमार यादवने भन्नाट झेल घेतला. त्याने सीमारेषेच्या बाहेर गेलेला झेल पकडला आणि मैदानाच्या आत हवेत उडवला. त्यानंतर तो सीमारेषेच्या बाहेर गेला आणि पुन्हा आत येऊन भन्नाट झेल घेतला. या झेलमुळे भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी –२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.