यूरो कप २०२० स्पर्धेतील क गटात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रियाने  नॉर्थ मेसेडोनियावर ३-१ ने सरशी साधली. सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघाने प्रत्येकी एक गोल नोंदवला होता. दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रियाच्या मायकल ग्रेगोरिचने ७८ मिनिटाला गोल केला आणि सामन्यात २-१ ने आघाडी मिळवली. यानंतर नॉर्थ मेसेडोनियाचा संघ दडपणाखाली आला. या दडपणाचा फायदा ऑस्ट्रियाच्या संघाने घेतला आणि त्यांना गोल करण्याची संधी दिली नाही. त्यानंतर ८९ व्या मिनिटाला मार्को आर्नोटीव्हीकने गोल मारत संघाला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली.

पहिले सत्र

सामना सुरु झाल्यानंतर १८ व्या मिनिटाला स्टीफन लायनरनं गोल मारला आणि नॉर्थ मेसेडोनिया संघावर दडपण आले. त्यानंतर बरोबरी साधण्यासाठी नॉर्थ मेसेडोनिया संघाची धडपड सुरु होती. ऑस्ट्रियाचा संघही त्यांच्या प्रयत्नांना रोखू शकला नाही. २८ व्या मिनिटाला गोरन पान्डेव याने गोल झळकावत बरोबरी साधली.

सामन्यात गैरवर्तन केल्याने नॉर्थ मेसेडोनियाच्या ट्राकोवस्कीला पिवळं कार्ड दाखवण्यात आले. या सामन्यासाठी नॉर्थ मेसेडोनिया संघाने ५-३-२ अशी रणनिती आखली होती. तर ऑस्ट्रिया संघाने ३-१-४-२ अशी व्यूहरचना आखली.

यूरो कप स्पर्धेच्या  ‘क’ गटात असणारे हे दोन संघ मोठ्या स्पर्धेत प्रथमच एकमेकांविरोधात उभे राहिले होते. नॉर्थ मेसेडोनियाचा संघ प्रथमच पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेत असून  ऑस्ट्रिया तिसऱ्यांदा युरो कप खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. यूरो कपमध्ये ऑस्ट्रियाने ६ सामन्यांत केवळ दोन गोल केले आहेत. रोमानियाच्या नॅशनल एरेना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.

ऑस्ट्रियाचा संघ या स्पर्धेची कधीही बाद फेरी गाठू शकलेला नाही. दुसरीकडे, या स्पर्धेत मेसेडोनियाचा संघ दुबळा मानला जात आहे. या स्पर्धेत भाग घेणार्‍या २४ संघांपैकी त्यांची गोल करण्याची क्षमता सर्वात कमी आहे. याबाबतीत वेल्सचा संघही मेसेडोनियाच्या संघासोबत संयुक्त स्थानावर आहे.

हेड-टू-हेड आकडेवारी

  • ऑस्ट्रिया आणि नॉर्थ मेसेडोनिया यांच्यात आत्तापर्यंत दोन सामने खेळले गेले होते आणि यात ऑस्ट्रियाने दोन्ही वेळेला सरशी साधली.
  • २०१९मध्ये दोन्ही संघांनी आपापसात शेवटचा सामना खेळला होता, यात ऑस्ट्रियाने नॉर्थ मेसेडोनियाला २-१ अशी मात दिली होती.