News Flash

अँड्रॉइड की आयफोन?

स्मार्टफोनची माणसाला ओळख झाली तेव्हापासून सुरू असलेला हा वाद.

स्मार्टफोनची माणसाला ओळख झाली तेव्हापासून सुरू असलेला हा वाद. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारा स्मार्टफोन चांगला की अ‍ॅपलच्या पठडीबाज पण तरीही नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाने साकारलेला आयफोन चांगला, या प्रश्नावर दोन्ही बाजूचे पाठीराखे तावातावाने आपले मुद्दे मांडत असतात. सुरक्षितता, वेगवान कामगिरी, ऐटबाज ठेवण यांमुळे एकीकडे आयफोन अनेकांना हवाहवासा वाटतो तर, दुसरीकडे त्याची किंमत, त्यातील स्टोअरेज मर्यादा, अ‍ॅपबाबतची बंधने यांमुळे तो नाकारणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. असेच फायदे-तोटे अँड्रॉइडचेही. आकर्षक ठेवण, सहज हाताळणी सुविधा, माफक किंमत, अगाध अ‍ॅपचे दालन या गोष्टींमुळे अँड्रॉइड फोनना पसंती मिळते. मात्र, त्यातील हॅकिंगचा धोका, फोन हँग होण्याचे प्रकार या गोष्टींकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही.

फायदे आणि तोटय़ांचा विचार करून आयफोन आणि अँड्रॉइडमधील चांगला स्मार्टफोन कुणाचा, हे सरसकट ठरवणे शक्य नाही. कारण वापरकर्त्यांची गरज आणि त्याची हाताळणीची पद्धत या दोन गोष्टी कोणत्याही स्मार्टफोनची निवड करताना महत्त्वाचे निकष असले पाहिजेत. या पाश्र्वभूमीवर या दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोनचे विस्तृत फायदे-तोटे सांगण्याचा हा प्रयत्न.

अ‍ॅपचा वापर

काही वर्षांपूर्वीपर्यंत आयफोनची कार्यप्रणाली असलेल्या ‘आयओएस’ला अ‍ॅप विकासकांचे प्राधान्य होते. त्यामुळे बहुतेक सर्वच अ‍ॅप आधी आयफोनवर येत असत आणि कालांतराने अँड्रॉइडवर आधारित स्मार्टफोनना ते मिळत असत. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. अ‍ॅप बनवणाऱ्या कंपन्या आयफोन आणि अँड्रॉइड या  दोन्ही यंत्रणांवर एकाच वेळी अ‍ॅप सादर करतात. त्यातही अँड्रॉइडवर अ‍ॅप आणणे अधिक सोयीस्कर आणि सोपे असल्याने अँड्रॉइड आधारित फोनना अ‍ॅप कंपन्यांची पसंती असते. आयफोनच्या अ‍ॅप स्टोअरमध्ये प्रवेश मिळवण्यापूर्वी सर्व अ‍ॅपना सुरक्षा कसोटय़ांमध्ये स्वत:ला सिद्ध करावे लागते. त्यामुळे आयफोनवर काही अ‍ॅप विलंबाने येत असले तरी, त्यांच्या सुरक्षिततेबाबत पुरेपूर हमी देता येते.

 हार्डवेअर

अँड्राइड ही कार्यप्रणाली गुगलची असली तरी, त्यावर आधारित स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या हजारो आहेत. प्रत्येक कंपनी ग्राहकपसंती, किंमत, विक्री क्षेत्र, स्पर्धक कंपनीच्या फोनची वैशिष्टय़े यांचा विचार करून त्यानुसार हार्डवेअरचा अंतर्भाव करते. यामुळे अगदी पाच हजार रुपयांपासून ७० हजार रुपयांपर्यंतचे स्मार्टफोन अँड्रॉइडच्या एकाच आवृत्तीवर चालताना दिसतात. आपल्या आवाक्यानुसार फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही बाब पथ्यावर पडते.

आयफोनबाबत मात्र ग्राहकांना फारसा पर्याय मिळत नाही. अ‍ॅपल एका श्रेणीतील दोन किंवा तीन प्रकारचे स्मार्टफोन एका वेळी बाजारात आणते. यातील हार्डवेअरमध्ये फारसा फरक नसतो. मात्र, हार्डवेअरचा दर्जा हा वादातीत असतो. याउलट कमी किमतीच्या अँड्रॉइड फोनमध्ये ग्राहकांना हार्डवेअरशी संबंधित अनेक गोष्टींबाबत तडजोड करावी लागते. अर्थात अँड्रॉइडच्या जास्त किंमत श्रेणीतील फोनमधील हार्डवेअर उत्तम दर्जाचे असते.

स्टोअरेज क्षमता

सध्याच्या घडीला ‘स्टोअरेज’ ही स्मार्टफोनमधील सर्वात महत्त्वाची गरज आहे. व्हॉट्सअ‍ॅप किंवा अन्य माध्यमांतून डाऊनलोड केली जाणारी छायाचित्रे, असंख्य अ‍ॅप्सचा डेटा, कॅमेऱ्याने टिपलेले व्हिडीओ-छायाचित्रे यांच्या साठवणुकीसाठी जास्त स्टोअरेज असणे आवश्यक असते. आयफोन याबाबतीत उणा ठरतो. आयफोनमधील स्टोअरेज क्षमता वाढवता येत नाही आणि जास्त स्टोअरेज क्षमता असलेला आयफोन कमालीचा महाग असतो.

अँड्रॉइड फोनमध्ये मात्र स्टोअरेज क्षमतेला मर्यादा नाही. अनेक  फोन १६ जीबी, ३२ जीबी इतक्या स्टोअरेज क्षमतेसह येतात. पण ही क्षमता वाढवण्याचीही सुविधा असते. याचा वापरकर्त्यांना फायदा होतो.

सॉफ्टवेअर

अँड्रॉइडच्या बदलत्या आवृत्त्यांसह याच्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक उपयुक्त बदल आणि सुधारणा झाल्या आहेत. मात्र, अजूनही आयफोनची सॉफ्टवेअर यंत्रणा उजवी मानली जाते.

होम स्क्रीन

अँड्रॉइड फोनची ‘होम स्क्रीन’ आयफोनच्या तुलनेत अधिक आकर्षक, चटपटीत आणि हाताळणीत स्वातंत्र्य देणारी आहे. तुम्ही ‘प्ले स्टोअर’मधून हव्या तितक्या थीम आणि वॉलपेपर काढून वापरू शकता. आयफोनमध्ये मात्र, यावर मर्यादा येते.

कॅमेरा

आयफोनच्या कॅमेऱ्यातील छायाचित्रे अतिशय चांगली असतात. अँड्रॉइड फोनने टिपलेल्या छायाचित्रांचा दर्जा कॅमेऱ्याच्या हार्डवेअरवर अवलंबून असतो. त्यामुळे कमी किंमत असलेल्या फोनच्या कॅमेऱ्यांतील छायाचित्रे प्रभावी वाटत नाहीत. याउलट अँड्राइडच्या उच्च किंमत श्रेणीतील फोनमधील कॅमेरे अतिशय दर्जेदार आणि खऱ्याखुऱ्या कॅमेऱ्याशी सुसंगत अशी छायाचित्रे टिपतात.

सुरक्षा आणि खासगीपणा

या मुद्दय़ावर आयफोन हा अँड्रॉइड फोनपेक्षा वरचढ ठरतो. अँड्रॉइडची कार्यप्रणाली ‘ओपन सोर्स’ असल्याने अशा फोनमध्ये इन्स्टॉल होणारे अ‍ॅप, हाताळली जाणारी संकेतस्थळे यांवर कोणाचेही नियंत्रण नसते. या स्वातंत्र्याचा हॅकर्स मंडळी पुरेपूर गैरफायदा उचलतात. त्यामुळे अँड्रॉइडवर आधारित फोनमधील वापरकर्त्यांची माहिती चोरण्याचे प्रकार सर्रास घडतात. आयफोनची आयओएस यंत्रणा मात्र वापरकर्त्यांच्या माहितीचे भक्कमपणे रक्षण करते.

दृष्टिक्षेपात फायदे-तोटे

आयफोन उपयुक्तता

 • हार्डवेअर, सॉफ्टवेअरवर अ‍ॅपलचे नियंत्रण असल्याने सुरक्षेची हमी.
 • अ‍ॅप स्टोअरमधील प्रत्येक अ‍ॅपची खातरजमा केली जात असल्याने व्हायरस वा मालवेअरचा धोका नाही.
 • चांगली ग्राहक सेवा यंत्रणा

मर्यादा

 • स्टोअरेज वाढवण्याची सुविधा नाही. (जास्त स्टोअरेजसाठी अवाजवी किंमत)
 • बंदिस्त यंत्रणेमुळे अ‍ॅप वापरावर मर्यादा.
 • ‘कस्टमायझेशन’ अर्थात हव्या तसे बदल करण्याचे कमी पर्याय.

अँड्राइड उपयुक्तता

 • ‘ओपन सोर्स’ अर्थात खुली यंत्रणा असल्याने हवे तसे बदल करण्याची सुविधा
 • स्टोअरेज क्षमता जास्त असूनही किंमत कमीच. स्टोअरेज वाढवण्याचीही सुविधा.
 • स्मार्टफोनचे अनेक पर्याय

मर्यादा

 • मालवेअरचा धोका अधिक
 • वेगवेगळय़ा युजर इंटरफेसमुळे हाताळणीत संभ्रम
 • ग्राहकसेवा यंत्रणेचा दर्जा तुलनेने सुमार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2018 12:42 am

Web Title: android vs iphone
Next Stories
1 पेनड्राइव्हची देखभाल
2 आयुष्यातील प्रत्येक क्षणात एक विनोद शोधा
3 ‘नेट’शी नाते जडले..
Just Now!
X