डॉ. दीपा दिनेश जोशी

रोहितचा ताप गेले तीन ते चार दिवस कमीच होत नव्हता. तापाबरोबरच कमालीचा थकवा, मळमळ, डोकेदुखी हेदेखील त्याला जाणवत होते. साहजिकच डॉक्टरांनी तपासल्यावर लक्षणांवरून आणि तपासणीवरून डेंग्यूची शक्यता दर्शवली. नुसते नाव जरी ऐकले तरी सर्वानाच चिंतीत करणारा डेंग्यू नक्की कसा होतो याची लक्षणे काय, उपचार काय ते जाणून घेऊ..

डेंग्यू हा आजार विषाणूजन्य म्हणजे व्हायरसमुळे होतो. डास हे फक्त डेंग्यू पसरवण्याचे माध्यम आहेत. ‘एडिस इजिप्ती’ नावाच्या डासामुळे डेंग्यूचा प्रसार होतो. या डासाच्या पायावर पांढरे चट्टे असतात. त्यामुळे त्याला ‘टायगर मॉस्क्युटो’ म्हणतात. हा डास दिवसा चावतो. त्यामुळे केवळ घरीच नव्हे तर इतरत्र कोठेही चावू शकतो. या डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात. पाणी उपलब्ध झाल्यास त्यातून पुन्हा अळी तयार होते.

एडीस डासामार्फत रोगप्रसार कसा होतो ?

ताप येण्याअगोदर दोन दिवस आणि ताप गेल्यानंतर पाच दिवस विषाणू मोठय़ा प्रमाणात शरीरात असतात. त्यावेळी रुग्णास डास चावल्यास डासाच्या शरीरात ते विषाणू जातात. आठ ते दहा दिवसांनी हा डास दुसऱ्या निरोगी व्यक्तीस आजार देऊ शकतो. रोगाची लक्षणे दिसण्यास चार ते सहा दिवस लागतात.

डेंग्यू संसर्गजन्य आहे का ?

नाही. हा खुप चुकीचा समज आहे. एडीस डासाची मादी फक्त रक्त पिते. कारण तिला अंडी घालण्यासाठी प्रथिनांची गरज असते. डासाची मादी ही १०० मीटर अंतरापर्यंतच उडू शकते. त्यामुळे जवळच्या लोकांमध्ये आजार दिसून येतो. डासांमार्फतच आजार पसरतो.

डेंग्यू कोणत्याही वयात होतो का ?

अर्थातच कोणत्याही वयात होऊ शकतो. अगदी लहान बाळांपासून आजोबापर्यंत.

डेंग्यूची लक्षणे काय?

तीव्र ताप, अंगदुखी, पाठदुखी, सर्दी-खोकला, डोळ्यामागे दुखणे, मळमळ, भूक न लागणे, अशक्तपणा, पोटात दुखणे, सर्व अंगावर पुरळ, डेंग्यूच्या आजारात अंगदुखी, पाठदुखी विशेष करून असते. म्हणून त्याला ‘बॅक ब्रेक फीव्हर’ असेही म्हणतात. काही रुग्णांमध्ये हा आजार उग्र रुप धारणकरतो. त्याला ‘डेंग्यू हिमरोजिक फीवर’ असे म्हणतात. याला ताप तीव्र व जास्त दिवस असतो. अंगावर लाल चट्टे येतात. शरीरात ठिकठिकाणी रक्तस्त्राव होऊ शकतो. जसे की नाकातून, हिरडय़ातून, आतडय़ांमधून. काहींना दम लागतो. अंगावर सूज येते. या आजारात शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. केशवाहिन्या फुटतात. या अवस्थेत योग्य वेळी उपचार न मिळाल्यास रुग्ण ‘शॉक’मध्ये जाऊ शकतो. याला ‘डेंग्यू ऑफ सिंड्रोम’ म्हणतात. यात लघवीचे प्रमाण कमी होते. रक्तदाब कमी होतो. रुग्ण दगावण्याची शक्यता असते. म्हणूनच योग्य वेळी निदान व उपचार होणे आवश्यक असते.

डेंग्यूमधील धोकादायक लक्षणे

* ताप गेल्यानंतरही खूप अशक्तपणा

* लघवीचे प्रमाण कमी होणे

* रक्तस्रावाची लक्षणे

* श्वास घेण्यास त्रास होणे

* पोटात तीव्र वेदना

* सातत्याने उलटय़ा होणे

* अंगावर सूज येणे

या रोगाचे निदान कसे करायचे ?

मुख्य म्हणजे वरील लक्षणांवरून आपल्याला डॉक्टरांकडून निदान करून घेता येते. त्याची खात्री करण्यासाठी प्रथमत: पेशींची तपासणी करावी लागते. प्लेटलेट्स व पांढऱ्यापेशी या आजारात कमी होतात. डेंग्यूचे विषाणू आणि त्या विरूद्ध तयार होणाऱ्या ‘अँटिबॉडीज्’ तपासण्यासाठी चाचण्या उपलब्ध आहेत.

डेंग्यूवरील उपचार काय ?

या आजारावर ठरावीक उपचार आहे असे नाही. लक्षणांप्रमाणे उपचार केले जातात. शरीरातील क्षार, पाण्याचे संतुलन राखणे आणि रक्तदाब योग्य पातळीवर ठेवणे हा यावरील उपचाराचा मुख्य भाग आहे. या रोगात प्लेटलेट्सची संख्या कमी होऊन रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे ते तपासत राहणे आवश्यक असते. ताप जेव्हा कमी होतो किंवा जातो, तेव्हाच खऱ्या अर्थाने रुग्णांकडे जास्त लक्ष देणे आवश्यक असते. कारण त्या काळात प्लेटलेट्स पेशी कमी होतात. प्रतिजैविक, अ‍ॅस्परिन यांसारख्या औषधांचा वापर टाळावा.

डेंग्यूच्या रुग्णाला प्लेटलेट्स द्याव्या लागतात का ?

बहुतेक वेळा प्लेटलेट्स देण्याची गरज पडत नाही. खूपच प्राणघातक रक्तस्राव असेल तरच त्याची आवश्यकता पडते.

आजार होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्याल ?

* डासांचे प्रमाण कमी करणे

* डास चावू न देणे

डासांचे प्रमाण कमी करण्यासाठी घर परिसराची स्वच्छता, घराभोवती पाण्याची डबकी साठवू नये, पाण्याची भांडी नियमीत घासणे, पाण्याच्या भांडय़ाला घट्ट झाकण लावणे, आवारात पडलेल्या टायरमधील पाणी, कुंडय़ातील पाणी, गच्चीत साठलेले पाणी याचा नियमित निचरा करावा. आठवडय़ातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. घरातील सर्व भांडी घासून पुसून कोरडी ठेवावीत. या सर्व गोष्टी पाळल्या तर एडीस डास उत्पत्ती कमी होईल. गप्पी मासे अळीनाशक असल्याने त्यांच्यामुळेही डासांची उत्पत्ती कमी होते. त्यांना साचलेल्या पाण्यात सोडावे.

डास चावू न देण्यासाठी खिडक्यांना जाळ्या बसवणे, मुलांना लांब हातापायाचे कपडे घालणे, मच्छरदाणी, पंखा यांचा घरात वापर करावा. लहान मुलांमध्ये निलगिरी तेल, कडुलिंबाचे तेल, लेमनग्रास तेल अंगाला लावणे यामुळे डासांनी नैसर्गिकरित्या चावण्यापासून रोखले जाते. संशयित रुग्णाच्या घर परिसरात कीटकनाशक औषध फवारणी करणे.

drdeepadjoshi@gmail.com