लॅपटॉप हे आता प्रत्येकासाठी आवश्यक उपकरण बनले आहे. घरगुती वापरासाठीही डेस्कटॉप संगणकाऐवजी लॅपटॉपला प्राधान्य दिले जाते. लॅपटॉप घेऊन कोठेही बसून काम करता येत असल्याने विद्यार्थ्यांपासून नोकरदार आणि व्यावसायिकांपर्यंत साऱ्यांनाच तो सोयीस्कर वाटतो. अगदी नाष्टा करताना डायनिंग टेबलवर किंवा झोपायच्या वेळी बिछान्यात लॅपटॉप हाताळता येऊ शकतो. मात्र, अशा हाताळणीमुळे लॅपटॉप अस्वच्छ होण्याची शक्यता जास्त असते. विशेष म्हणजे, लॅपटॉपचा कीबोर्ड म्हणजे रोगजंतूंसाठी एक प्रकारचे उत्पत्तीस्थानच असते. त्यामुळेच केवळ लॅपटॉपच्या दीर्घायुष्यासाठीच नव्हे तर आपल्या निरोगी आयुष्यासाठीही त्याची नित्यनेमाने स्वच्छता करणे आवश्यक आहे.

लॅपटॉपच्या कीबोर्डची स्वच्छता कशी कराल?

* लॅपटॉप बंद करा आणि बॅटरी काढून ठेवा.

* लॅपटॉप उलटा करून अलगद टिचकी मारून कीबोर्डवर जमा झालेली वरवरची धूळ किंवा कण हटवा.

* कीबोर्डवरील बटणांच्या फटीत जमा झालेली धूळ किंवा सूक्ष्म कण हटवण्यासाठी ‘एअर ब्लोअर’चा वापर करा. त्याद्वारे जोरात हवा मारून ही धूळ हटवता येते.

* लॅपटॉप सपाट पृष्ठभागावर ठेवून व्हॅक्यूम क्लीनरच्या छोटय़ा ब्रशच्या साह्याने कीबोर्डवरील छोटय़ा फटींमध्ये साचलेले सूक्ष्म कण दूर करा.

* एका कापसाच्या बोळय़ावर स्पिरिट किंवा अल्कोहलचे दोन-चार थेंब टाकून त्याद्वारे कीबोर्ड पुसून घ्या. यामुळे कीबोर्डवरील अतिसूक्ष्म जंतू नष्ट होतात. मात्र, हे करताना कापसाचा बोळा खूपच ओला राहणार नाही, याची दक्षता घ्या.

* कीबोर्ड स्वच्छ व चकचकीत ठेवणारे काही द्रवरूप पदार्थ बाजारात मिळतात. या स्प्रेचा वापर करूनही तुम्ही कीबोर्ड स्वच्छ करू शकता.

* कीबोर्डखेरीज तुम्ही ‘एक्स्टर्नल’ माउस वापरत असाल तर तोही स्वच्छ करा.

लॅपटॉपच्या स्क्रीनची स्वच्छता

* लॅपटॉपची स्क्रीन अतिशय नाजूक असते. त्यामुळे तिची स्वच्छता करताना काळजी बाळगणे आवश्यक आहे.

* ‘एअर ब्लोअर’च्या मदतीने स्क्रीन आणि तिच्या कोपऱ्यांमध्ये हवा मारून धूळ हटवा.

* एका मऊ कापडावर व्हिनेगारचे काही थेंब टाका व त्या कापडाने स्क्रीन पुसा.

* लॅपटॉपच्या स्क्रीनवर सातत्याने धूळ चिकटते. ती हटवण्यासाठी लॅपटॉप बॅगेतच एक मायक्रोफायबर कापड ठेवा. असे कापड कोणत्याही दुकानात मिळते. हे कापड छोटय़ा छोटय़ा धूलिकणांनाही आपल्याकडे आकर्षित करून लॅपटॉप स्वच्छ करते.