06 March 2021

News Flash

२०२०चे धनी!

करोनाच्या महासाथीने २०२० हे वर्ष जितके कटू केले तितकेच ते अविस्मरणीयही केले आहे.

अँड्रॉइडचा प्रतिस्पर्धी असलेल्या अ‍ॅपलनेही आपल्या प्लॅटफॉर्मवरील सर्वोत्तम अ‍ॅप आणि गेमची यादी जाहीर केली आहे.

करोनाच्या महासाथीने २०२० हे वर्ष जितके कटू केले तितकेच ते अविस्मरणीयही केले आहे. जवळपास तीन महिने घरात बंदिवासात काढल्यानंतरही पुढचे सहा महिने नागरिकांच्या सार्वजनिक वावरावर र्निबध आले आहेत. अशा वेळी प्रत्येकाने तंत्रज्ञान आणि मोबाइलशी अधिक जवळीक साधली. बाजारातील आर्थिक व्यवहार करायचे असोत की, काही वस्तू खरेदी करायच्या असो, डिजिटल व्यवहार, ऑनलाइन शॉपिंग यांचा जोर या आठ महिन्यांत दिसून आला. त्याखेरीज मनोरंजनाचे ओटीटी अ‍ॅप्स, लुडोसारखे गेम्स, गाणी-संगीताचे अ‍ॅप यांनी विरंगुळा म्हणून नागरिकांना सोबत केली. एकूणच हे वर्ष माणूस आणि स्मार्टफोन यांच्यातील जवळीक अधिक दृढ करणारे ठरले. साहजिकच याचे प्रतिबिंब अँड्रॉइड आणि अ‍ॅपल या मोबाइल ऑपरेटिंग प्लॅटफॉर्मवरील सवरेत्कृष्ट अ‍ॅपच्या यादीत उमटलेले दिसते.

भारतात अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांत टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन कामकाजात, राहणीमानात, विरंगुळय़ाच्या पद्धतीत झालेले बदल सवरेत्कृष्ट ठरलेल्या अ‍ॅपच्या माध्यमातून टिपता येतात. या वर्षी भारतात सवरेत्कृष्ट अ‍ॅप म्हणून निवड झालेले ‘स्लीप स्टोरीज फॉर काल्म स्लीप-मेडिटेट’ हे अ‍ॅप टाळेबंदीने निर्माण केलेल्या मानसिक अस्वस्थतेचे प्रतीक आहे. करोनामुळे निर्माण झालेली भीती, टाळेबंदीमुळे आलेले नैराश्य आणि आर्थिक भवितव्याची चिंता अशा अनेक कारणांमुळे झोप उडालेल्या वापरकर्त्यांनी मन:शांती, ध्यानधारणा, शांत झोप याकरिता ‘स्लीप स्टोरीज’सारख्या अ‍ॅपची मदत घेतली. ध्यानधारणा, योगसाधना याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या अन्य अ‍ॅपनाही यंदा मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. गूगलच्या युजर्स चॉइस अ‍ॅपचा पुरस्कार ‘मायक्रोसॉफ्ट ऑफिस’ला देण्यात आला. टाळेबंदीच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ आणि ‘ई लर्निग’ या संकल्पना घरोघरी रुजत असताना ‘ऑफिस’शी संबंधित अ‍ॅपचा वाढलेला वापर या पुरस्कारामागचे कारण दाखवतो.

या वर्षी टाळेबंदीमुळे माणसामाणसांत केवळ दूरसंवादच होत होता. त्यामुळेच संवादाशी संबंधित अ‍ॅपसाठीही हे वर्ष चांगले होते. भारतीय भाषांत संदेश पाठवण्याची, संवाद करण्याची संधी देणारे ‘कू’ हे अ‍ॅप अशाच प्रकारे लोकप्रिय ठरले. सवरेत्कृष्ट गेम म्हणून ‘लिजंड्स ऑफ रनेटेरा’ची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, अँड्रॉइडचा प्रतिस्पर्धी असलेल्या अ‍ॅपलनेही आपल्या प्लॅटफॉर्मवरील सर्वोत्तम अ‍ॅप आणि गेमची यादी जाहीर केली आहे. दर्जा, डिझाइन, वापर, तंत्रज्ञान अशा विविध निकषांवर पडताळणी करून या अ‍ॅपची निवड करण्यात आली आहे. त्यावरही करोनाकाळाची छाप दिसतेच. घरातल्या घरात व्यायाम करण्यासाठी मार्गदर्शन करणारे ‘वेकआऊट’ हे अ‍ॅप यंदाचे सवरेत्कृष्ट अ‍ॅप ठरले आहे. त्याचप्रमाणे कार्यालयीन कामकाज आणि बैठकांसाठी उपयुक्त ठरलेले ‘झूम’ हे अ‍ॅप यंदा आयपॅडवरील सर्वोत्तम अ‍ॅप ठरले. डिस्ने प्लस हॉटस्टार हे मनोरंजनाच्या बाबतीतल सर्वोत्तम व्हिडीओ स्ट्रीमिंग अ‍ॅप ठरले.

‘जेनशिन इम्पॅक्ट’ हा आयफोनवरील ‘गेम ऑफ द इयर’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे, तर अँड्रॉइडवर सर्वोत्तम ठरलेला ‘लिजंड ऑफ रनेटेरा’ हा गेम आयपॅडवरही वर्चस्व गाजवणारा ठरला. तंदुरुस्तीवर लक्ष ठेवणारे, लहान मुलांना गुंतवून ठेवणारे, मानसिक स्वास्थ्य वाढवण्यासाठी मदत करणाऱ्या अ‍ॅपची यंदा रेलचेल दिसून आली, असे निरीक्षण ‘अ‍ॅपल’च्या वतीने एका निवेदनाद्वारे नोंदवण्यात आले आहे. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर, अ‍ॅमेझॉन इंडिया, आरोग्यसेतू, झूम, व्हॉट्सअ‍ॅप, यूटय़ूब, इन्स्टाग्राम आणि गूगल हे अ‍ॅपलच्या प्लॅटफॉर्मवरील सर्वोत्तम नि:शुल्क अ‍ॅप ठरले.

सवरेत्कृष्ट दैनंदिन वापरातील अ‍ॅप

गुगलने यंदा सवरेत्कृष्ट अ‍ॅपची घोषणा करताना त्यांचे विविध गटांत वर्गिकरण केले आहे. यामध्ये ‘दैनंदिन वापरासाठी आवश्यक अ‍ॅप’ची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये ‘कू’ हे भारतीय भाषांत संवाद साधता येणारे अ‍ॅप अव्वल ठरले. याखेरीज मायक्रोसॉफ्ट ऑफिस, ज्योतिषशास्त्राशी संबंधित ‘पॅटर्न’ हे अ‍ॅप, किराणा खरेदीपासून पाककृतींपर्यंतची माहितीसंग्रह असलेले ‘झेलिश’ हे अ‍ॅप, ‘झूम’ मीटिंग आदी अ‍ॅप सवरेत्कृष्ट ठरवण्यात आले आहेत.

‘टिकटॉक’ऐवजी ‘टकाटक’

करोनाकाळामुळे गढूळलेल्या या वर्षांला भारत-चीन सीमासंघर्षांचीही किनार आहे. या संघर्षांतूनच वापरकर्त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा करत भारताने चिनी कंपन्यांकडून निर्मित अ‍ॅपवर बंदी आणली. त्यात देशातील सर्वात लोकप्रिय अ‍ॅप ‘टिकटॉक’चाही समावेश होता. शहरांपासून गावांपर्यंत आणि लहानग्यांपासून तरुणाईपर्यंत सर्वामध्ये लोकप्रिय असलेले ‘टिकटॉक’ बंद होताच त्या अ‍ॅपची जागा घेण्यासाठी भारतीय आणि अन्य परदेशी कंपन्यांच्या अ‍ॅपमध्ये चढाओढच सुरू झाली. यातूनच ‘एमएक्स टकाटक’, ‘मोज – मेड इन इंडिया’, ‘रिफेस’ यासारखे अ‍ॅप लोकप्रिय ठरले. अशा अ‍ॅपनाही गुगलच्या यादीत स्थान मिळाले आहे.

‘नोकिया २.४’ बाजारात

‘एचएमडी ग्लोबल’ने ‘नोकिया २.४’ हे उत्पादन बाजारात आणले आहे. यामध्ये ‘नाइट मोड’ व ‘पोट्र्रेट मोड’ यांसारखी ‘एआय इमेजिंग’ची वैशिष्टय़े आहेत. त्यांमुळे यातून काढलेली छायाचित्रे ही दर्जेदार ठरतात, असा कंपनीचा दावा आहे. या फोनची स्क्रीन ६.५ इंच आकाराची असल्याने त्यावरून चित्रपट पाहणे किंवा छायाचित्रे पाहण्याचा अनुभव चांगला आहे. यामध्ये वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘फिंगरप्रिंट स्कॅनर’सह ‘फेस अनलॉक’ची सुविधा पुरवण्यात आली आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममुळे या फोनची हाताळणी अधिक सहज करता येते.

किंमत : १०,३९९ रुपये.

‘सिस्का’ची पॉवरबँक

‘सिस्का अक्सेसरीज’ या मोबाइल अक्सेसरीज क्षेत्रातील कंपनीने ‘डब्ल्यूपीबी१००२’ पॉवर बँक बाजारात आणली आहे.  भारतीय बनावटीच्या या १०,००० एमएएच पॉवर बँकेमुळे ग्राहकांना वायरलेस आणि जलद चार्जिग सुविधा उपलब्ध झाली आहे. ब्लुटुथ स्पीकर, स्मार्टफोन, वायरलेस हेडफोन इत्यादी चार्जिग करण्यासाठी ही पॉवरबँक उपयुक्त ठरते. त्यामध्ये सीटाईप इनपूट आणि आऊटपूट चार्जिगचा पर्यायही देण्यात आला आहे. हे बहुआयामी, खिशात सहज मावणारे उपकरण असून ते आघाडीच्या दालनांत २८९९ रुपये किमतीत उपलब्ध असेल. ही पॉवर बँक निळा व काळ्या रंगात उपलब्ध आहे.

‘गोल्डमेडल’चे एलईडी दिवे

‘गोल्डमेडल इलेक्ट्रिकल्स’ या देशातील आघाडीच्या फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्स (एफएमसीजी) कंपनीने फॅबिओ व सिम्पलो ही दोन नवी आकर्षक एलईडी लाइटिंग उत्पादने दाखल केली आहेत. ‘फॅबिओ’चे दिवे २३ अंशाच्या कोनात ठरावीक वस्तू किंवा जागेवर प्रकाशझोत पाडतात तर ‘सिम्पलो’ श्रेणीतील दिवे १२० अंशाच्या विस्तृत कोनात प्रकाश फेकतात. फॅबिओची निर्मिती ५, १० व १५ वॉट अशा प्रकारांत केली जाते, सिम्पलो केवळ ५ व ७ वॉट प्रकारांत उपलब्ध आहेत.

किंमत : १३६० रुपयांपासून १५५५ रुपये 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 3:05 am

Web Title: best gazette app gaming app of 2020 dd70
टॅग : Flashback 2020
Next Stories
1 थंडीच्या दिवसात गाजर खाण्याचे आहेत ‘हे’ फायदे
2 व्होडाफोन-आयडिया युजर्सना झटका, महाग झाले दोन ‘पॉप्युलर’ प्लॅन्स
3 64MP च्या ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासह 44MP चा ड्युअल सेल्फी कॅमेराही, जाणून घ्या कसा आहे Vivo V20 Pro 5G
Just Now!
X