ही बातमी वाचून महिलांना सुखद धक्का बसू शकतो. ब्रिटनच्या संशोधकांनी ‘मेल इडिअट थेरी’च्या आधारे केलेल्या संशोधनातून पुरूष महिलांपेक्षा जास्त वेंधळे असल्याचा निष्कर्ष काढला आहे. ‘न्यू कॅसल विद्यापीठा’च्या संशोधकांनी लिंगभेदावर आधारित ही थेअरी आजमावून पाहण्यासाठी वेंधळेपणे धाडसी वर्तणूक केलेल्या महिला-पुरुषांची प्रकरणे पडताळून पाहण्यास सुरुवात केली. केवळ अपघाताने नव्हे; तर वेंधळेपणामुळे जीव गमावलेल्यांचा यात समावेश करण्यात आला होता. एकूण ४१३ प्रकरणांपैकी छाननी करून ३१८ वैध प्रकरणांना मान्यता देण्यात आली. या ३१८ प्रकरणांपैकी २८२ प्रकरणे ही पुरुष वेंधळेपणाची होती, तर केवळ ३६ प्रकरणे ही महिलांच्या वेंधळेपणाची होती. लिंगभेदावर आधारित वेंधळेपणाच्या परीक्षणात तब्बल ८८.७ टक्के पुरुषांनी आघाडी मारली. या अभ्यास पाहणीद्वारे पुरुष हे महिलांपेक्षा जास्त वेंधळ्यासारखे वागत असल्याचा निष्कर्ष समोर आला.