News Flash

सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्यावी?

आकाशातील अनोखे नाटय़ पाहण्याची दुर्मीळ संधी

येत्या २१ जून रोजी भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण तर महाराष्ट्रात खंडग्रास ग्रहण पाहण्याची पर्वणी आहे. समाजातील प्रचलित समजुती बाजूला ठेवून प्रत्येकाने हा आनंद लुटावा. मात्र त्याआधी थोडी काळजी घ्या. दक्षता घ्या. केवळ डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नका. सूर्य प्रकाशातील अतिनील किरणांनी डोळ्यांतील कॉर्निया या नाजूक पटलास इजा होऊन दृष्टिदोष निर्माण होऊ शकतो.

सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे धोकादायक असते, असा इशारा खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिला आहे. सूर्यापासून येणारी किरणे आपल्या डोळ्यांना कायमस्वरूपी इजा करू शकतात. दृष्टिपटलामधील पेशींना इजा होऊ शकते. दुर्बीण वा द्विनेत्रीद्वारे सूर्याकडे बघणेही घातक आहे. सूर्यग्रहण प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पद्धतीने सुरक्षितरित्या पाहता येऊ शकते. सुची छिद्र कॅमेरा वापरून अथवा बर्हिवक्र भिंग वापरून सूर्याची प्रतिमा कागदावर पाहता येईल. यासाठी हॅण्ड प्रोजेक्टर, बॉक्स प्रोजेक्टर वापरता येईल. दुर्बीण, द्विनेत्रीवर ‘सोलर फिल्टर’ बसवून सूर्यग्रहण सुरक्षितपणे बघता येईल. असेच ‘सोलर फिल्टर’ वापरून बनविलेले सूर्यग्रहण चष्मे ग्रहण पाहण्यास सुरक्षित असतात. असा चष्मा वापरला तरीही फार वेळ सूर्याकडे पाहू नये. तुमच्याकडे गहू चालण्याची चाळणी असेल तर तिच्या मदतीने आपण सुरक्षित रीतीने ग्रहण पाहू शकतो, असे अभ्यासक सांगतात. ही चाळणी तिच्या वर सूर्याची किरणे लंबरूप पडतील, अशा रीतीने धरावी आणि चाळणीच्या खाली पांढरा कागद धरावा. या कागदावर आपल्याला सूर्याची अनेक छोटी रूपे दिसतील.

सूर्यग्रहण कधीही साध्या डोळ्यांनी पाहू नये. त्यासाठी ग्रहणचष्म्याचाच वापर करावा. फोटो काढताना किंवा दूर्बिणीतून सूर्यग्रहण पाहतांना योग्य फिल्टरचा वापर करावा.हे सूर्यग्रहण भारताप्रमाणेच आफ्रिका, दक्षिण पूर्व यूरोप, मिडलइस्ट, इंडोनेशिया, मायक्रोनेशिया येथून दिसेल. यापूर्वी मागीलवर्षी २६ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती दक्षिण भारतातून दिसली होती. त्यावेळीही उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसले होते. यानंतर पुन्हा भारतातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याचा योग २१ मे २०३१ रोजी येणार आहे. त्या ग्रहणाची कंकणाकृती स्थिती दक्षिण भारतातून दिसणार आहे. महाराष्ट्रातून सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था दिसण्याचा योग मात्र खूप उशीरा म्हणजे ३ नोव्हेंबर २४०४ रोजी येणार असल्याचे दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 9:13 am

Web Title: solar eclipse 2020 how view solar eclipse safely nck 90
टॅग : Solar Eclipse
Next Stories
1 टिकटॉक निर्मात्या कंपनीचा मोठा निर्णय, भारतातून दोन व्हिडीओ अ‍ॅप बंद करण्याची घोषणा
2 ‘होंडा’ने परत मागवल्या 65 हजारांहून जास्त कार; होंडा सिटी, Amaze, Jazz चा समावेश
3 चार रिअर कॅमेऱ्यांसह 5,000mAh बॅटरी; Oppo A52 चा ‘या’ तारखेला ‘सेल’
Just Now!
X