‘माझं वजन खूप वाढलंय, काय करावं कळतच नाहीये.’ ‘मी खूप कमी खाते तरीही मला हवा पण पचते’ असे संवाद अनेकदा आपल्या कानावर पडतात. मग सॅलाड खा, कडधान्य खा, गोड आणि भात बंद करा असे उपाय आपल्या मित्रमंडळींकडून आणि नातेवाईकांकडून सुचवले जातात. अशा उपायांकडे दुर्लक्ष केले जाते. या गोष्टी खायच्या म्हणजे जगणंच कठिण असं अनेकांना वाटायला लागतं. अशावेळी चविष्ट आणि तरीही पौष्टीक पदार्थ मिळाले तर दोन्ही हेतू साध्य होतात.
दलिया हा असाच एक पदार्थ आहे, जो आरोग्यासाठी अतिशय चांगला, चविष्ट आणि तरीही वजन घटवणारा आहे. गव्हाची जाडसर भरड म्हणजेच दलिया. दलियामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात. याशिवाय त्यात प्रथिने, फायबर आणि ब जीवनसत्त्व असते. ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे आहे त्यांना आहारतज्ज्ञ आहारात दलियाचा समावेश कऱण्यास सांगतात. आता दलियामुळे वजन कसे कमी होते. ते जाणून घेऊया…
फायबरचे सर्वाधिक प्रमाण
दलियामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. अन्नपचन होण्याासाठी शरीरात फायबरची आवश्यकता असते. तसेच शरीरातील सर्व क्रिया सुरळीत होण्यासाठी फायबर गरजेचे असते. फायबरचे साखरेत रुपांतर होत नसल्याने दलिया अतिशय कमी कॅलरीचा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे दलिया शरीरातील कॅलरीचे प्रमाण आटोक्यात आणण्यास उपयुक्त ठरतो.
ग्लायसेमिक इंडेक्स कमी
ज्यांच्या शरीरावर जास्तीची चरबी आहे त्यांनी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असणारे अन्न खाणे आवश्यक असते. वजन कमी करणाऱ्यांसाठी जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असणे धोक्याचे असते कारण त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. वजन कमी करण्याबरोबरच फायबर पदार्थाचा रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठीही उपयोग होतो.
सावकाश प्रक्रिया करणारे अन्न
दलिया हे शरीरात अतिशय सावकाश प्रक्रिया करते. हे शरीरात हळूहळू शोषले जात असल्याने पोट दिर्घकाळ भरल्यासारखे वाटते.
बद्धकोष्ठतेपासून सुटका
खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होणे गरजेचे असते. वजन कमी करण्यासाठी तर ते जास्त आवश्यक असते. नियमित दलिया खाल्ल्यास पोट चांगले राहण्यास मदत होते.
व्यायामासाठी ताकद मिळते
वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक असते. व्यायाम करायचा असल्यास शरीरात ताकद असणे गरेजेचे असते. दलिया हा ताकद देण्यासाठी उपयुक्त असतो.