जेवणादरम्यान मोबाइलचा वापर केल्याने शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स पातळीवर परिणाम दिसून येतो. त्यामुळे ही एक चिंतेची बाब समजली जाते. तसेच यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो असेही म्हटले जाते. पण, खरंच यामुळे शरीरावर काही परिणाम होतो का याविषयी आरोग्यतज्ज्ञांकडून जाणून घेऊ…
मुंबईतील परळमधील ग्लेनिगल्स हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिन सिनियर कन्सल्टेंट डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना नमूद केले की, जेवताना मोबाइल वापरल्याने खाण्यावरून लक्ष विचलित होते. पण, यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स पातळी वाढते की नाही हे सांगता येत नाही. असे मानले जाते की, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे जेवणादरम्यान लक्ष विचलित होते तेव्हा ती व्यक्ती अधिक खाते. यामुळे दैनंदिन गरजेपेक्षा ती व्यक्ती जास्त कॅलरीजचे सेवन करते. अशावेळी जास्त खाल्ल्याने वजन वाढू शकते, ज्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स पातळी वाढण्याची शक्यता वाढते,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले.
जेवताना मोबाइलच्या वापरामुळे व्यक्ती गरजेपेक्षा अधिक खाते, यावेळी नळकत ती कमी पौष्टिक आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाची निवड करू शकते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळीही वाढू शकते. या स्पाइक्समुळे इन्सुलिन रेझिस्टन्सचे प्रमाण वाढते.
जर जेवताना व्यक्तीचे लक्ष विचलित झाले तर ती शरीरास आवश्यक आणि पुरेश्या आहाराचे सेवन करत नाही, अशाने तृप्ततेच्या सिग्नलकडे लक्ष जात नाही, ज्यामुळे संतुलित आहाराचे सेवन करणं कठीण होतं. कालांतराने इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका निर्माण होतो, असे डॉ. अग्रवाल म्हणाले.
पण, जेवताना मोबाइल वापरल्यानंतर इन्सुलिन रेझिस्टन्सची पातळी वाढते, या दाव्याची पडताळणी करण्यासाठी कोणतेही संशोधन उपलब्ध नाही. याबाबत कोणतेही पुरावे नाहीत, म्हणूनच आहाराचे योग्य प्रमाणात सेवन करणं आणि चयापचय क्रिया चांगली ठेवण्यासाठी जेवताना अत्यंत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. योग्य प्रमाणात आहाराचे सेवन करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जेवताना टीव्ही पाहणे किंवा मोबाइल फोन वापरणे टाळले पाहिजे, असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.
जेवणादरम्यान पूर्णपणे त्यावरच लक्ष देणं. खाण्याच्या संवेदी अनुभवाकडे लक्ष देणे आणि शरीराच्या भूक आणि तृप्ततेच्या सिग्नलकडे लक्ष देणे म्हणजेच जेवताना सजग राहणे गरजेचे आहे. या पद्धतीमुळे व्यक्तीला खाण्याचा आस्वाद घेण्यास आणि काय आणि किती प्रमाणात खावे हे लक्षात येते, अशी माहिती कन्सल्टेंट डायटिशियन आणि डायबिटीज एज्युकेटर कनिका मल्होत्रा यांनी दिली.
मल्होत्रा पुन्हा म्हणाल्या की, जेवणादरम्यान मोबाइलचा वापर केल्याने इन्सुलिन रेझिस्टन्सची पातळी वाढते याबाबतचे कोणतेही थेट संशोधन नाही, पण तुमची खाण्याची गती आणि जागरुकता चयापचय आरोग्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जलद किंवा बेफिकीरपणे खाल्ल्याने रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत वाढ होऊ शकते, ज्यामुळे कालांतराने इन्सुलिन रेझिस्टन्सची पातळी वाढू शकते. हे विशेषतः टाइप २ मधुमेह किंवा मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका असलेल्यांसाठी चिंताजनक आहे.
अशा परिस्थितीत काय करावे?
जेवताना मोबाइल, टीव्ही अशा लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी बाजूला ठेवा. फक्त तुमच्या जेवणावर आणि खाण्याच्या कृतीवर लक्ष केंद्रित करा.
अन्नाची चव, पोत आणि सुगंध जाणून घेण्यासाठी वेळ काढा. यामुळे आनंद वाढतो आणि तुम्ही कधी समाधानी आहात हे ओळखण्यास मदत होते.
जेवण्यापूर्वी भूकेच्या संकेतांकडे लक्ष द्या आणि पोट भरल्यासारखे वाटल्यास खाणं थांबवा. ही जाणीव जास्त खाण्यापासून रोखू शकते.
जेवण्यापूर्वी तुमच्या जेवणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थोडा वेळ काढा. यामुळे अन्नाशी तुमचा संबंध वाढू शकतो आणि अधिक जागरूक दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो.
जर तुम्ही कुटुंबासह जेवत असाल तर अशावेळी मोबाइलऐवजी मनोरंजक संभाषणांवर लक्ष केंद्रित करा, यामुळे जेवणाचा अधिक आनंद घेऊ शकता. खाण्याचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते.
तुम्ही जेवताना मोबाइल बाजूला ठेवून खाल्ल्यास तुमची चयापचय क्रिया सुधारते, पोट योग्यरित्या भरते, अधिकचे अन्न सेवन टाळू शकता असेही मल्होत्रा म्हणाल्या.