Katrina Kaif Pregnancy: बॉलीवूडचं लोकप्रिय कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. लग्नाला चार वर्षं झाल्यानंतर आणि बऱ्याच चर्चेनंतर ही दोघं आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यास तयार आहेत. या कपलनं एकत्र इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही गोड बातमी शेअर केली. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं “आनंद आणि कृतज्ञतेनं भरलेल्या अंतःकरणासह आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय सुरू करायला निघालो आहोत ”

वरुण धवन, जान्हवी कपूर, आयुष्मान खुराना, सिद्धांत चतुर्वेदी अशा सगळ्या मित्रांनी आणि फिल्म इंडस्ट्रीतील लोकांनी कमेंट्स करीत त्यांना भरपूर प्रेमपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कतरिना कैफ, जी या वर्षी जुलैमध्ये ४२ वर्षांची झाली; तिच्यामुळे इतर महिलांना बळ आणि आशा मिळतेय की, आई होण्यासाठी उशीर झाला असला तरी या वयातही गर्भधारणा होऊ शकते. नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, नवी दिल्ली येथील फर्टिलिटी कन्सल्टंट डॉ. अस्वती नायर यांनी सांगितले की, वयानुसार महिलांची प्रजनन क्षमता (फर्टिलिटी रेट) बदलते.

“महिलांचा जन्म मर्यादित अंड्यांसह होतो आणि ही सर्व अंडी अंडाशयातच असतात. त्यामुळे महिलांची गर्भधारणेची संधी पुरुषांच्या तुलनेत कमी वयापर्यंतच असते. कारण- पुरुष जास्त वयातही वडील होऊ शकतात,” असे त्यांनी indianexpress.com ला सांगितले. परंतु, ४० वर्षांनंतरही गर्भधारणेची शक्यता पूर्णपणे नाकारली जात नाही, असे फर्टिलिटी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पण डॉ. नायर म्हणाल्या की, महिलांनी हे लक्षात घ्यावे की, ४० ते ४४ वयादरम्यान प्रत्येक मासिक पाळीच्या चक्रात गर्भधारणेची शक्यता फक्त पाच टक्के राहते आणि ४५ वर्षांनंतर ती फक्त एक टक्क्यावर येते.

गर्भधारणा करण्याचा विचार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

डॉ. अंबावरापु दिव्या रेड्डी, फर्टिलिटी स्पेशालिस्ट, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, एलबी नगर, हैदराबाद यांनी गर्भधारणा करण्यापूर्वी लक्षात ठेवावयाच्या काही गोष्टी सांगितल्या. त्यांच्या मते, स्त्रीरोग तज्ज्ञाकडून एकदा आरोग्य तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे प्रजनन आरोग्य समजते. त्यांनी सांगितले, “जर उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईडसारखे आजार आधीपासून असतील, तर त्याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.” दोन्ही जोडीदारांची लैंगिक आजारांसंबंधीची तपासणी करणेही आवश्यक आहे. तसेच कुटुंबात वंध्यत्वाचा इतिहास किंवा काही आनुवंशिक आजार असतील, तर त्याबाबतचेही मूल्यमापन करणे गरजेचे आहे.

तसेच जीवनशैलीतील गोष्टींवरही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. डॉ. रेड्डी म्हणाल्या, “जास्त वजन असल्यास ते कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहेआणि वजन जास्त नसले तरीही व्यायाम करणे तितकेच आवश्यक आहे.”

धूम्रपान, तंबाखूचे सेवन, मद्यपान, उशिरापर्यंत जागरण व ताणतणाव या सवयी शक्य तितक्या टाळायला हव्यात. तसेच फॉलिक अॅसिड, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन B12 व व्हिटॅमिन D यांनी भरलेला संतुलित आहार घ्यावा आणि दिवसाला किमान आठ-नऊ तास झोप घ्यावी, असे त्यांनी सांगितले. कमी ताण कमी आणि सकारात्मक दृष्टिकोन या बाबी सोपी आणि सुरळीत गर्भधारणा होण्याच्या दृष्टीने पूरक ठरतात.