Liver Donor Risks: लिव्हर डोनरचा मृत्यू होणं ही खूपच दुर्मीळ बाब असते. पण पुण्यात नुकतीच या संदर्भातील एक दु:खद घटना घडलीय, ज्यात ४२ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. तिनं नवऱ्याला यकृताचा एक भाग दान केल्यानंतर तिला कमी रक्तदाब आणि शरीरातील एकाच वेळी अनेक महत्त्वाचे अवयव नीट काम करणे थांबणं (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) अशा आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या. त्या घटनेनंतर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत की, यकृत प्रत्यारोपण (लिव्हर ट्रान्सप्लांट) प्रक्रिया खरंच सुरक्षित आहे का?
मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षांच्या कामिनी कोमकर यांनी १५ ऑगस्ट रोजी नवऱ्याला (बापू बाळकृष्ण कोमकर) यकृताचा एक भाग दिला. मात्र, शस्त्रक्रियेनंतर बापू यांचा मृत्यू झाला. कारण- त्यांचं शरीर यकृताच्या भागाचं ते प्रत्यारोपण सहन करू शकलं नाही. कामिनीही सुरुवातीला बऱ्या होत्या; पण नंतर त्यांना हायपोटेन्सिव्ह शॉक (म्हणजे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित न झाल्यानं ऑक्सिजन व पोषणद्रव्ये पेशींना न पोहोचणे) आला आणि त्यातून त्यांचे अनेक महत्त्वाचे अवयव (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) काम करेनासे झाले. अत्याधुनिक उपचार असूनही त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. आरोग्य विभाग या प्रकरणाची चौकशी करीत आहे. तर प्रत्यरोपण शल्यविशारद (ट्रान्सप्लांट सर्जन) व डॉक्टर्स सांगतात की, यकृत दान ही शस्त्रक्रिया सामान्यतः सुरक्षित असते.
“डोनरची योग्य ती तपासणी करून आणि योग्य ती काळजी घेतली, तर यकृत दानाची शस्त्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित असते. यकृत देऊन तुम्ही काही गमावत नाही; उलट एखाद्याला तुम्ही नवे आयुष्य देता आणि तोच सर्वांत मोठा आशीर्वाद आहे,” असे ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे येथील यकृत व इतर अनेक अवयव प्रत्यरोपण शल्यविशारद डॉ. बिपीन विभुते सांगतात.
“थोडासा धोका असतो; पण तो खूपच कमी प्रमाणात असतो. तसं पाहिलं, तर प्रत्येक शस्त्रक्रियेमध्ये थोडाफार धोका हा असतोच,” असे मेडिकव्हर हॉस्पिटल, पुणे येथील यकृत प्रत्यरोपण शल्यविशारद डॉ. हर्षल राजेकर सांगतात. यकृतदात्यामध्ये गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता एक टक्क्यापेक्षा कमी असते.
यकृतदात्याचा मृत्यू होणे फारच दुर्मीळ बाब असते. “जगभरातील उदाहरणं पाहता, गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता १% पेक्षा कमी आहे आणि मृत्यू होण्याचा धोका तर अतिशय कमी– फक्त ०.१% ते ०.२%,” असे डॉ. विभुते सांगतात. ते पुढे स्पष्ट करतात की, यकृत हा वेगळा अवयव आहे. कारण- तो कापलेला भाग पुन्हा वाढण्याची ताकद असते. म्हणजेच यकृतदात्याकडे राहिलेला भाग आणि रुग्णाला दिलेला भाग काही आठवड्यांत पुन्हा मोठा होऊन तो पूर्ववत सामान्य आकार धारण करू शकतो. यकृतदाता आणि रुग्णाची काटेकोर तपासणी केली, तर आणि अनुभवी पथक असेल, तर ठरावीक पद्धतीने केली जाणारी यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरक्षितरीत्या पार पडू शकते. इंटरनॅशनल लिव्हर ट्रान्सप्लांटेशन सोसायटीनुसार, भारतात २०२२ मध्ये ३,१८३ रुग्णांमध्ये यकृताचे प्रत्यारोपण केले गेले, जी जगात सर्वाधिक संख्या आहे.
दाता कोण होऊ शकतं?
दात्याची निवड प्रक्रिया खूप कठोर असते. “दात्याचे वय १८ ते ५५ वर्षे असावे, तो पूर्णपणे निरोगी असावा आणि त्याला मधुमेह, रक्तदाब किंवा यकृताचे आजार नसावेत. दात्याचा रक्तगट रुग्णाशी जुळायला हवा. तसेच रक्त तपासणी, सीटी स्कॅन / एमआरआय, हृदय तपासणी व मानसिक तपासणीही करावी लागते. फक्त पूर्णपणे सुस्थितीत आरोग्य असलेले लोकच दाते होऊ शकतात,” असे डॉ. विभुते सांगतात. हृदय व फुप्फुस तपासणीनंतरही मानसिक तपासणी का महत्त्वाची आहे, याचे स्पष्टीकरण डॉ. राजेकर देतात. “ही मोठी शस्त्रक्रिया असते आणि दात्याने चांगले काम केले याचा त्यांना अभिमान वाटायला हवा. हे सोपे काम नाही,” ते म्हणतात.
दात्याला कोणत्या अडचणी येऊ शकतात?
यकृतदानानंतर बहुतेक दाते चांगले बरे होतात. काहींना सुरुवातीच्या दिवसांत वेदना, रक्तस्राव, इन्फेक्शन किंवा पित्तगळती होऊ शकते. फारच क्वचित रक्ताच्या गुठळ्या किंवा यकृत नीट काम न करणे अशा मोठ्या अडचणी येऊ शकतात. पण, अशा समस्या खूप दुर्मीळ असतात आणि ९५% पेक्षा जास्त दाते पूर्ण बरे होऊन नेहमीसारखे जीवन जगतात.
यकृतदानासाठी काय करावे आणि काय करू नये?
निरोगी आहार घ्या आणि हलका व्यायाम करून सक्रिय राहा. ऑपरेशनपूर्वी डॉक्टरांनी दिलेल्या सगळ्या सूचना पाळा. औषधे वेळेवर घ्या आणि शस्त्रक्रियेनंतर पुनर्तपासणीसाठी जा. धूम्रपान करू नका, दारू पिऊ नका आणि यकृताला हानी पोहोचवणारी अनावश्यक औषधे घेऊ नका. शस्त्रक्रियेनंतर किमान तीन महिने जड वजन उचलणे टाळा. तज्ज्ञ सांगतात की, दाता नंतर पूर्णपणे सामान्य आणि निरोगी जीवन जगू शकतो.
“दाता लवकर बरा होतो आणि साधारणपणे १० दिवसांत रुग्णालयातून घरी जाऊ शकतो. यकृत पुन्हा वाढतं आणि चार ते सहा आठवड्यांत जवळपास ते सामान्य आकाराला येतं,” असे डॉ. राजेकर सांगतात. ते कॅडॅव्हरिक ऑर्गन डोनेशनलाही (म्हणजे मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव घेणे) तितकेच महत्त्व देतात.