झुंडबळी रोखण्यासाठी काय केले, हेही सांगावे

‘संघ आणि स्वदेशी’ हा अग्रलेख (१० ऑक्टोबर) वाचला. सरसंघचालकांनी आपल्या भाषणात झुंडबळीचा उल्लेख केला हे स्वागतार्ह आहेच; पण तो रोखण्यासाठी आपल्याकडून काय केले गेले, हे त्यांनी सांगणे अधिक स्वागतार्ह ठरले असते. झुंडबळीला आळा घालणारे देशातील पहिले राज्य म्हणून मणिपूर पुढे आले. त्याचबरोबर राजस्थानमध्ये त्याबद्दलचा कायदा अस्तित्वात आला. तुषार गांधी, तहसीन पूनावाला यांच्या जनहित याचिकेचा विचार करून प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या केंद्र सरकारकडून कशी ठोस पावले उचलता येतील, हे पाहिले पाहिजे. मुळात झुंडबळी केल्याने आपल्याला कसल्याच प्रकारची शिक्षा सुनावली जाणार नाही, असा समज असलेला वर्ग मोठा आहे. त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत; तसेच त्यांचे गंभीर परिणाम काय असतील, हे दाखवून दिले पाहिजे. मागे ‘मानव सुरक्षा कायदा’ अर्थात मासुकाची चर्चा झाली; पण ठोस काही पुढे आले नाही. मात्र झुंडबळीत मारला जाणारा गरीब संपतच आहे आणि मारणारे मोकाटच आहेत, अशी सद्य:स्थिती आहे. राजीव गौबा समितीकडूनही ठोस काही आलेले नाही. आता चेंडू सरळ सरकारच्या मैदानात आहे, इच्छा असेल तरच षटकार जाईल. स्थिती अशीच राहिली, तर त्याचा परिणाम ‘ग्लोबल टुरिझम इंडेक्स’वर काही काळात दिसेल; परदेशी नागरिकांना भारत सुरक्षित वाटणार नाही. त्याचा परिणाम गुंतवणुकीवर होईल. अर्थव्यवस्थेला आणखी नकारात्मक चालना मिळेल. त्यामुळे विषयाला हात घातलाच आहे, तर कायदा अस्तित्वात आणून खरी ती सहानुभूती दाखवावी असे वाटते.

– विजय देशमुख, दिल्ली

बैल गेला अन् झोपा केला!

‘‘पीएमसी’सारखे प्रकार रोखणार! – बहुराज्यीय सहकारी बँकांबाबत कायद्यात दुरुस्तीचे सीतारामन यांचे सूतोवाच’ ही बातमी (लोकसत्ता, ११ ऑक्टोबर) वाचून ‘बैल गेला अन् झोपा केला’ या म्हणीची आठवण झाली. बँक कायद्यात दुरुस्ती करून हे आर्थिक घोटाळे थांबणार आहेत का? मोबाइलमधील विदा हॅक केली जाते, एटीएममधून लोकांचे पैसे चोरले जातात; मग हे आर्थिक घोटाळे थांबू शकतील काय? मुळात नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना बँकेने लाखो रुपयांची कर्जे मंजूर करताना, ती कशाच्या जोरावर केली गेली? हेच मोदी आणि चोक्सी घेतलेले कर्ज बुडवून परदेशात पसार झालेच कसे? काहीही असले, तरी सामान्य माणूस मात्र यात भरडला जात आहे. आपलेच घामाचे पैसे व ते मिळण्यासाठी आपणच मनस्ताप सहन करायचा. एखाद्या बँकेचे लेखापरीक्षण केले जाते, तेव्हा सर्व काही आलबेल असल्याचे भासवले जाते. मग अचानक हे आर्थिक घोटाळे बाहेर येतात कसे? थोडक्यात, या ठिकाणी ‘कथा कुणाची, व्यथा कुणा’ असाच प्रकार झाला.

– गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली पूर्व (मुंबई)

राज्यपाल ‘ईपीएस-९५’ संदर्भात बोलतील काय?

‘राज्यपालांच्या भाषणातून मोदी सरकारचा प्रचार’ ही बातमी (लोकसत्ता, ११ ऑक्टोबर) वाचली. ‘ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी’ या म्हणीप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी केंद्र सरकारची भलामण करीत असावेत. परंतु खासगी क्षेत्रातील ईपीएस-९५ अंतर्गत सेवानिवृत्त कामगारांच्या पेन्शनवाढीसंदर्भात केंद्र सरकारने याच कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीने पेन्शनवाढीची शिफारस करूनही आजपर्यंत पेन्शनवाढ दिलेली नाही. कोश्यारी यांनी केंद्र सरकारने त्यांचाच अहवाल का बासनात बांधून ठेवला आहे, तेही जनतेला सांगावे.

– अनंत आंगचेकर, भाईंदर

काँग्रेसची सैरभैरावस्था लोकशाहीसाठी चिंताजनक

‘चिंतन कसले करता?’ हे संपादकीय (११ ऑक्टोबर) वाचले. काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्य भारतीयांच्या स्वभाव, अपेक्षा आणि प्रेरणांचे सुयोग्य प्रतिबिंब असल्याने स्थापनेपासूनच सर्व स्तरांतील जनतेचा अभूतपूर्व पाठिंबा त्या पक्षाला मिळाला. परंतु अर्धशतकाहून जास्त काळ देशावर अधिराज्य गाजविल्यानंतरही केवळ एक-दोन पराभवांनी या पक्षाची अवस्था पूर्णत: गलितगात्र, सैरभैर होणे हे केवळ त्या पक्षाच्याच नाही, तर एकूणच लोकशाहीच्या भवितव्यासाठी चिंताजनक आहे. याचे मूळ कारण हे अर्थातच मुद्दय़ांचे राजकारण करण्याऐवजी सतत व्यक्तिमाहात्म्याचे ढोल वाजवायचे आणि त्यायोगे घराणेशाहीचा अतिरेक हेच आहे.

काँग्रेसची ही अवस्था होऊ  शकते याचा अंदाज पक्षाच्या धुरीणांना इतक्या वर्षांत आला नसेल का? पण एकदा का ‘खुशामतखोरी म्हणजेच पक्षनिष्ठा’ अशी मांडणी स्वीकारली की परखडपणे बोलणाऱ्यांचा आवाज क्षीण होणे क्रमप्राप्तच होते.

– चेतन मोरे, ठाणे</p>

विवेकानंद काय म्हणाले नाहीत?

‘विवेकानंद काय म्हणाले?’ या मथळ्याचे पत्र (‘लोकमानस’, ११ ऑक्टोबर) वाचले. त्यात- ‘शंकराचार्यानी वादात हरवून किती तरी बौद्ध श्रमणांना जाळून मारले’ या ‘विवेकानंद ग्रंथावली’तील उद्धृत केलेल्या वाक्यामुळे ‘विवेकचुडामणी’सारख्या रचनांचे कर्ते शंकराचार्य हे खुनी आणि श्रमणांना जाळून मारण्याइतके क्रूर होते, असा काहींचा समज होऊ शकतो. तर.. वादात हरवल्यावर प्रतिस्पध्र्याना पेटवून देण्याची पद्धत प्राचीन भारतात नव्हती. शंकराचार्याच्या कोणत्याही चरित्रात त्यांनी कोणाला जाळल्याचे उल्लेख नाहीत. स्वामी विवेकानंद (खंड ४, पृष्ठ ४७ वर) ‘शंकराचार्यानी वादात हरवून किती तरी बौद्ध श्रमणांना जाळून मारले’ एवढेच वाक्य म्हणून थांबले नाहीत. त्यांचे पुढचेच वाक्य असे आहे : ‘आणि त्या बौद्ध श्रमणांच्या अकलेची तरी शर्थच की नाही! वादात हरले म्हणून स्वत:ला जाळून घेतले!’ तेव्हा विवेकानंद जे म्हणाले, ते पूर्णपणे वाचायला हवे!

पत्रलेखकाकडील ‘ग्रंथावली’ची आवृत्ती कोणती आहे, याची कल्पना नाही. पण- ‘बौद्ध धर्म भारतातून चीन, जपान, कोरिया येथे पोहोचला; मात्र सनातन धर्माने बौद्ध धर्माची नावनिशाणीसुद्धा या देशात बाकी ठेवली नाही,’ हे त्यांनी उद्धृत केलेले वाक्य आठव्या आवृत्तीतील खंड ४च्या पृष्ठ-४७ वर नाही. बौद्ध धर्माच्या अवनतीवर विवेकानंदांनी सविस्तर भाष्य (खंड ४, पृष्ठ- ४८ वर) केले आहे, ते असे : ‘बौद्ध धर्माची ही अवदशा झाली त्यांच्या अनुयायांच्या दोषांमुळे. तत्त्वज्ञानाचा अत्याधिक विचार करून करून ते तर्ककर्कश झाले व त्यांची उदार सहृदयता लोपली. नंतर वामाचारातील व्यभिचाराने त्या धर्मात प्रवेश केला व अखेर त्यामुळे बौद्ध धर्म गारद झाला! तसल्या प्रकारचा बीभत्स वामाचार आजच्या कुठल्याही तंत्रातून आढळणार नाही.’ थोडक्यात, सनातन धर्माने बौद्ध धर्माचे आजच्या भाषेत ‘लिंचिंग’ केल्यामुळे तो गारद झाला, असे विवेकानंद म्हणाले नाहीत.

– डॉ. सुप्रिया सहस्रबुद्धे, पुणे</p>