सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष गुरू-चंद्राचा लाभयोग हा प्रगतिकारक योग आहे. आपल्यातील गुणांचा आणि उपलब्ध स्रोतांचा पूर्णपणे उपयोग करून संकटावर मात कराल. नोकरी-व्यवसायात आपले मत मांडताना शब्द सांभाळून वापरावेत. सहकारीवर्गाकडून कामे चोख पार पडतील. जोडीदार आपणास हिंमत देईल. त्याच्या कामातही त्याचे गुण उठून दिसतील. मुलांना आर्थिक मदत कराल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. डोळे, घसा आणि छाती यांचे आरोग्य सांभाळावे. व्यायाम, आहार आणि विश्रांतीची त्रिसूत्री अवलंबावी.

वृषभ रवी-शनीचा नवपंचमयोग हा जिद्दीला यशाची जोड देणारा योग आहे. महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. सहकारीवर्गाला कामाच्या बाबतीत उत्तेजन द्याल. जोडीदाराला त्याच्या गुणवत्तेपेक्षा कमी लाभ मिळाल्याने त्याची कामाच्या बाबतीतील उदासीनता वाढेल. त्याला आपण उभारी द्यावी. कुटुंब सदस्यांचा आधार वाटेल. मुलांच्या कामांना गती मिळेल. डोळ्यांना उष्णतेचे त्रास सतावतील. घसा धरणे, खवखवणे अशा तक्रारी संभवतात.

मिथुन चंद्र-मंगळाचा लाभयोग हा आत्मविश्वासवर्धक योग आहे. काही महत्त्वाचे निर्णय पक्के कराल. त्यानुसार कृतीदेखील कराल. नोकरी-व्यवसायात आपल्या मतांना मान्यता मिळेल. ज्येष्ठ वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारीवर्गाच्या समस्या समजून घ्याव्या लागतील. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात उत्साहकारक घटना घडतील. एकमेकांचा सहवास सुखावह वाटेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. मुलांना त्यांचे विचार मांडण्याची संधी द्याल. अपचनाच्या तक्रारी उद्भवतील.

कर्क चंद्र-मंगळाचा नवपंचमयोग हा उत्साहवर्धक आणि आशादायक ठरेल. परिस्थतीनुसार आचरणात आवश्यक ते बदल कराल. नोकरी-व्यवसायात अचानक काही निर्णय बदलावे लागतील. मनाची तयारी असावी. सहकारीवर्गाची चांगली मदत होईल. जोडीदाराच्या कामातील अडचणी दूर करताना त्याची मानसिक दमणूक होईल. कौटुंबिक ताण हलका करण्यासाठी आपला छंद जोपासवा. मुलांच्या कलागुणांना योग्य दाद द्याल. पायाचे दुखणे आणि पोटाच्या तक्रारी डोकं वर काढतील.

सिंह बुध-नेपच्यूनचा केंद्रयोग हा स्फूर्तिदायक आणि नवनिर्मितीचा कारक योग ठरेल. आपली मते नव्या शब्दात मांडाल. नोकरी-व्यवसायात कायदेविषयक कामांना गती द्याल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारीवर्गाची सर्जनशीलता कामी येईल. जोडीदाराच्या चांगुलपणाचा लोक फायदा घेतील. त्याला सावध करा. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीच्या वार्ता मिळतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कष्टाचे चीज होईल. नव्या बदलाची चाहूल लागेल. कामातून वेळ काढून नियमितपणे व्यायाम करावा.

कन्या चंद्र-शनीचा लाभयोग हा शिस्तीचे धडे देणारा योग आहे. ठरवलेल्या गोष्टींमध्ये चालढकल न करता सातत्य राखण्याचा प्रयत्न कराल. नोकरी-व्यवसायात रखडलेल्या कामांना प्राधान्य द्यावे. सरकारी कामेदेखील मार्गी लागतील. सहकारीवर्गाच्या मेहनतीचे फळ मिळेल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. त्याचा सल्ला उपयोगी पडेल. मुलांच्या बाबतीत अतिरिक्त सूट न देता त्याच्यासह मोकळा संवाद साधावा. ग्रंथीची वाढ, स्नायूंमध्ये गुठळी होण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी.

तूळ गुरू-शुक्राचा नवपंचमयोग हा ज्ञानवर्धक आणि तंत्रज्ञानाला पूरक ठरणारा योग आहे. संशोधनकार्यात नव्या घटना घडतील. नोकरी-व्यवसायात शब्द जपून वापरावेत. सहकारीवर्ग आपणास सांभाळून घेईल. संयम राखावा. जोडीदाराची साथ चांगली लाभेल. त्याच्या कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होतील. मुलांची कामे मार्गी लागल्याने दिलासा मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. नातेवाईकांना मदत कराल. आतडे, रसवहिन्या यांच्या कार्यात बिघाड झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

वृश्चिक चंद्र-नेपच्यूनचा युतियोग हा उत्साहवर्धक आणि स्फूर्तिदायक योग आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. नाती दृढ होतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल. नव्या संधी उपलब्ध होतील. सहकारीवर्गाकडून सरकारी कामांच्या पूर्णतेबाबत मदत मिळेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात तो आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवेल. मुलांना हिमतीने पुढे जाण्यास उद्युक्त कराल. नातेवाईकांकडून आनंदवार्ता समजेल. अचानक कमरेत उसण भरेल. विशेष काळजी घ्यावी लागेल.

धनू चंद्र-बुधाचा लाभयोग हा आर्थिक स्थैर्य देणारा योग आहे. विविध खर्चाची आणि गुंतवणुकीची योग्य आखणी आणि विभागणी कराल. नोकरी-व्यवसायात सर्वाच्या हिताचे निर्णय घ्याल. वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. सहकारीवर्ग कामाचा मोठा आणि महत्त्वाचा भाग यथायोग्य सांभाळतील. जोडीदार त्याच्या कामातील बारकावे टिपून निगुतीने कामे पूर्ण करेल. कौटुंबिक आधार मिळाल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढेल. गुडघ्याजवळील स्नायुबंध फाटण्याची वा तुटण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी.

मकर रवी-चंद्राचा लाभयोग हा आत्मविश्वासवर्धक योग आहे. नव्या संधीचे सोने कराल. नोकरी-व्यवसायात आपली बाजू वरिष्ठांपुढे प्रभावीपणे मांडाल. सहकारीवर्गाच्या मदतीने आपल्या आसपास होणाऱ्या अन्यायाला वा चुकीच्या गोष्टींना आळा घालाल. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. काही नव्या उपक्रमात तो हिरिरीने सहभागी होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या दोघे मिळून चांगल्या प्रकारे पार पाडाल. मुलांना स्वत:चे निर्णय स्वत:च घेण्याची संधी द्याल. मूत्रविकार व वातविकार सतावतील.

कुंभ चंद्र-बुधाचा केंद्रयोग हा ज्ञानवर्धक आणि व्यावहारिकतेला पुष्टी देणारा योग आहे. नव्या क्षेत्रातील प्रशिक्षण उपयोगी ठरेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या प्रश्नांना बिनचूक आणि मुद्देसूद उत्तरे द्यायचा प्रयत्न कराल. सहकारीवर्गाच्या साहाय्याने कामाला गती मिळेल. जोडीदाराची त्याच्या कार्यक्षेत्रात समाधानकारक प्रगती होईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या तब्येतीची योग्य ती काळजी घ्याल. मानसिक ताण वाढेल. मान, खांदे आणि दंड आखडल्यास वैद्यकीय सल्ल्याने व्यायाम करावा.

मीन चंद्र-शुक्राचा केंद्रयोग हा प्रेम, ममता या भावनांना प्रेरणा देणारा आहे. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडून आपलेपणाचा ओलावा अनुभवण्यास मिळेल. नोकरी-व्यवसायात गरजवंतांना मदत कराल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारीवर्गावर मोठय़ा जबाबदाऱ्या निर्धोकपणे सोपवाल. जोडीदाराचा आत्मविश्वास आणि हिंमत यांची दाद द्याल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मुलांना स्वत:चे निर्णय घेताना आपल्या मार्गदर्शनाची गरज भासेल. मणक्याचे आजार बळावतील.