09 March 2021

News Flash

लोकजागर : बर्ड फ्लू परतलाय!

करोना विषाणूचे सावट कायम असतानाच आता बर्ड फ्लूची दहशत पसरली आहे.

एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला या विषाणूचा संसर्ग होण्याची भीती नसली, तरी याआधीच्या बर्ड फ्लूच्या साथींनी कुक्कुटपालन उद्योगाचे मात्र प्रचंड नुकसान केले आहे.

पार्थसारथी बिस्वास, अनुराधा मास्करेन्हस – response.lokprabha@expressindia.com

करोना विषाणूचे सावट कायम असतानाच आता बर्ड फ्लूची दहशत पसरली आहे. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला या विषाणूचा संसर्ग होण्याची भीती नसली, तरी याआधीच्या बर्ड फ्लूच्या साथींनी कुक्कुटपालन उद्योगाचे मात्र प्रचंड नुकसान केले आहे. सध्या पसरलेल्या साथीमुळे अनेक राज्यांत पक्ष्यांचे मृत्यू झाले आहेत, मात्र त्यापैकी बहुतेक पक्षी हे पाळीव नाहीत.

केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या पक्षीमृत्यूंना एव्हियन एन्फ्लुएन्झा म्हणजेच बर्ड फ्लूच कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महाराष्ट्रातही हाय अलर्ट जारी करण्यात आला. ज्या राज्यांमध्ये कावळे, स्थलांतरित किंवा अन्य पक्ष्यांच्या मृत्यूच्या घटना घडत आहेत, ती राज्ये नमुन्यांची तपासणी करवून घेण्यासाठी आणि हा बर्ड फ्लू तर नाही ना, हे जाणून घेण्यासाठी सध्या धडपडत आहेत.

संसर्ग

बर्ड फ्लू किंवा एव्हियन एन्फ्लूएन्झा हा एका विशिष्ट प्रकारच्या विषाणूसंसर्गामुळे होणारा आजार असून तो मुख्यत्वे पक्ष्यांमध्ये पसरतो. काही वेळा माणसांना किंवा अन्य प्राण्यांनाही त्याचा संसर्ग होऊ शकतो. या विषाणूचा पक्ष्यांच्या श्वसनसंस्थेवर गंभीर दुष्परिणाम करणारा आणि सर्वाधिक प्रमाणात आढळलेला प्रकार म्हणजे एच ५ एन १. एच ७, एच ८ सारखे अन्यही अनेक प्रकार संसर्गाला कारणीभूत ठरू शकतात.

हा विषाणू सर्वप्रथम १९९६ साली चीनमध्ये हंसासारख्या पक्ष्यांमध्ये आढळला. तेव्हापासून जगभरात विविध देशांत वरचेवर याच्या साथी पसरत राहिल्या आहेत. भारतात २००६साली नंदूरबारमध्ये या विषाणूची लागण झाल्यामुळे प्रचंड मोठय़ा संख्येने पाळीव पक्ष्यांना जीव गमावावा लागला होता.

सध्या पसरलेल्या साथीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळमधील पक्ष्यांच्या शरीरात एच ५ एन ८ प्रकारचा तर हिमाचल प्रदेशातील पक्ष्यांच्या शरीरात एच ५ एन १ प्रकारचा विषाणू आढळला आहे.

मानवाला लागण

एच ५ एन १ विषाणूचा संसर्ग पक्ष्यांकडून अन्य प्राण्यांना होऊ शकतो. अशा स्वरूपाच्या संसर्गाचा पहिला रुग्ण १९९७ मध्ये हाँगकाँगमध्ये आढळला होता. पक्ष्यांशी जवळचा संपर्क आल्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायातील कर्मचाऱ्याला त्याची लागण झाली होती. बर्ड फ्लूच्या बाबतीत सर्वाधिक काळजीचे कारण म्हणजे यात मृत्युदर ६० टक्के एवढा प्रचंड आहे. माणसाकडून माणसाला संसर्ग झाल्याची अद्याप एकही घटना निदर्शनास आलेली नाही. केवळ पक्षी किंवा पक्ष्यांचे मृतदेह हाताळणाऱ्या व्यक्तींनाच आजवर या विषाणूचा संसर्ग झाला आहे.

प्रमाण किती?

२००६पासून ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत भारतात बर्ड फ्लूच्या २२५ केंद्रांची नोंद झाली. या आजारामुळे आजवर ८३ लाख ४९ हजार पक्ष्यांची कत्तल करावी लागली आहे. कुक्कुटपालन करणाऱ्यांना २६ कोटी ३७ लाख रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. देशात बर्ड फ्लूची साथ सर्वप्रथम महाराष्ट्र पसरली पण विशेष म्हणजे त्यानंतर २०२० पर्यंत एकदाही राज्यात ही साथ पसरलेली नाही. ओदिशा, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये मात्र पाळीव आणि वन्य पक्ष्यांमध्ये या साथी वारंवार पसरताना दिसतात. सध्या मुख्यत्वे वन्य पक्षी, कावळे आणि स्थलांतरित पक्ष्यांमध्ये ही साथ पसरल्याचे बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजचे डीन डॉ. ए. एस. रानडे सांगतात. २००६पासून कुक्कुटपालन करण्यात येणाऱ्या जागांभोवती जैवसुरक्षा क्षेत्रे तयार करण्यात आली आहेत. त्याद्वारे विक्रीच्या उद्देशाने वाढवण्यात येणाऱ्या पाळीव पक्ष्यांचा अन्य वन्य पक्ष्यांशी येणारा संपर्क रोखला जातो, अशी माहितीही डॉ. रानडे यांनी दिली.

कोंबडय़ा, मांस आणि अंडी

डॉ. रानडे यांच्या मते, आग्नेय आशियाच्या तुलनेत भारतात बर्ड फ्लूचा माणसांना संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी असते. आणि त्याला कारण आहे आपली खाद्यसंस्कृती. ‘७० अंश सेल्शियसपेक्षा अधिक तापमानात हा विषाणू निष्प्रभ होतो. भारतात अंडी आणि मांस नीट शिजवूनच खाल्ले जाते. १०० अंश सेल्शियसपेक्षा अधिक तापमानाला अन्न शिजवले जात असल्याने विषाणू निष्प्रभ होतो. त्यामुळे कोंबडी किंवा अंडी खाल्ल्यामुळे माणसांना या विषाणूची लागण होण्याची शक्यता अतिशय अपवादात्मक असते,’ असेही त्यांनी सांगितले.

राज्यात आतापर्यंत सुमारे दोन हजार पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळमध्ये २००, अमरावतीत ११, अकोल्यात २०० कोंबडय़ा दगावल्या. संसर्ग रोखण्यासाठी हजारो पक्ष्यांची कत्तल करण्यात आली आहे.

संपूर्ण देशाचा विचार करता देशात दरमहा सरासरी ३० कोटी कोंबडय़ा आणि ९०० कोटी अंडी खाल्ली जातात. कोविड साथीच्या सुरुवातीच्या काळातही कुक्कुटपालन आणि त्यावर आधारित उद्योगांना मोठा फटका सहन करावा लागला होता. या नुकसानातून कुक्कुटपालन व्यवसाय कसाबसा पुन्हा उभा राहिला, तरीही सध्या उत्पादन क्षमता कमीच ठेवण्यात आली आहे.

पक्षीमृत्यूच्या घटना

गुजरात – १२४ स्थानिक पक्ष्यांचा मृत्यू झाला असून त्यात ७० कावळे आणि सहा स्थलांतरित प्रजातींचा समावेश आहे.

ओदिशा – खुद्रा तालुक्यात १२० कोंबडय़ांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोणत्याही नमुन्यात बर्ड फ्लूचा विषाणू आढळलेला नाही, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेश – सोनभद्र जिल्ह्य़ात १० कावळे मृतावस्थेत आढळले आहेत. त्यांचा मृत्यू थंडी आणि प्रदूषणामुळे झाला असावा, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

राजस्थान – शुक्रवापर्यंत दोन हजार १६६ पक्ष्यांचे मृत्यू नोंदवण्यात आले होते. त्यात एक हजार ७०६ कावळे आणि १३६ मोरांचा समावेश आहे.

छत्तीसगड – गुरुवारी चार कावळे मृतावस्थेत आढळले. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

दिल्ली – गेल्या काही दिवसांत दिल्लीत २० कावळे मृतावस्थेत आढळले. त्यांचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

(अनुवाद : विजया जांगळे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 7:34 am

Web Title: bird flu returned lokjagar dd70
Next Stories
1 आदरांजली : सूर्यसाधक
2 राशिभविष्य : १५ जानेवारी ते २१ जानेवारी २०२१
3 बर्फवृष्टीत दौडत आलं पार्सल
Just Now!
X