बोटांना मुंग्या आल्या होत्या, डोकं बधीर झालं होतं. फोन खाली ठेवून दिला आणि दूर सारलं त्याला. विचार केला, काय ही अवस्था, आणि एक वाक्य सुचलं, ‘बधीर बोटे मुंग्यांनी, अन् डोके updates  च्या भुंग्यांनी.’ वाटलं, अरे हा तर मजेदार status message  होऊ शकतो likes  आणि smiles  मिळवणारा. म्हणून मी पुन्हा फोन हातात घेतला आणि लिहून टाकला हा मेसेज wall वरती.
दुपारी मला कंटाळा आला; तो केव्हाही येतो. जाम बोअर होत होतं, असं sad sad िवाटत होतं उगाचंच. दिला टाकून एक status message, “feeling sad” असा. काहींनी आस्थेनं ‘का, काय झाल?’ अशा अर्थाच्या comments  टाकल्या तर काहींनी चक्क like  केलं त्याही status  ला. आणि काहींनी तत्त्वज्ञान पाजळलं, दु:खं म्हणजे नक्की काय वगैरे सांगणारं. काही वेळात मी ‘Happy again’ असा status message  टाकला. (काहीच उद्योग नसल्यानं मी टी.व्ही.चे channels scroll करत बसले होते. अचानक एका channel  वर मला माझा आवडता चित्रपट लागल्याचं दिसलं होतं आणि त्यावर माझी ही ‘happy reaction होती). याहीवेळी काही likes, आणि काही ‘का, कसं काय’ अर्थाच्या, तर काही ‘आनंद म्हणजे काय, आणि सुख हे कसं मानण्यावर असतं वगैरे आशयाच्या comments  आल्या.
काही वेळाने notification  आलं, एका मित्राने आपलं status update केल्याचं. त्याचं नवं status  होतं तीन ठिपके.. यावर comment  म्हणून दुसऱ्या एका मित्राने चार ठिपके, तिसऱ्याने पाच, असं करत करत साधारण ८-१० लोकांनी एक-दोन ठिपके वाढवून त्या comments  च्या मालिकेत स्वत:ची अशी भर घातली होती. काही तासांनी पहिला ठिपका टाकणाऱ्याचीच comment  आली, एक ठिपका (पूर्णविराम असा अर्थ असावा त्याचा.) शब्दाविण संवादू म्हणतात ते यालाच.
संध्याकाळी मी एका फोटोमध्ये tag  झाल्याचं notification  आलं. फोटोमध्ये मी नव्हते. पण ‘मी फोटो टाकला आहे, तो पहा’ असं सांगण्यासाठी, माझ्या एका मैत्रिणीने, मलाच नाही तर इतरही काही मित्र-मैत्रीणींना त्यात tag  केलं होतं. थोडक्यात काय तर फोटो वरती नावं सगळ्यांची, पण चेहरा एकाचाही नाही अशी परिस्थिती होती. या Internet  च्या जगात काही जण आपला चेहरा लपवतात, काही जण तो बदलतात, तर काही लोक आपला चेहराच हरवतात. असो.
एकदा बसने प्रवास करत होते. माझ्या हातात स्मार्टफोन असल्यामुळे मला खिडकीतून बाहेर बघण्यात रस नव्हता. धावणारा रस्ता, पाळणारी झाडं असल्या गोष्टी पहायला अर्थातच माझ्याकडे वेळ नव्हता. माझं 3G on होतं आणि मी कोणी कुठे upload केलेली चित्र, update  केलेले profiles, मला पाठवलेली पत्र, माझ्याशी share  केलेले videos  वगैरे पाहण्यात मग्न होते. काही unread messages उघडले तर त्यात २—३ विनोद होते, jokes  हो. ते वाचून मी जोरात हसले, तसे आजूबाजूचे काही लोक माझ्याकडे अचंबित होऊन पाहू लागले, तर काहींना लक्षातही नाही आलं माझं हसणं. कारण तेही आपापल्या ‘smart’ जगात गर्क होते. आणि माझ्या लक्षात नाही आलं मी त्या २-३ पैकी नक्की कोणत्या विनोदावर हसले ते! त्यातला एखादा सांगितला असता आत्ता, पण एकही आठवत नाहीये.
दिसतं खूप काही, पण भिडत काहीच नाही, पाहून सगळं होतं; आपण पोचत कुठेच नाही. बोटांना मुंग्या येतात, डोळे थकतात, आपण कशावर काय प्रतिक्रिया देतोय कळत नाही. overburden  झालेलं डोकं बधीर होतं आणि मग भावनांची सरमिसळ होते सगळी, आणि भाषेचीही. आपला फोन मिरवत असतो भली मोठी contacts’ list  पण contacts  असतात कमी; आपले mail  आणि social networking accounts मिरवत असतात, लांब friends’ lists पण friends   असतात कमी; आपण असतो खूप circles  चा भाग, पण सहभाग असा नाही. या Internet   च्या आभासी जगात खरंच का सगळंच असतं आभासी?
हे आत्ताचं वाक्य जर मी.. १०—१२ likes  तरी नक्कीच मिळतील, नाही?