विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
मुंबईतली घरं म्हणजे तशी खुराडीच; हे वाक्य तर त्यानं एवढय़ा वेळेला ऐकलं होतं की, आपलं घर झालं स्वतचं, तर ते खुराडं नक्कीच असणार नाही, असं त्यानं मनोमन ठरवलं होतं. त्याचं बालपणही काही खूप मोठय़ा घरात गेलं नव्हतं. कोकणातलं साधंसंच, पण गर्द हिरवाईत लपलेलं घर. आताशा शहरात येऊन २० र्वष होत आली होती आणि अखेरीस ते स्वप्नही साकार झालं.. स्वत:चं घर!

घर सजवलं असं नाही म्हणता येणार, कारण ते त्याला फर्निचरने सजवायचं नव्हतंच. मोजक्याच गोष्टी होत्या घरात. दोन छोटेखानी टेबलं, एक बैठं टीपॉय. म्हणजे म्हटलं तर टीपॉय; कारण त्याची रचना त्याने अशी केली होती की, प्रसंगी इन्डोअर फोटोशूटसाठी रिफ्लेक्टर म्हणून वापरता येईल. त्याच्यासोबत अगदी लहान त्यानेच डिझाइन केलेल्या चार बैठका, आतमध्ये सामान ठेवण्याची सोय.

घरात मुबलक काय तर हवा आणि प्रकाश! तो तर फोटोग्राफी करणारा. फोटो म्हणजे प्रकाश आणि ग्राफ म्हणजे चित्र. प्रकाशाने चितारलेलं चित्र. म्हणूनच त्याला घरात मुबलक प्रकाश हवा होता आणि त्यातही प्रकाशाच्या अनेक छटा. त्यामुळेच घराच्या काही खिडक्यांवर स्टेनग्लासची हलती रचना होती. त्या विविधरंगी स्टेनग्लासमधून आरपार येणारा प्रकाश ही वेगळीच गंमत होती. आणि आता लॉकडाऊनमध्ये घरात बसून गेल्या काही दिवसात या घराचाच सतत विचार करताना तो स्वतच या घराच्या पुनपुन्हा प्रेमात पडत होता. स्टेनग्लासमधून येणाऱ्या प्रकाशाचे मनोहारी विभ्रम दिवसाच्या प्रहरागणिक प्रकाशाच्या संगतीत बदलत जायचे. स्टेनग्लास तीच पण प्रहराचा प्रकाश बदलला की, विभ्रमही बदलायचे. अलीकडे लॉकडाऊनमध्ये तर काही वेळेस तो त्या स्टेनग्लासच्या रचनांकडे तासन्तास पाहत राहायचा आणि त्याचा आनंदही लुटायचा!

त्याने मित्रांची, मैत्रिणींची आणि कलावंतांचीही खूप घरं पाहिली होती. ती पाहताना आपलं घर कसं असेल असा विचार तो करायचा. काही निर्णय त्याने त्याच वेळेस घेतले होते. अनेकांच्या घरांमध्ये भिंतींवर रंगपंचमीच असते. ती माफक असेल तर ठीक नाही तर अनेकदा ते रंगच बीभत्स होऊन अंगावर येतात. अगदी बालपणापासूनच त्याला पांढराशुभ्र रंग खूप आवडायचा. नंतर कळायला लागल्यानंतर तर हेही लक्षात आलं की या रंगात सर्व रंगांचं मिश्रण असतं. शालेय क्रमिक पुस्तकांतला प्रकाशाच्या एका तिरिपीतून इंद्रधनुष्य दाखवणारा ‘रमण परिणाम’ तर त्याला त्यासाठीच लक्षात राहिला होता! त्याच्या घराच्या सर्व भिंती शुभ्र होत्या. त्याची गंमत घरातली हिरवाई अनुभवताना अधिक जाणवायची.

घर लहानसंच, वन बेड, हॉल, किचन. पण प्रत्येकाला जाणवायची ती स्पेस, अवकाश! मोकळी जागा भरपूर होती. वैशिष्टय़पूर्ण जागा भरल्या होत्या तब्बल ११० कुंडय़ांनी! ही हिरवाई हे त्याच्या आनंदाचे निधान होते, त्याची साथसंगत, आयुष्याची रंगतही! गॅलरीमधली बोगनवेल खालून जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधायची. घराच्या फ्रेंच विंडोतून दिसायचीही छान! तिच्या फुलपाकळ्यांतून झिरपणारा प्रकाशही तसाच प्रहरागणिक बदलणाऱ्या प्रकाशाची गंमत दाखवणारा स्टेनग्लाससारखा!

जरा मोकळं व्हावं म्हणून बाथरूम- टॉयलेटमध्ये जावं तर तिथंही लागणाऱ्या सर्व गोष्टी लष्करी शिस्तीत मांडलेल्या आणि सोबत मिनिएचर शोप्लान्टस् ओळीत मांडलेली. या घराला भेट दिलेल्या प्रत्येकाला आवडेलच आणि प्रेमातही पाडेल असं या घरात प्रत्येकासाठी काही ना काही होतंच. अनेकांचं मत होतं की, त्याची ही बाथरूम- टायलेट म्हणजे मिनिएचर शोप्लान्टस्चं ‘लाइव्ह म्युझियम’च!

या त्याच्या घराला आणखी एक परिमाण होतं ते आवाजाचं. प्रकाशासोबत हवाही इथे खेळायची! आणि मग त्या किणकिणणाऱ्या सिंिगग बेल्समधून वेगळंच संगीत पाझरायचं.. आणि तेव्हाच आसमंतात सुगंध भरून राहिलेला असायचा.. बोगनवेलीशीच थोडं खेटून पूर्णपणे फुललेल्या कौमुदीचा!