05 April 2020

News Flash

मेक टू ऑर्डर : आमच्याकडच्या सर्जरी वैद्यकीय गरजेनुसारच – डॉ. विनिता पुरी

दिवाळी २०१४ स्तनांच्या अवाजवी आकारामुळे संबंधित स्त्रीला वेगवेगळे त्रास उद्भवतात. अशा वेळी प्लॅस्टिक सर्जरीने स्तनांचा आकार कमी करणं ही एक कॉमन शस्त्रक्रिया आहे.

| November 26, 2014 01:07 am

दिवाळी २०१४
स्तनांच्या अवाजवी आकारामुळे संबंधित स्त्रीला वेगवेगळे त्रास उद्भवतात. अशा वेळी प्लॅस्टिक सर्जरीने स्तनांचा आकार कमी करणं ही एक कॉमन शस्त्रक्रिया आहे.

लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्यामध्ये स्तनवर्धनासाठी संपर्क साधा, अशी एक जाहिरात नेहमी दिसते. एरवी वर्तमानपत्रं, मासिकं यांच्यामधूनही सौंदर्यवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांसाठीच्या जाहिराती नेहमी नजरेला पडत असतात. या शस्त्रक्रिया प्लॅस्टिक सर्जन करतात, त्यासाठी लाखो रुपये आकारले जातात, असंही हळूहळू सेलिब्रिटींच्या गॉसिप कॉलममधून कळत गेलं. सरकारी हॉस्पिटलमधला प्लॅस्टिक सर्जरीचा विभाग दिसला तेव्हा प्रश्न पडला की, खासगी पातळीवरचे प्लॅस्टिक सर्जन सौंदर्यवर्धनाच्या शस्त्रक्रिया करत असतील, तर सरकारी हॉस्पिटलमधले प्लॅस्टिक सर्जन नेमकं काय काम करत असतील?
‘‘आमच्या विभागात प्लास्टिक सर्जरीबाबत मुख्य काम केलं जातं ते जळित आणि अपघात झालेल्या रुग्णांवर.’’ मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमधल्या प्लॅस्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. विनिता पुरी सांगतात. ‘‘त्यांच्याबाबत पुनर्रचनेचं काम म्हणजेच जळाल्यामुळे किंवा अपघात, कॅन्सरसारखे आजार, इतर आघात यामुळे त्यांच्या त्वचेची जी हानी झालेली असते, ती भरून काढणं, त्यांची त्वचा जास्तीत जास्त पूर्ववत दिसावी यासाठी काम करणं आवश्यक असतं. हे काम चांगलंच आव्हानात्मक आहे. त्या तुलनेत आमच्या विभागात सौंदर्यवर्धनासाठी प्लास्टिक सर्जरी फार कमी प्रमाणात केली जाते, कारण तशी मागणी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या आमच्याकडे तरी तुलनेत खूपच कमी आहे.’’
डॉ. पुरी यांच्या मते सर्वसामान्य लोकांचा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे प्लॅस्टिक सर्जरीमध्ये प्लॅस्टिकचा वापर केला जातो. तो दूर करताना त्या म्हणाल्या की, ‘‘प्लॅस्टिक सर्जरीमध्ये त्याच माणसाच्या त्वचेचा उपयोग केला जातो. शरीराच्या ज्या अवयवावर सर्जरी करायची असते, त्या अवयवाशी साधारणपणे साधम्र्य असलेल्या अवयवाखालची त्वचा काढून घेऊन सर्जरी करायची त्या अवयवासाठी वापरली जाते. उदाहरणच द्यायचं तर चेहऱ्यासाठी साधारणपणे कानाच्या मागची त्वचा घेतली जाते, कारण ती चेहऱ्यासारखीच पातळ असते. नाकासाठी, गालासाठी बाहेर न दिसणाऱ्या शरीराच्या जागेतून त्वचा घेऊन सर्जरी केली जाते.
मुळात एखाद्यावर प्लॅस्टिक सर्जरी करायची वेळच का येते, याबद्दल बोलताना डॉ. पुरी म्हणतात, ‘‘कॅन्सरसारख्या आजारात उपचार करताना त्वचेची हानी होते. समजा एखाद्याला जबडय़ाचा कॅन्सर झाला आहे, तर त्याच्यावर उपचार करताना काही भाग काढून टाकावा लागतो. त्यामुळे तिथे निर्माण झालेला खड्डा भरून काढण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करावी लागते. तिथे आमचं कसब पणाला लागतं. तो खड्डा भरून काढणं, आधी होता तसाच आकार देणं, त्वचेचा रंग आजूबाजूच्या त्वचेशी मिळताजुळता राहील असं बघणं हे प्लास्टिक सर्जनचं कौशल्य असतं, कारण आम्ही जे काम करू त्यावर पुढे त्या रुग्णाचं वैयक्तिक आयुष्य कसं असेल ते ठरणार असतं. त्याचा विद्रूप झालेला चेहरा नॉर्मल झाला तरच पेशंट पूर्वीसारखा समाजात वावरू शकतो. त्यामुळे त्याला पुढच्या आयुष्यात परत तेवढय़ाच आत्मविश्वासानं उभं राहण्यासाठी प्लास्टिक सर्जरी फार महत्त्वाची ठरते.’’
जळीत, आजार, आघात, अपघात या दुर्घटनांबरोबरच दुसरीकडे सौंदर्यवर्धनासाठीही प्लास्टिक सर्जरी केली जाते; पण डॉ. पुरी यांच्या मते दुर्घटनांमध्ये केली जाणारी प्लास्टिक सर्जरी रुग्णाला नॉर्मल आयुष्याकडे नेते, तर सौंदर्यवर्धनासाठी केली जाणारी प्लास्टिक सर्जरी ही नॉर्मल या अवस्थेच्या पलीकडे घेऊन जाऊन सौंदर्यात भर घालते.
बाहेरच्या जगात प्लॅस्टिक सर्जरीला ग्लॅमर आहे ते सेलिब्रिटींची नावं त्याच्याशी जोडलेली असल्यामुळे. सरकारी हॉस्पिटल्समध्ये मात्र तसं नाही. डॉक्टर पुरी सांगतात, ‘‘सार्वजनिक हॉस्पिटल्समध्ये साधारणपणे ८५ टक्के प्लास्टिक सर्जरी या पुनर्रचनेसाठीच्या असतात. भाजल्याच्या मोठय़ा जखमा असतात, मोठे अपघात असतात, त्यात चेहरा विद्रूप झालेला असतो. त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की, पेशंट जितक्या लौकर आमच्याकडे येईल आणि जितक्या लौकर उपचार सुरू होतील, तितकी त्वचेची हानी लौकर भरून येते आणि जखमांचे व्रण कमी उरतात. भाजण्यासारखे प्रसंग, अपघात यांच्यामध्ये माणूस हॉस्पिटलमध्ये लौकर पोहोचून त्याचा जीव वाचणं जेवढं महत्त्वाचं असतं तेवढंच प्लास्टिक सर्जरीचे उपचारही लौकर सुरू होणंही महत्त्वाचं असतं. पेशंट लहान गावांमध्ये राहात असेल, त्याला तातडीने मोठय़ा शहरात चांगल्या प्लास्टिक सर्जनपर्यंत पोहोचणं शक्य नसेल, तर स्थानिक डॉक्टरने तात्पुरते टाके घातले तरी दोन दिवसांत पेशंट चांगल्या प्लास्टिक सर्जनपर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. हल्ली खूप ठिकाणी प्लास्टिक सर्जरी केली जाते; पण तुम्ही चांगल्या सर्जनकडे गेलात तर तुम्हाला अंतिम परिणामही चांगलेच मिळतात. कोणताही जनरल सर्जनही प्लास्टिक सर्जरी करू शकतो; पण त्याहीपेक्षा प्लास्टिक सर्जरीत स्पेशलायझेशन केलेल्या सर्जनकडे जाणं हे केव्हाही उत्तम.’’
प्लॅस्टिक सर्जन नेमकं कसं काम करतो याबद्दल त्या सांगतात, ‘‘समजा, जबडय़ाचा कॅन्सर आहे, तर काही भाग काढून टाकावा लागतो. कधीकधी ओठ तयार करावे लागतात, त्यांना आकार द्यावा लागतो. हाड तयार करावं लागतं. अपघातामध्ये हातापायाला मार लागलेला असतो. तिथे तर उपचारांच्या पहिल्या दिवसापासून आमचं काम सुरू होतं. नसांना मार लागला असेल, तर त्या उपचारांमध्ये आमची भूमिका महत्त्वाची ठरते. मानेच्या खांद्याकडच्या भागाला मार लागला तर त्याचा परिणाम मणक्यावर होतो, आपल्या हातावर होतो, कारण मेंदूतून मानेतून हाताकडे संदेश वाहून नेणाऱ्या नसा असतात. त्यांना मार लागला तर तो माणूस जिवंत राहतो; पण त्याला हाताची हालचाल काहीच करता येत नाही. त्यावर काम करणारे प्लास्टिक सर्जनच असतात. त्याशिवाय कुणी सुरा मारला, काच लागली, चुकीमुळे मशीनचे अपघात झाले, हात ओढल्यामुळे खांदा निखळला आणि त्याचा नसांवर परिणाम झाला तर नस जोडून देण्याचं काम आम्ही प्लास्टिक सर्जन करतो. याशिवाय काहींचे जन्मत: ओठ फाटलेले असतात, टाळूच नसतो, बोटं जोडलेली असतात, बोटंच नसतात किंवा जास्त बोटं असतात, त्यांच्यावर तर शक्य तितक्या लौकर उपचार केले जातात. थोडक्यात सांगायचं तर, त्वचेसंदर्भात ज्या काही सर्जरी करायच्या असतात, त्या सगळ्या प्लॅस्टिक सर्जन करतो.’’
सौंदर्यवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक सर्जरीचं प्रमाण आता वाढत चाललं आहे. सामान्य माणसाचंही त्याबद्दलचं कुतूहल वाढत आहे; पण त्याचबरोबर या सर्जरींबाबत तात्त्विक मुद्देही उपस्थित केले जात आहेत. त्याबद्दल बोलताना डॉक्टर पुरी म्हणतात, ‘‘शाहरूख खान असो की सामान्य माणूस, प्रत्येकालाच आपण सुंदर, देखणं दिसावं असं वाटत असते आणि त्यात काय चुकीचं आहे? तुम्ही शाहरूखसारखं नाक हवं, ऐश्वर्यासारखे डोळे हवेत, प्रियंका चोप्रासारखे ओठ हवेत, असा आग्रह धरू नका; पण माझ्याकडे जे आहे, त्यात भर घातल्यामुळे माझ्या सौंदर्यात वाढ होणार आहे, माझ्या नाकाला आकार दिल्यामुळे ते चांगलं दिसणार आहे, त्यामुळे माझा आत्मविश्वास आणखी वाढणार आहे, असं एखाद्याला वाटलं तर त्यात काहीच चुकीचं नाही.’’ हे सांगताना सरकारी रुग्णालयांमध्ये सौंदर्यवर्धक सर्जरींचं प्रमाण कमी आहे हे त्या नमूद करतात.
त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारी हॉस्पिटलमध्ये प्लॅस्टिक सर्जरी करायची की नाही, हे पेशंट नाही, तर डॉक्टर ठरवतात. ‘‘जळिताच्या पेशंटच्या दहा- दहा प्लास्टिक सर्जरी झालेल्या असतात, तो येऊन आणखी सर्जरी करा म्हणजे माझं दिसणं आणखी सुधारेल, असं सांगत असतो किंवा बाहेर नाकाच्या तीन-चार सर्जरी झालेल्या असतात, अजून काही तरी बदल हवा असतो. मग तो पेशंट आमच्याकडे येतो, की यात आणखी अमुकतमुक करा; पण या सर्जरी पेशंटला हव्या त्यानुसार नाही, तर वैद्यकीय गरजेनुसार केल्या जातात. त्यामुळे मग आम्हाला अशा पेशंटना सांगावं लागतं की, तुमचा चेहरा सुधारण्यासाठी आमच्या आवाक्यात जेवढय़ा गोष्टी होत्या तेवढय़ा सगळ्या आम्ही केल्या. यापुढे जाणं आता शक्य नाही.’’
दोन-तीन वर्षांपूर्वी त्यांच्याकडे आलेल्या एका पेशंटचा हात अतिशय वाईट पद्धतीने जखमी झाला होता. तिच्यावर वेगवेगळ्या सर्जरी झाल्या. तिला हातपण हलवता येत नव्हता. ती आता घरातली कामंपण करते आहे. डॉक्टर पुरी सांगतात, ‘‘तुम्हाला निसर्गाने जे काही दिलेलं असतं ते गेलं तर परत मिळत नाही; पण प्लास्टिक सर्जरीने ते नॉर्मलपर्यंत आणणं हे आमचं काम आहे.’’
अमुकतमुक नटीने प्लॅस्टिक सर्जरी करून आपल्या स्तनांचा आकार वाढवून घेतलेला आहे, अशा प्रकारची कुजबुज ऐकायला येत असते. डॉक्टर पुरी सांगतात, ‘‘आमच्याकडे स्तनांचा आकार वाढवण्यासाठी आजवर कुणी आलेलं नाही. मात्र स्तनांचा आकार कमी करण्याची सर्जरी आमच्याकडे नियमित केली जाते. खूपदा शरीराच्या तुलनेत स्तन खूप मोठय़ा आकाराचे असतात. बाळंतपणानंतर किंवा योग्य पद्धतच्या ब्रेसियर्स वापरल्या नाहीत तर स्तनांचा आकार वाढू शकतो. काही मुलींच्या बाबतीत वयात येतानाच्या काळात स्तनांचा आकार अवाजवी वाढतो. त्याला वैद्यकीय परिभाषेत प्युबर्टी हायपरप्लासिया ऑफ ब्रेस्ट्स असं म्हणतात. अशा स्त्रियांना त्यामुळे पाठदुखी, स्तनांचं वजन जास्त असल्यामुळे ब्रेसियरचा पट्टा खांद्यावर रुतून खांदे दुखणं, स्तनांच्या खालच्या बाजूला फंगस होणं अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतं. शिवाय असे स्तन शरीराच्या तुलनेत मोठे बेढब दिसतात. त्यामुळे ही सर्जरी केली जाते. ही सर्जरी करण्याआधी आम्ही पेशंटचं समुपदेशन करतो. तिला सर्जरीची सगळी प्रक्रिया समजावून सांगतो. सर्जरीनंतर काय आणि कशी काळजी घ्यायची असते ते समजावून सांगितलं जातं. ऑपरेशननंतर काय आणि कोणते परिणाम होतील, त्यात कोणती गुंतागुंत होऊ शकते, साइड इफेक्ट्स काय असू शकतात तेही समजावून सांगतो. ही सर्जरी वयाच्या कोणत्याही टप्प्यावर करता येते. कोणत्याही सर्जरीसाठी जो फिटनेस लागतो तो असेल तर ही करता येते. सर्जरीनंतर एक किंवा दोन दिवसांत पेशंट घरी जाऊ शकतो. या सर्जरीचे कोणतेही साइड इफेक्ट नाहीत. उलट अवास्तव मोठे असलेले स्तन कमी केल्यानंतर त्या पेशंटला अतिशय हलकं, मोकळं, सुटसुटीत वाटतं. सर्जरीनंतर घ्यायची काळजी म्हणजे सर्जरीनंतर सहा आठवडे जिमला जाऊन व्यायाम करणं, छातीशी संबंधित कोणतेही व्यायाम करणं टाळायचं असतं. त्याचबरोबर योग्य पद्धतीने, सपोर्टिव्ह ब्रेसियर वापरणं आवश्यक ठरतं.’’
हे सगळं सांगताना डॉ. पुरी म्हणतात, ‘‘हे सगळं करणारी मी एकटी नाही, तर माझ्याबरोबर माझी टीम, खरं तर अख्खं थेरपी डिपार्टमेंट आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2014 1:07 am

Web Title: looking beautiful 5
टॅग Diwali,Lifestyle
Next Stories
1 मेक टू ऑर्डर : ‘दिसण्या’साठी जन्म आपुला..!
2 कोयना : अभियांत्रिकी चमत्काराचा हीरक महोत्सव प्रकाशलक्ष्मी कोयना
3 आवाज की दुनिया : एफएमचे दिवस, एफएमच्या रात्री!
Just Now!
X