वाचक प्रतिसाद

‘लोकप्रभा’च्या २२ मेच्या अंकातील मथितार्थ ‘अकलेचे दिवाळे’, ‘सलमानच्या निमित्ताने अकलेची लिटमस टेस्ट!’ आणि ‘सोशल मीडियावर अपरिपक्वतेचा कळस’ या लेखांमधून प्रसारमाध्यमांच्या बालिश वृत्तांकनांचा खरपूस समाचार घेतलेला दिसला.

lp04पंचतारांकित आरोपी

‘लोकप्रभा’च्या २२ मेच्या अंकातील मथितार्थ ‘अकलेचे दिवाळे’, ‘सलमानच्या निमित्ताने अकलेची लिटमस टेस्ट!’ आणि ‘सोशल मीडियावर अपरिपक्वतेचा कळस’ या लेखांमधून प्रसारमाध्यमांच्या बालिश वृत्तांकनांचा खरपूस समाचार घेतलेला दिसला. ‘भाग मीडिया भाग’ अशीच आजची स्थिती आहे. सिनेमात जी भूमिका वठवून सर्वसामान्यांना ऊर्जा आपण देतो, त्या आधारावर व्यक्तिगत जीवनात झालेल्या एक-दोन गंभीर चुकांनाही जनतेनं आणि न्यायासनानंही नजरेआड करावं, अशी फाजील अपेक्षा बाळगणारे अभिनेते खोटय़ा खोटय़ा भूमिकांसाठी कोटय़ानुकोटी वसूल करून त्यातून खैरात करून आपली दानत दाखवत असतील तर त्यात ‘माणुसकीचा गहिवर’ बघितला जातो. शेवटी सिनेमात सात्त्विक हिरोगिरी किंवा बेडर दबंगगिरी करून जमिनीपासून चार बोटं वर राहणाऱ्यांचे पाय मातीचेच असतात तेही सलमान खानच्या खटल्याच्या निमित्तानं दिसलं. मीडियावाले अशा ‘पंचतारांकित आरोपी’चं कव्हरेज करून चॅनेलचा टीआरपी वाढवण्याची संधी कशी सोडतील?
‘फुटपाथवर झोपणाऱ्यांची चूक आहे’ असं म्हणणारे सलमानचे मित्र हे जाणतात ना की रात्रीच्या वेळी वाहनचालकाला सर्वसामान्यपणे रिकाम्या रस्त्यांऐवजी फुटपाथ ही जागा गाडी चालवण्याची नाही याची जाण असते. मग मद्यधुंद अवस्थेत, तेही वाहनपरवाना जवळ नसताना, फुटपाथवर गाडी घालणं हा सदोष वाहन चालवण्याचा गुन्हाच झाला, हे सर्वसाधारण मतही तयार झालं आणि त्यावर गरमागरम चर्चाही.
पण जेव्हा तो चाहत्यांच्या प्रेमानं सिनेमे, टी.व्ही.शोज् हे सारं सुखेनैव पार पाडत होता तेव्हा त्याच्या काही क्षणांच्या बेधुंदपणामुळे बळी गेलेल्याच्या कुटुंबाची, गंभीर जखमी झालेल्यांची अवस्था काय होती? आरोप सिद्ध होवो न होवो, त्या कुटुंबाला आणि इतर जखमींना त्यानं मदत केली का? याबद्दल कोणीच खुलासा करू शकत नाही का? हे सारं पाहून असं वाटतं की, सलमानला खरोखरच पश्चात्ताप झाला असेल तर तो स्वत:हून ही शिक्षा भोगायला तयार झाला पाहिजे. अन्यथा त्याची माणुसकी बेगडी म्हणावी लागेल.
– श्रीपाद पु. कुलकर्णी, ई-मेलवरून.

पण मर्यादा घालणार कशी?
‘लोकप्रभा’च्या २२ मे या अंकातील ‘सोशल मीडियावर अपरिपक्वतेचा कळस’ हा लेख पटला. सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लगेच काही मिनिटांमध्ये सोशल साइट्स त्याच्याशी संबंधित पोस्ट्स, फोटोंनी भरून गेलं. सोशल साइट्स हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे असं मान्य केलं तरी त्याला काहीतरी मर्यादा हवी हेही तितकंच खरं आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये. मर्यादा नसली की बॉलीवूडमधल्या काही कलाकारांचं झालं तसं होतं. सोशल साइट्सवर पोस्ट करताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत खूपदा बोललं जातं. पण या स्वातंत्र्याला लगाम असणं गरजेचं आहे. बॉलीवूडमध्ये काही अपवाद वगळता सलमानच्या शिक्षेचं समर्थन करताना फारसं कोणी दिसलं नाही. बॉलीवूड ताऱ्यांचं सोशल साइट्सवर असण्याचं प्रमाण अलीकडे खूप वाढलंय. कलाकार आणि माणूस म्हणूनही त्यांना नैतिक जबाबदारीची जाणीव असणं गरजेचं आहे. त्यांना नेमका याचाच विसर पडलाय. कसंही करून सलमानच्या बाजूने बोलायचं, पाठिंबा द्यायचा एवढंच त्यांनी लक्षात ठेवलेलं दिसतंय. त्यांच्या अशा वागण्याचं समर्थन होणं कठीण आहे. व्यक्त होण्याला ना नाही. पण त्याला मर्यादा घालणार कशी, हा प्रश्न उरतोच.
– रश्मी काळे, पुणे.

माहिती उपयुक्त
‘लोकप्रभा’ २२ मेच्या अंकातील ‘गीत गाता हूं मैं’ या लेखातून जुन्या जमान्याच्या हिंदी संगीतकार-गीतकार यांच्याबद्दल बरीच उपयुक्त माहिती समजली. अनेक संगीतकारांचे ‘टय़ूनिंग’ विशिष्ट गीतकारांबरोबरच असायचे, त्यामुळे अशा जोडींनी बरेच काम केले. उदा. नौशाद- शकील बदायुनी, रवि-साहिर, शंकर जयकिशन- हसरत जयपुरी व शैलेंद्र, आर.डी. बर्मन यांनी आनंद बक्षी (अमर प्रेम), मजरुह (यादों की बारात), गुलजार (मासूम, आंधी, इजाजत) जावेद अख्तर (१९४२- ए लव्ह स्टोरी) यांच्यासोबत काम केले. ओ. पी. नैयर यांचा मामला जरा वेगळा होता. साहिरशी त्यांचे भांडण झाल्यावर त्यांनी नव्या दमाचे गीतकार जसे एस. एच. बिहारी, कमर जलालाबादी व शेवन रिजवी यांना घेऊन काम केले. लेखात गुलजार यांचे खरे नाव संपूर्ण सिंह दीवाण असे दिले आहे, ते संपूर्ण सिंह कालरा असे आहे.
– सुनील वराडपांडे, भोपाळ.

lp05दिशादर्शक अंक
‘लोकप्रभा’चा करिअर विशेषांक (१५ मे) अत्यंत वाचनीय आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत करिअर करण्याचा किती वाव आहे याची माहिती देणारे लेख या विशेषांकात समाविष्ट होते. आयटी, सीए, प्रशासकीय नोकरी, विज्ञान यांबाबतची मूलभूत माहिती विद्यार्थ्यांना असते. पण प्रवेश करताना त्यातले टप्पे माहीत असणं गरजेचं असतं. या विशेषांकातील लेखांमुळे त्याबाबतचं ज्ञान मिळणं सोपं गेलं. मनोरंजन क्षेत्राविषयी मुलांना आकर्षण असतं. त्यात करिअर करायचीही इच्छा असते. पण त्यात खात्रीलायक गोष्टी दिसून येत नसल्यामुळे विद्यार्थी त्याचा करिअर म्हणून विचार करताना धजावतात. मात्र मनोरंजनविषयक लेखांमुळे त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठीही उत्तम संधी असल्याचं समोर आलं. मनोरंजन क्षेत्रात करिअर करताना टप्प्याटप्प्याने कसा प्रवास करायचा हेही त्यात नमूद केलं आहे. करिअर करताना त्याचं व्यवस्थित नियोजन केलं तर त्याचा निश्चितच फायदा होतो हे सांगणाराही लेख वाचनीय आहे. वास्तविक कुठलंही करिअर करताना त्याचं व्यवस्थापन, नियोजन किती महत्त्वाचं आहे हे पटवून दिलं आहे. दहावी-बारावीच्या निकालाच्या दिवसांमध्येच अशा पद्धतीचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाचं ठरलं आहे. कोणतं करिअर करू, कशात वाव आहे, आर्थिकदृष्टय़ा परवडणारं आहे का, आपली क्षमता आहे का, अशा विविध प्रश्नांची उत्तरं देत करिअर विशेषांक दिशादर्शक ठरला आहे.
– प्रसाद देशमुख, मुंबई

दिवंगत रवींद्र पाटील यांस…
तुमच्या नावापुढे दिवंगत लिहिताना आमचे हात थरथरतात. कारण ज्या वेळेला सलमान खानची केस पुन्हा कोर्टात उभी राहिली त्याच वेळेला तुम्ही आमच्या हृदयात स्थान मिळवलेत. तुमच्यासारख्या ताठ कण्याच्या मराठी माणसाकडे पाहून आम्हा सर्व मराठी जनाची छाती अभिमानाने फुलून आली.
तुमच्यासारख्या माणसामुळे मोडेन पण वाकणार नाही हा मराठी बाणा अजून तरी शिल्लक आहे. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की तुमच्या ज्या एफआयआरमुळे खटला उभा राहिला व तो चालवताना वकिलांना वेळोवेळी तुमची साक्ष महत्त्वाची वाटली त्याचा कोणताही उल्लेख आमच्या न्यूज चॅनेलवर नव्हता.
खरेच तुम्ही जिवंत नाही हे फार बरे झाले, कारण आज तुमची आठवण काढायला कोणाला वेळच नाही. सर्व जण आज सलमानला भेटायला रांग लावून उभे आहेत. मेणबती संप्रदायाचे लोकसुद्धा तुम्हाला भेटले नसते, कारण सध्या सलमान हाच परवलीचा शब्द झाला आहे.
ज्या कोर्टाने सलमानला शिक्षा सुनवली त्या कोर्टालासुद्धा तुम्ही जिवंतपणी कारण नसताना तुरुंगात मरणयातना भोगत असताना दया आली नाही.
एवढेच नव्हे तर स्वत:ला मराठी माणसाचे तारणहार समजणाऱ्या राज्यकर्त्यांनी तुमची दखलसुद्धा घेतली नाही. छातीचा कोट करून तुमच्यासारख्यांचे रक्षण करणे हेच ब्रीद असायला हवे. पण आम्ही तुमचे रक्षण करू शकलो नाही याचा आम्हाला खेद वाटतो.
मृत्यूपर्यंत सत्याला कवटाळून राहण्याच्या तुझ्या धैर्याला कोटी कोटी प्रणाम. एकच प्रश्न सलमानच्या ऐवजी त्या जागी जर सामान्य माणूस असता तर तो इतकी वर्षे तुरुंगाच्या बाहेर राहू शकला असता का?
तुझेच- सत्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याची इच्छा असणारे आम्ही सर्व जण.
– किशोर होमकर, ई-मेलवरून.

कमळ शेतीने ज्ञानात भर
‘कमळ फुलांची शेती हा लेख खूप आवडला. कमळफुलांच्या छांदिष्ठ शेतीच्या माहितीबरोबरच कमळाचे औषधी उपयोग, कमळाच्या पाककृती, धार्मिक आधार या पूरक माहितीमुळे ज्ञानात भर पडली. ‘लोकप्रभा’ कायमच नवनवीन विषयांवर वाचनीय लेख प्रकाशित करीत असते. त्यामुळे वेगळ्या विषयांची ओळख होते. त्याबद्दल ‘लोकप्रभा’चे धन्यवाद.
– सारिका उल्हास फाळके, सांगली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Readers response

ताज्या बातम्या