scorecardresearch

फडताड फत्ते

कधी कधी ठरवलेल्या डोंगरवाटेने भटकंती करता येत नाही. पण ती वाट मनात दडून बसलेली असते.

फडताड फत्ते

कधी कधी ठरवलेल्या डोंगरवाटेने भटकंती करता येत नाही. पण ती वाट मनात दडून बसलेली असते. संधी मिळताच पुन्हा उचल खाते आणि शेवटी एकदाचे त्या वाटेवर भटकल्यावरच जिवाला शांतता मिळते. फडताड नाळेच्या ट्रेकबाबत असंच म्हणावं लागेल.

फेब्रुवारी महिन्यात आम्ही फडताडसाठी गेलो, पण तेव्हा पालखीचा योग होता. अर्थातच फडताडचा ट्रेक केल्याशिवाय आता शांतता लाभणार नव्हती. अगदी मोजक्याच नोंदी असणाऱ्या वाटांपैकी एक आणि त्यातही खडतर. वर्दळ नसल्यामुळे काहीशी विस्मृतीत गेलेली. ती धूळ झटकण्याचा योग यंदाच्या दिवाळीत आला.

शुक्रवार रात्री तोरण्याला बगल देत भट्टी घाट ओलांडून गाडी सिंगापूरजवळच्या कुसरपेठेकडे पिटाळली. गेल्या चार वर्षांत घाटवाटांच्या भटकंतीच्या निमित्ताने या भागात येणं-जाणं होतं. खिंडीतून गाडी कुसरपेठेकडे वळली आणि दोन वर्षांपूर्वी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर केलेल्या एकल्याची नाळ, सिंगापूरनाळ ट्रेकच्या आठवणींना उजाळा मिळाला. तेव्हा ह्यच िखडीत खडबडीत दगडी कच्च्या रस्त्यापुढे आमच्या खाजगी वाहनाने संपूर्ण शरणागती पत्करली होती. आता चित्र एकदम पालटलं आहे. पूर्वीच्या कठीण चढाईच्या वाटेवरून आता एसटीदेखील आरामात जाऊ  शकेल. कोण्या बडय़ा कंपनीने आजूबाजूच्या डोंगररांगांतील तीन-चारशे एकर जमीन भूमिपुत्रांच्या पितरांना गंडे घालून पूर्वीच किरकोळ भावात खरेदी केली होती. आता रस्त्याच्या दुतर्फा तारेचं कुंपण घालून याच जमिनीचा सहा लाख सहा गुंठे हा बाजार सुरू आहे. वीकेंड होमच्या फॅडमुळे सह्यद्रीचा होणारा ऱ्हास उघडय़ा डोळ्यांनी पाहात सडक पार केली.

पहाटे चारला कुसरपेठेत पोहोचलो तेव्हा कुडकुडत्या थंडीत वळचणीला निजलेल्या कुत्र्यांनाही आमची दखल घ्यावीशी वाटली नाही. गाव चिडीचूप निद्राधीन होतं. शाळेच्या वऱ्हांडय़ात पथाऱ्या पसरल्या. सकाळी साडे सातच्या सुमारास ‘‘ते फडताडला जाण्यासाठी येणार आहेत ते तुम्हीच का?’’ असं विचारत एका तरुणाने आम्हाला जागं केलं. पालखीच्या नाळेच्या ट्रेक दरम्यान पदरातून फडताडकडे जाण्याऱ्या मार्गाच्या दुर्गमतेचा अंदाज आल्यामुळे वाटाडय़ा घेण्याच्या माझ्या आग्रहास्तव प्रसादने फोन करून वाटाडय़ाची सोय करून ठेवली होती. तोच हा वाटाडय़ा बबन.

प्रसाद आणि यज्ञेशचा प्लॅन होता की जननीच्या नाळेने उतरून जायचं आणि पदरातून आडवं जात फडताड गाठायची. सकाळी लवकर जननीने उतरलो तर सूर्यास्तापर्यंत फडताड चढून वर येणं सहजशक्य होतं. पण मला आजवरच्या अनुभवावरून हा प्लान अजिबात मंजूर नव्हता. अवघड नवखी वाट शक्यतो दिवसाउजेडी आणि ताज्या दमाचे असताना करावी, माहितीची पायाखालची वाट उशीर झाला अंधारून आला तर विजेरीच्या उजेडातदेखील पार करता येते. त्यामुळे मला फडताड उतरून जावं, पदरातील जंगलात मुक्काम करावा आणि दुसऱ्या दिवशी जननी किंवा भिकनाळ चढून यावं अथवा फडताड पूर्ण उतरून पणदेरी गाठावं असं वाटत होतं. हे दोघं आपल्याच प्लानवर अडल्याने मी शरणागती पत्करली.

इक्विपमेंटची वाटावाटी करून बबन दादांसोबत आम्ही गाव सोडलं तेव्हा सकाळचे साडेआठ वाजले होते. एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी वेळापत्रकाचा कच्चा पाढा गिरवून घेतला. कुसरपेठेतून साडेआठ वाजता सुरुवात करून जननीने उतरून दिवसाउजेडी फडताड गाठायची असेल तर पदरातून फडताडकडे जाणारी वाट नक्की माहीत असायला हवी. बबन दादांना ती कितपत माहीत आहे ह्यचा अंदाज घेण्यास सुचवलं.

कुसरपेठेतून सिंगापूरकडे जाणारी गाडीवाट सोडून डावीकडच्या पायवाटेने टेपाडाला वळसा देत पठारावर आलं की समोर दिसणारा सह्यद्रीचा रौद्रभीषण पण चित्तथरारक देखावा जागीच खिळवून ठेवतो. डोंगरमाथ्यावरून नागमोडी वळणं घेत जाणारा रस्ता एकल गावाच्या माथ्यावरून डोंगरापलीकडे अचानक लुप्त होतो. रस्त्यापासून जरा खालच्या अंगाला वसलेल्या एकल गावाच्या डोंगरउतारावर केलेली वरई पोपटी शेती विशेष लक्ष वेधून घेते.

तिथेच पुढे दिसते ती गावापासून सरळ कारवीच्या जंगलातून सुरू होत कोकणात उतरत गेलेली आग्याची नाळ म्हणजेच एकल्याची नाळ आणि त्यापलीकडे दिमाखात मिरवणारा दुर्गम दुर्ग लिंगाणा. त्यापलीकडे खानूचा डिग्गा, कोकण दिवा, कावळ्याची िखड अशा एकामागोमाग एक डोंगरांच्या अनेक घडय़ा धूसर होत पार क्षितिजापर्यंत पसरलेल्या दिसतात. पण ह्य सगळ्यात देखणं रूप पहावं ते दुर्गदुर्गेश्वर रायगडचं. जगदीश्वराचं  दूरवरून होणारं दर्शनदेखील रायगडी जाऊन आल्याचं समाधान देत होतं.

गावापासून २० मिनिटे अंतरावर जमीन मालकाने विहीर खोदून घेतली आहे. तिला बाराही महिने मुबलक पाणी असतं. आम्ही पाणपिशव्या भरून घेतल्या आणि कच्च्या मार्गाने पुढे निघालो. एव्हाना बबन दादांना पदरातील वाटांचा अजिबात अंदाज नसल्याचा साक्षात्कार झाल्याने जननीने उतरण्याचा आग्रह सोडून आम्ही फडताडला प्राधान्य देत जननीच्या राईकडे मोर्चा वळवला.

विहिरीपासून १५ मिनिटांच्या चालीवर डावीकडे कारवीच्या रानात घुसणारी ओळखीची पायवाट मागे सोडून आम्ही बैलगाडीच्या रस्त्याने पुढे चालत राहिलो. डावीकडच्या पायवाटेने कारवीतून सरळ चढत डोंगररांगेचा माथा गाठायला साधारण अर्धा तास लागतो. हीच वाट पुढे आणखी अध्र्या-पाऊण तासाच्या चालीने भिकनाळेकडे घेऊन जाते. फेब्रुवारी महिन्यात भिकनाळ, जननीची नाळ ट्रेक दरम्यान हा भाग बऱ्यापैकी पायाखालून गेला असल्यामुळे इथल्या पायवाटा आता चांगल्याच ओळखीच्या झालेल्या.

बैलगाडीची वाट कारवीच्या रानात लुप्त झाली आणि सुरू झाली कारवीच्या खरखरीत पानांशी कडवी झुंज. गुडघाभर उंचीची कारवी खांद्याशी झोंबायला लागली. पुढे जात होतो तशी कारवीच्या रानाची उंची आणि दाटी वाढत गेली. भिकनाळेकडे जाणाऱ्या डोंगररांगेला डावीकडे ठेवत घसाऱ्याच्या वाटेने कारवीतून चालत बाहेर पडलो आणि समोर आली दक्षिणोत्तर इंग्रजी सी आकारात पसरलेली डोंगररांग. या अर्धवर्तुळाकार डोंगराचा कोकणाकडील भाग म्हणजे निव्वळ तुटलेला कडाच जणू. उन-पाऊस-वाऱ्याच्या माऱ्याने याही डोंगराला मिनी कोकणकडय़ाचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे.

याच पट्टय़ातून कोकणात तीन घाटवाटा उतरतात. दक्षिणेकडील टोकातून उतरते भिकनाळ, उत्तरेकडून फडताड तर या दोहोंच्या मधून सरळसोट उतरणारी निमुळती वाट म्हणजे जननीची नाळ. कोकणातील लोक हिलाच पालखीची वाट असंही संबोधतात. कोणे एकेकाळी या वाटेने घाटावरील मंदिराच्या बांधणीसाठी मोठमोठे वासे नेण्यात आले होते. त्यामुळे तिचं नाव पालखीची वाट असं पडलं असावं- इति पणदेरी ग्रामस्थ.

जननी आणि फडताड नाळ या दरम्यानचा घाटमाथा सदाहरित दाट जंगल पट्टय़ानं व्यापलेला आहे. येथेच जननी मातेचं ठाणे वसल्यामुळे या भागाला जननीची राई म्हणून संबोधलं जातं. आजूबाजूचे ग्रामस्थ नवरात्रीत देवीच्या दर्शनाला येत असल्यानं  पायवाटा बऱ्यापैकी शाबूत आहेत.

जननीच्या ठाण्यापाशी हात जोडून आम्ही फडताडच्या दिशेला मोहरा वळवला. या भागात वावर नसल्यानं पायवाटा मोडलेल्या. पण बबन दादांना नाळेची सुरुवात अचूक माहीत होती. ते कारवी, बांबूच्या वनातून झपाझप पुढे सरकत होते. बांबूच्या जाळीच्या पलीकडे एक छोटंसं पठार लागलं. ते ओलांडून पुन्हा एकदा कारवीच्या जाळीत घुसलो आणि उतारावर कारवीचा आधार घेत तोल सांभाळत अखेर फडताडीच्या मुखाशी येऊन पोहोचलो. फडताडला अति दुर्गम का म्हणतात याचा प्रत्यय प्रथमदर्शनीचा आला. शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीचा कस येथे लागणार होता.

नाळेच्या मुखाशी पोहोचण्यासाठीच जवळ जवळ ९० अंशात ४० फूट उतरून जावं लागतं. दोन्ही बाजूला खोल दरी. आधाराला वाळक्या गवताशिवाय काहीच नाही आणि पायाखालची माती म्हणजे नुसता निसटता मुरूम. नाळेच्या तोंडाशी बांबूच्या जाळीत आठ-दहाजण बसू शकतील एवढी जागा. तिथेच सुका खाऊ  आणि ताकाचा फडशा पाडून आम्ही नाळ उतरायला लागलो तेव्हा अकरा वाजले होते. नोव्हेंबर असूनही हवेत प्रचंड उष्मा होता. दक्षिणाभिमुख उतारावर भर दुपारची सूर्याची प्रखर किरणे थेट डोळ्यावरच येत होती.

नाळेतून जरा खाली उतरलो आणि समोर ४०-५० फुटी कातळ टप्पा वाट अडवून उभा ठाकला. बबन दादा पुरते गोंधळले. ‘जरा थांबा वाट वरच्या अंगाला हाए वाटतं’ म्हणत दादा उजवीकडे गवतात शिरले, प्रसादही त्यांच्या मागे गेला. आदी आणि यज्ञेश कातळ टप्प्यापाशी डोकावून खालच्या वाटेचा आढावा घेऊ  लागले. उजवा ट्रॅव्हर्स मारून दृष्टिआड झालेले प्रसाद आणि बबन दादा तब्बल अध्र्या तासाने धापा टाकत परत आले. पलीकडच्या नळीत उतरण्यासाठी ट्रॅव्हर्सवाल्या वाटेने गेल्यास सरळ सोट दांडावरून जीवघेणी कसरत करावी लागणार होती. हा दांडा जवळ जवळ ८० अंश तिरकस उताराचा आणि प्रचंड घसाऱ्याचा होता. त्यात आधाराला गवताशिवाय काहीही नाही. वास्तविक बबन दादा या तीन वाटांपैकी कोणत्याही वाटेनं कधीच कोकणात उतरले नव्हते. त्यांना फक्त घाटावरून या वाटांची सुरुवात माहीत होती. आता पुढची वाट शोधण्याची जबाबदारी आमच्यावरच आली होती.

यज्ञनेशने जीपीएस सुरू केलं. गुगल मॅपवर फडताड लोकेट केली. आम्ही ज्या नाळेत होतो त्यानंच आणखी खाली उतरून उजवीकडे ट्रॅव्हर्स मारत आम्हाला परत नाळेत पोहचायचं होतं. वाटेची खात्री झाल्यावर भराभर रोप सोडला. त्या चिंचोळ्या गवतानं झाकोळलेल्या नाळेत एक एक पाऊल जपून टाकावं लागत होतं. खूप काळजीपूर्वक, रोपचा आधार घेत एक एक जण खाली उतरलो. कातळ टप्पा उतरून पुन्हा नाळेत आलो. आता नाळेचा उतार अधिकाधिक तीव्र होत होता.

अजिबात वावर नसल्यामुळे संपूर्ण नाळेत बोचरे गवत आणि काटेरी झुडुपांचे रान माजले होते. काटेरी झुडुपांचे ओरखडे झेलत, कुसळांनी लडबडून घेत, खाजऱ्या वनस्पतींचे जळजळीत दंश सोशीत पदराच्या पट्टय़ापर्यंत पोहोचलो तेव्हा उन्हं कलायला लागली होती. आता जेमतेम तासभरच उजेड मिळणार. पाण्याच्या पिशव्यांनी तळ गाठला होता. प्रत्येकी फक्त दीड दोन लिटर पाणीच शिल्लक होते. पदरातील जंगलात एकाच जागी पाणी उपलब्ध असून ती जागा सहजासहजी मिळण्याजोगी नाही. ते पाणी मिळाले नाही तर अपुऱ्या पाण्यानिशी पुन्हा कोणत्याही वाटेने वर चढून जाणे कठीणच होते.

दिवसभर घसारा, कारवी, गवत आणि खाजऱ्या वनस्पतींशी झगडून सगळ्यांचाच जीव मेटाकुटीला आलेला. सूर्याने सगळी ऊर्जा शोषून घेतली होती. नाळेत एक सोयीची जागा पाहून रात्री तेथेच मुक्काम करायचे ठरले. अजून दिवस मावळायला अवकाश असल्यानं प्रसाद, राजस आणि बबन दादा डावीकडच्या पदराच्या जंगलाचा आढावा घेण्यासाठी निघून गेले. पदरातले पाणी सहज मिळाले तर बरेच होते. पदरातलं पाणी नाही मिळालं तर उजवीकडचा ट्रॅव्हर्स मारून खाली उतरायचं आणि पणदेरी गाठायचे हा बेत नक्की होता. भिकनाळ आणि जननीची नाळ पाहिली होती. येथूनच पुन्हा वर गेलो असतो तर फडताडचा खालचा टप्पा हुकला असता.

प्रसाद आणि दादा परतेपर्यंत यज्ञेश आणि आदी उजवीकडचा ट्रॅव्हर्स आणि पलीकडच्या नाळेत उतरण्याचा अ‍ॅप्रोच पडताळून आले होते. अपेक्षेप्रमाणे पाणी मिळाले नाही आणि दुसऱ्या दिवशी पणदेरीत उतरून जायचे नक्की झाले.

अंधार पडल्यावर समोर कोकणात पणदेरी गावातील दिवे लुकुलुकु लागले. हवेतील उष्मा हळू हळू कमी होऊन मंद, शीतल वाऱ्याची झुळूक घामेजल्या अंगाला सुखावू लागली. आकाश सहस्र तारकांनी झळाळत होते. अशा वेळी आपल्या आवडीच्या सवंगडय़ांसोबत जंगलच्या मधोमध नाळेच्या कडय़ाशी बसून निवांत गप्पा मारण्यात जी मजा आहे ती शब्दात व्यक्त करता नाही येऊ  शकत. जेवणाचा कार्यक्रम गप्पांच्या रंगात बराच वेळ लांबला. दमलेले जीव दगडाच्या गादीवर समाधानाने शांत निजले तेव्हा दहा वाजले होते.

पहाटेच्या गार हळुवार वाऱ्यानं अलगद जाग आली. हवेतला गारवा सुखावह वाटत होता. सकाळच्या कोवळ्या किरणांत पणदेरीतील शेती अधिकच सोनपिवळी झाली होती. रात्री शांत निपचित पडलेलं जंगल अनेकविध पक्ष्यांमुळे चांगलेच किलबिलत होते. हलका नाश्ता उरकून, शिल्लक पाण्याचे समान वाटप करून निघालो.

मुख्य नाळेच्या उजवीकडील ट्रॅव्हर्स कसोटी पाहत होता. पुन्हा एकदा बोचरी झाडं, ओरखडे आणि जळजळ असा छळ सुरू झाला. कारवीच्या ओल्या दांडय़ांचा आधार घेत पायाखालून अलगद निसटणाऱ्या मुरूम मातीवर पाय गच्च रोवत तोल सांभाळण्याची जीवघेणी कसरत करत दोन टेपाड आडवी पार करत एकदाचे आम्ही हिरव्याकंच झाडांनी झाकोळलेल्या फडताडीच्या खालच्या टप्प्यातील नाळेत पोहोचलो. इथून पुढचा प्रवास अगदी सुखकर होता. नेहमीचीच कोकणातील नाळेतील उतराई. गर्द राईच्या आच्छादनामुळे हवेत गारवा होता. साधारण पाऊण तासाने नाळेत पाणी मिळाले.

१२-१४ तास पाणी बेताने वापरल्याने पाण्याच्या नुसत्या दर्शनानेच सगळे सुखावून गेलो. एक एक लिटर पाणी रिचवूनही तहान शमेना, तहान सुख म्हणजे नेमके  काय हे या अशा क्षणी अनुभवता येते. वेळ असल्यामुळे येथे विश्रांती घेतली. पाण्याच्या पिशव्या भरून घेतल्या. येथून पुढे गावापर्यंत नाळेत सर्वत्र वाहते पाणी होतेच. आणखी पंधरा मिनिटं नाळ उतरत गेलो की ही नाळ डावीकडून येणाऱ्या मुख्य नाळेच्या ओढय़ाला मिळते. येथून पुढील चाल म्हणजे ओढय़ातील दगडगोटय़ांवरून उडय़ा मारत गाव जवळ करणे होय. वीसेक मिनिटात ओढय़ातून डावीकडे वळलेल्या पायवाटेनं आम्ही पणदेरी गावाच्या शेतात पोहोचलो. झापावर थांबून भूकाग्निला शांत केले आणि पणदेरी गाठले.

गावात मोहिते मामांना भेटायची इच्छा त्यांच्या घराला कुलूप असल्यामुळे पूर्ण होऊ  शकली नाही. भिकनाळ – जननीची नाळ ट्रेकदरम्यान पणदेरीला आमच्या वास्तव्यात मोहिते मामांनी फार अगत्याने आमचा पाहुणचार केला होता. टमटम उपलब्ध नसल्याने रणरणत्या उन्हात आणखी दीड किलोमीटर डांबरी सडकेवर रटाळ पायपीट करत मांघरूण गाठावे लागले. तिथून पुढे बिरमाणी-ढालकाठी येथून कोकण सोडून वरंध घाटाने भोरला आलो. तेथून कापूरहोळ-चेलाडी-वेल्हा असे अनेक वाहने बदलत वेल्ह्य़ाहून मुंबईला निघालो तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले होते.

प्रीती पटेल – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व ट्रेकर ब्लॉगर ( Trackerblogger ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या