सह्य़ाद्रीच्या डोंगररांगा हाडाच्या ट्रेकर्सना नेहमीच साद घालत असतात. हरिश्चंद्र गडाचा ट्रेकही असाच. कितीही वेळा केला तरी तो नवनव्या वाटा धुंडाळू पाहणाऱ्यांच्या हाती असा काही खजिना ठेवतो की पावलं पुढच्या शोधासाठी पुन्हा आपसूक तिकडे वळतात.

गेले कित्येक दिवस एका भन्नाट ट्रेकचा बेत शिजत होता. तो होता शिव-सह्य़ाद्रीचं मनस्वी दर्शन घडवणाऱ्या ‘हरिश्चंद्रगडा’चा. अर्थातच, नेहमीच्या रुळलेल्या वाटांवरून खिरेश्वर किंवा पाचनई गावातून करायचा हा ट्रेक नव्हता. तर ‘प्रगतं दक्षिणमिति प्रदक्षिणं’ या वचनानुसार आम्ही दक्षिणेकडून (डावीकडून) गडाला सुरुवात करून प्रदक्षिणा घालणार होतो. हरिश्चंद्रगडाची अनुभूती घेणार होतो – ‘जुन्या माळशेज’ घाटवाटेतून, ‘काळूच्या वोघा’जवळून, पश्चिमेच्या बेलपाडा गावातून, उत्तरेच्या ‘सादडे घाटा’तून, गडाच्या कोकणकडय़ावरून आणि आग्नेयेच्या ‘जुन्नर द्वारातून राजनाळे’तून. बेत होता तीन दिवसांच्या खडतर परिक्रमेचा. साकेत आणि मििलद हे कसलेले ट्रेकरदोस्त सोबत असल्यामुळे ही परिक्रमा आनंददायी होणार याची खात्री होती.

Gold Silver Price on 1 March
Gold-Silver Price on 1 March 2024: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात तेजी, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
tipeshwar sanctuary, archi tigress, cubs, attracting tourists, viral video, yavatmal, nagpur,
VIDEO : टिपेश्वरच्या जंगलात “आर्ची” आणि तिच्या बछड्याने पर्यटकांना लावले वेड
Performance of Pankaj Mohit from Wadala slum in Pro Kabaddi League mumbai
प्रो कबड्डी लीग मध्ये वडाळ्याच्या झोपडपट्टीतील पंकज मोहितेची कामगिरी; पुणेरी पलटणचा आधारस्तंभ

अवसरी घाटात ढाब्यातलं जेवण, नारायणगावचं ‘एक्स्ट्रा-मलई-मारके’ मसाला दूध आणि खुबी फाटय़ावर कडक चहामुळे ट्रेकच्या आदल्या रात्रीचा गाडीप्रवास सुसह्य़ झाला. मुक्कामाला हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी खिरेश्वर गावी पोहोचेपर्यंत मध्यरात्र झाली. चिंतामण कवटे यांच्या ‘ऐश्वर्या’नामक घरगुती हॉटेलपाशी मुक्काम आणि गाडीपाìकगची सोय झाली. गावात मुक्कामाला असलेल्या बेशिस्त टुरिस्टांचा कोलाहल आणि दणदणीत थंडी यांच्याकडे दुर्लक्ष करत स्लीिपगबॅगमध्ये गुरफटलो.

उजाडला परिक्रमेचा पहिला दिवस! आजचा पल्ला दमदार होता. दक्षिणेकडील ‘जुन्या माळशेज’ घाटाच्या पाऊलवाटेवरून, गडाच्या पोटातल्या ‘काळूचा वोघ’ धबधब्याजवळून आणि खोरं ओलांडून पश्चिमेकडून बेलपाडा गावातून गडाचं दर्शन घ्यायचं होतं. सकाळी साडेसहा वाजता खिरेश्वरच्या प्राचीन राऊळातल्या नागेश्वर महादेवाला वंदन करून परिक्रमेचा शुभारंभ केला.

गडाच्या दक्षिण पायथ्याशी असलेल्या पठारावरून प्रदक्षिणा घालत निघालो. नागेश्वर राऊळ आणि शेजारच्या कातळकोरीव लेण्यापासून माळशेज घाटाकडे जाणारी पाऊलवाट आम्ही निवडली होती. वाटेतल्या कातळावरचं कोरलेलं शिविलग बघता, ही वाट पुरातन काळापासून वापरात असणार असं वाटलं. दीड तासाची पठारावरून चाल, पण किती मनोहारी. पूर्वेला सूर्य अजूनही निरोळी-रांजणाच्या डोंगरांमागे दडलेला. तरीही, हरिश्चंद्रगडाच्या शिखरांचे (हरिश्चंद्र-तारामती-रोहिदास) माथे हलकेच उजळू लागलेले. वाटेवरून कधी दिसलं गडाचं देखणं प्रतििबब पुष्पावती नदीतल्या पात्रात, तर कधी गड उठून दिसला वाऱ्यावर डोलणाऱ्या सोनसळी गवताळ पठारामागे. कधी खिळवून ठेवलं तळ्याच्या काठी उमललेल्या निळ्या मंजिऱ्या, पोहणारी बदकं आणि मागे गडाच्या विस्तृत पॅनोरमाने. आमच्या परिक्रमेची सुरुवात अशी प्रसन्न झालेली..

हरिश्चंद्रचं सर्वागसुंदर दर्शन

घाटमाथ्यापासून कोकणात उतरणाऱ्या माळशेज घाटाचा ‘गाडीरस्ता’ बनायच्या काहीशे वष्रे आधीपासून वापरात होती ‘जुन्या माळशेज’ घाटाची पाऊलवाट. मराठय़ांच्या वसई मोहिमेत या घाटातून भिवंडीकडे सन्य गेल्याचे अनेक उल्लेख आढळतात. त्यामुळे हरिश्चंद्रच्या परिक्रमेत या पुरातन घाटवाटेने उतरण्यासाठी आम्ही आतुर झालेलो. घाटापाशी पोहोचण्यासाठी खुबी गावापासून महामार्गावरून कल्याणच्या दिशेने चालत निघालो. उधळ्या, घोण्या, भोजगिरी, दौंडय़ा-देवदांडय़ा अशा सह्य़माथ्याच्या अजस्र डोंगरांच्या कुशीतल्या निवांत शांत घळीत दडलेल्या घाटदेवाच्या राऊळापाशी विसावलो, तेंव्हा जुनी घाटवाट सापडणार का असा प्रश्न पडलेला. राऊळापासून परत महामार्गावर आलो, तेंव्हा डावीकडे होतं रस्त्याचं लपेटदार वळण, तर उजवीकडे होतं पर्यटन महामंडळाच्या विश्रामगृहाच्या प्रवेशद्वार. समोर घाटाचा लोखंडी सुरक्षा कठडा किंचित मोकळा ठेवला होता आणि इथूनच होती माळशेजच्या जुन्या घाटवाटेची सुरुवात!

खडका-झुडपांमधून उतार उतरू लागलो आणि लवकरच सुरू झाली दगड घट्ट बसवून बनवलेली फरसबंदीची मोठ्ठी मोकळी-ढाकळी जुनी घाटवाट आणि दिशादर्शक बाण. काही वर्षांपूर्वी गच्च कारवीच्या रानात हरवू पाहणारी ही वाट अलीकडेच वनखात्याने वाट मोकळी केली होती. समोर दिसणारी माळशेजच्या गाडीरस्त्याची वळणे आणि निरीक्षणे-टोके उंचावत गेली. वाट आता झपाटय़ाने डावीकडे (दक्षिणेला) माळशेज घाटाच्या मुख्य दरीच्या कुशीत शिरू लागली. वायव्येकडे उघडत जाणाऱ्या या दरीमधला ओढा पावसाळ्यात काय सणसणीत वाहत असेल. माथ्यापासून शंभर मीटर उतरल्यावर कातळात कोरलेल्या खोबण्या आणि पायऱ्या लागल्या. उजवीकडे ओढय़ापाशी उतरल्यावर खुणावत होतं अजस्र खडकांच्या कुशीतलं उंबराचं झाड – डवरलेलं, झुकलेलं. खोबणीत होता निखळ थंड पाण्याचा स्रोत. माळशेजच्या उंचचउंच कडय़ांच्या पोटातल्या दाट झाडीतली नीरव शांतता अनुभवली.

थोडं पुढे उभ्या खडकाळ उतरंडीवरून उतरताना जुन्या घाटवाटेच्या पाऊलखुणा सामोऱ्या आल्या. खोदीव पायऱ्या उतरत गेल्यावर उजवीकडच्या कातळात होती शेंदूरचíचत गणेशमूर्ती आणि चंद्र-सूर्याची महिरप असलेली छत्री. पल्याड उंचावर कातळात होतं खोलवर खोदत लेल्या थंड पाण्याचं टाकं आणि त्याच्या बाजूला आणखी एक अर्धवट खोदाई सोडलेलं टाकं! कित्येकशे वष्रे सन्य-व्यापार-वाटसरू यांना उपयुक्त असलेली पुरातन वहिवाट आजच्या व्यावहारिक गरजांसाठी निकामी झाली होती. जुन्या वाटेचं कवतिक आता फक्त लाकूडतोडे, गुराखी, शिकारी आणि चुकूनमाकून फिरकणाऱ्या ट्रेकर्सना!

सकाळी निघाल्यापासून अडीच तास आणि माथ्यावरून घाट उतरायला सुरुवात केल्यापासून अर्धा तास झालेला. खजूर-चिक्की-फळांचा खुराक घेऊन आणि टाक्यातलं गोड गार पाणी पिऊन टीम तरतरीत झाली. माळशेज घाटरस्त्यालगतच्या मुख्य ओढय़ाच्या उजव्या काठावरून दाट झाडीच्या टप्प्यांतून आता वाट झपाटय़ाने उतरू लागली. माळशेज घाटरस्त्यात बेताल पर्यटकांनी अव्याहत फेकलेला तऱ्हेतऱ्हेचा कचरा याच ओढय़ातून इतक्या लांब वाहत आलेला, साचत राहिलेला, विषण्ण करून गेला!

फरसबंद मोठ्ठय़ा पाऊलवाटेवरून लांबलचक वळणं घेत उतरणाऱ्या वाटेवर झुकलेल्या झाडोऱ्यावर भल्या मोठ्ठय़ा कोळ्यांनी जाळं विणलेली. अजूनही काही ठिकाणी कातळकोरीव पायऱ्या होत्या. गच्च जंगलातून निवांत रुंद वाट ओढय़ात रेंगाळलेल्या पाण्यापाशी थबकली. दोन तासांत माळशेज घाटाची ६०० मीटरची उतराई केल्यावर पायथ्याशी निसर्ग आणि तथाकथित विकास यातली विसंगती अंगावर आली. एकीकडे सह्य़ाद्रीचं विराट दृश्य, तर दुसरीकडे रान कापून रस्ते-रिसॉर्टचा भस्म्या आणि गुंठामंत्र्यांच्या स्कोíपओ!

ओढय़ातल्या रांजणकुंडांच्या नक्षीजवळून चालताना हरिश्चंद्राची उंची आणि विस्तार नजरेत मावेना. गडाची कोकणात कोसळलेली कातळिभत आणि तारामती-रोहिदास शिखरं कोवळ्या उन्हांत न्हाऊन निघत होती. वाघराच्या शेंदूर फासलेल्या शिल्पाच्या बाजूने, मोकळ्या पठारावरून जीपरस्ता अध्र्या तासात थिटबी गावाकडे घेऊन जाणार होता. डावीकडे झाडोऱ्यात घाटाचं रक्षण करणाऱ्या मारुतीचं ठाणं, त्याच्या पूर्वेला एक कबर. घाटाकडे जाणाऱ्या वाटेवर खडकात व्याघ्र-चंद्र-सूर्य अशा निसर्गदेवता खोदलेल्या. कोरलेल्या व्याघ्राचे लांब पाय, लपेटदार शेपूट आणि टवकारलेले कान रानच्या राजाचा रुबाब आणि दरारा दाखवणारे. माळशेजच्या जुन्या महत्त्वाच्या घाटवाटेवरून उतराई करत आम्ही हरिश्चंद्र-दर्शन घेतलं होतं. असा हा परिक्रमेचा पहिला टप्पा आम्हाला सुखावून गेलेला..

काळूच्या वोघापासून हरिश्चंद्रचं रौद्रविराट दर्शन

माळशेज घाटाच्या पश्चिम कातळकडय़ामध्ये एक निसर्गनवल दडलंय. ‘काळूचा वोघ’ नावाचा अजस्र धबधबा. धबाबा तोय आदळून धबधब्याच्या पोटापाशी बनलेला ‘वोघ’ (म्हणजे घळ) आणि रांजणखळगे बघण्याची उत्सुकता होती. थिटबी गावामध्ये सॅक्स ठेवून परत एकदा आल्या वाटेने पूर्वेला सह्य़ाद्रीकडे निघालो. माळशेजघाटाची जी जुनी पाऊलवाट आम्ही उतरलो होतो, त्याच्या उत्तरेला (डावीकडे) ‘काळूचा वोघ’ असणार होता. घाटाकडे जाणारा कच्चा रस्ता सोडून डावीकडील रानातल्या वाटेने निघालो. एव्हाना ऊन तापायला लागलेलं आणि वारं पडलेलं. दोन कोरडे ओढे पार केले आणि समोरचं दृश्य बदलू लागलं. सह्य़ाद्रीच्या िभतीच्या जवळजवळ जाणारी वळणां-वळणांची हलक्या चढाईची वाट आता काळूच्या मुख्य मोठ्ठय़ा ओढय़ाच्या पात्रात उतरली. समोर होता अक्षरश: थ-रा-रू-न टाकणारा पॅनोरमा. हरिश्चंद्रगडाची शिखरे आभाळात घुसलेली. डावीकडे मागे अफाट उंचीची रोहिदास-तारामती शिखरे, रोहिदासजवळचा सुळका ‘काटय़ाची िलगी’ आणि समोरचे अजस्र धबधबे – डावीकडचा ‘काळूचा वोघ’ आणि उजवीकडचा ‘रेठीचा झुरा’. आता आम्ही ओढय़ाच्या पात्रामधून डाव्या बाजूने चढत काळूच्या वोघाजवळ पोहोचलो. थिटबी गावातून सॅक्स न घेता काळूच्या वोघापाशी पोहोचायला तासभर लागलेला. समोर होता घाटमाथ्यापासून पाच टप्प्यांमध्ये उतरणारा अजस्र धबधबा – काळूचा वोघ आणि पाण्याने दोहोबाजूचा कातळ कातून बनवलेली रांजणकुंडं आणि एक जबरदस्त घळ – २५० ते ३०० फूट लांब आणि ७०-८० फूट खोलीची. रौद्रविराट सह्य़ाद्रीच्या दर्शनाने भारावून गेलेलो. भर पावसाळ्यात धबाबा कोसळणाऱ्या जलौघाचं काय देखणं तांडव असेल इथे! आता मात्र डिसेंबरमध्ये आम्ही कातळाला पाठ टेकून, खळाळणाऱ्या अल्लड पाण्याच्या झऱ्याचा नाद आणि हलक्या वाऱ्यासोबत घुमत येणारा कारवीचा मंद सुवास अनुभवत होतो..

डोळ्याचं पारणं फेडणारा कोकणकडा

आता गाठायचा होता हरिश्चंद्रच्या परिक्रमेतला पुढचा टप्पा! थिटबी गावातून माळशेजच्या सुपाच्या आकाराच्या खोऱ्यातून उत्तरेला जात हरिश्चंद्रगडच्या रोहिदास शिखराच्या पायथ्याची डोंगरसोंड चढून पल्याडच्या खोऱ्यात उतरायचं होतं. दुपारचे अडीच वाजलेले. भूक लागलेली. अनायासे समोर आलेलं नदीचं गारेगार पात्र, रेंगाळलेल्या पाण्याची साथ आणि गर्द सावलीचं आवताण नाकारणं शक्यच नव्हतं. काठाशी शिदोरी सोडली अन् दोन घास खाऊन घेतले. नदीच्या पाण्यापल्याडच्या उभ्या दरडीवरून उतरणाऱ्या, आणि आपल्याच प्रतििबबाने दचकून घसरणाऱ्या शेरडाची गंमत बघत विश्रांती घेतली.

काळू नदीपासून मुक्कामाचं बेलपाडा गाव गाठण्यासाठी, आमच्या चालीने अजून दोन तास लागणार होते. रोहिदास शिखराच्या पश्चिमेला उतरणाऱ्या सोंडेवर नक्की कुठे चढायचं म्हणजे पल्याडच्या खोऱ्यात उतरणारी वाट मिळेल, ते एका गुराखी आजानं समजावून सांगितलं. सपाटीवरची शेताडी पार करून िखडीकडे चढणारी योग्य वाट शोधली. आम्ही होतो रोहिदास शिखराच्या अगदी पायथ्याशी. खरंतर, हरिश्चंद्रगडावरून रोहिदास शिखराची उंची कळत नाही. इथून तळातून बघताना मात्र त्याचे एकावर एक रचल्यासारखे दिसणारे कातळ-झाडीभरले टप्पे आणि वरचा कातळमाथा बघताना मान अवघडली.

एव्हाना रोहिदासच्या सोंडेवर चढताना आमची टीम धापा टाकू लागलेली. उभा तीव्र चढ, दिवसभराचे श्रम आणि पाठीवरच्या वजनदार सॅक्समुळे वेग मंदावलेला. आधी काही काळ कोकणातल्या आद्र्रतेमुळे घामानं निथळत होतो. पुढे तर वेळोवेळी पाणी पिऊनही घाम न येता, नुसतंच इंजिन तापायला लागलं. रोहिदास शिखरापासून उतरणाऱ्या सोंडेवर कसंबसं पोहोचलो होतो. शरीर काय सिग्नल्स देतंय, त्याचा अंदाज घेऊन सक्तीचा ब्रेक घेतला. पाण्यासोबत संत्री-खजूर-चिक्की-राजगिरा असा शक्तीदायक, पण हेल्दी खाऊ घेतला.

आता पल्याड खोऱ्यातून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ाच्या दर्शनाची विलक्षण आस लागलेली. उतारावरच्या झाडीभरल्या वाटेमुळे अजूनही कुठलं दृश्य दिसलं नव्हतं. जास्तीतजास्त जलद निघालो. एका क्षणी मळलेली वाट मोकळवनात आली आणि समोर उलगडलेल्या नजरियाने आम्ही अक्षरश: स्पीचलेस!!!  ..ओढय़ापाशी रेंगाळलेलं पाणी, उंबरांनी लगडून झुकलेली झाडाची फांदी, घरी परतणाऱ्या गायी आणि सोनेरी गवताळ उतारांमागे मावळतीच्या सूर्यकिरणांनी उजळून काढलेला कोकणकडा आणि आकाशाला भिडलेली कोंबडा-न्हाप्ता-रोहिदास शिखरं!!!

..ट्रेकर्सना मदत करणाऱ्या बेलपाडय़ातल्या ‘कमळू पोकळे’च्या घरी मुक्कामाची झक्क सोय झालेली. रानोमाळ भटकलेल्या ट्रेकर्सना गर्रम पाण्याच्या अंघोळी, घरगुती जेवण आणि विश्रांतीमुळे तरतरी आली. दऱ्याकडय़ांची, ऊन्हावाऱ्याची, रानझाडीची, दमवणाऱ्या-सुखावणाऱ्या रानवाटांची दृश्यं स्वप्नातही रुंजी घालत होती. पहाटे खणखणीत आवाजात कोंबडेबुवा आरवू लागले आणि साखरझोपेतून हलकेच जाग आली. घरासमोर सारवलेल्या अंगणात आलो. बाहेर मिट्ट काळोख आणि दूरवरून घुमत येणारा पहाट भूपाळीचा मृदुंग. अंगावर काटा आला मंद थंडीमुळे आणि समोरच्या दृश्यानेही. कारण, पूर्वेला होती चांदण्या रातीनं मढवलेल्या आभाळाला छेदत जाणारी भव्य कोकणकडय़ाची अंधूक धूसर अंतर्वक्र रेषा!!!

न्हाप्ता शिखर आणि सादडे घाट

परिक्रमेच्या दुसऱ्या दिवसाची आता ओढ लागलेली. मजबूत न्याहारी करून सकाळी सातच्या आत आम्ही कूच केलं. हरिश्चंद्रगडाच्या उत्तरेला असलेल्या अजस्र न्हाप्ता (नकटा) शिखराच्या पोटातून ‘सादडे घाटा’ने (याला ‘साधले घाट’ असंही म्हणतात) चढाई करून सह्य़ाद्रीमाथा आणि पुढे मुक्कामासाठी हरिश्चंद्रगडाची चढाई – अशी भरपूर चढाई वाट पाहत होती.

बेलपाडा गावातून बाहेर पडल्यावर सह्य़ाद्रीतलं एक सर्वोत्तम दृश्य सामोरं आलं. पॅनोरमामध्ये उजवीकडे कोकणकडय़ाचं आणि डावीकडे त्याचा तालेवार सोबती ‘न्हाप्ता’ शिखराचं – अशी दोन अर्धवर्तुळाकार खोरी दिसत होती. घोडीसुळके, अजस्र न्हाप्ता शिखर, सादडे घाटाची िखड, कोंबडा शिखर, उतरणाऱ्या सोंडेवरचा केळेवाडी सुळका, कोकणकडय़ाची गूढ धूसर कातळिभत आणि रोहिदास शिखर अशा अतिभव्य दृश्याने अक्षरश वेड लावलं. भुऱ्या गवताळ माळावरून-झुडपांमधून जाणारी, वाहत्या ओहोळांशी लगट करणारी हलक्या चढउताराची मळलेली वाट न्हाप्ता शिखराच्या पायथ्याशी घेऊन गेली. अवघं खोरं साखरझोपेत हरवलं असताना, सूर्याची हलकी नाजूक किरणं न्हाप्ताच्या माथ्याला अलगद उजळवू लागली. एकावर एक रचलेले कातळटप्पे, भुरे गवताचे-झाडी टप्पे आणि अतिशय दिमाखात तोऱ्यात उठवलेलं माथ्याचं नाकाड हे दृश्य बघून अंगावर सुखद शहारा आला.

बेलपाडय़ातून निघाल्यापासून निवांत चालीने तासभर चालल्यावर एका मोठय़ा ओढय़ाशी पोहोचलो होतो. ‘‘आसं बगा, त्यो ओढा गावला ना, की गेलात तुमी सरळ सादडय़ाच्या वाटेनं. बाकी रानात जाणाऱ्या इतर ढोरवाटांवर हरवू नका’’, असं गावकऱ्यांनी बजावलं होतं. न्हाप्ताच्या पूर्वेला कातळिभतीतली सर्वात कमी उंचीची जागा म्हणजे सादडे घाट. तिथल्या िखडीच्या दिशेने ओढय़ाला लगटून घाटवाट चढणार होती.

घाटाच्या सुरुवातीला हळूहळू चढणारी प्रशस्त वाट होती. सकाळची वेळ. कारवीचा किंचित तिखट गंध आणि अनवट पक्ष्यांचे सूर आसमंतात घुमत होते. प्रत्येक क्षणी थबकून निरखावेसे वाटावे अशी न्हाप्ता शिखराची रूपं अनुभवत होतो. ओढय़ाच्या बाजूने चढत अध्र्या तासात पदरातल्या मोकळवनात पोहोचलो. कातळाला पाठ टेकवून हाताची उशी करून पडल्यावर समोर होतं सुरेख दृश्य – कोकणकडय़ाच्या कोंबडा शिखराकडून उतरणारी करवती धार, केळेवाडी सुळका, सादडे घाटाची झाडीभरली िखड आणि न्हाप्ता शिखराची उभी िभत! एव्हाना आम्हाला चढाईची मस्त लय गवसलेली आणि अधूनमधून चिक्की-फळं-खजूर असा हेल्दी खुराक चालू होताच. त्यामुळे, सह्य़ाद्रीतल्या एका सुरेख घाटाच्या चढाईची मजा अनुभवत होतो.

वाऱ्यावर डोलणाऱ्या सोनेरी गवताच्या दांडावरून उभी चढाई सुरू झाली. कातळात खोदलेल्या दोन-चार पायऱ्या बघून ही घाटवाट पुरातन आहे, याची खात्री पटली. घनदाट झाडीतून, मोठ्ठाल्या कातळांच्या बाजूने आणि नुकताच बहर येऊन गेलेल्या कारवीच्या झुडपांमधून वळणे घेत चढाई चालू होती. ओढय़ाच्या पात्रातल्या कातळापाशी फुलपाखरांची अन् मधमाश्यांची लगबग चाललेली दिसली. निरखून बघितलं, तर कातळाच्या ओंजळभर खोबणीत नितळ थंड पाण्याचा स्रोत होता. सादडे घाटात ६० टक्के उंचीवर असलेला हा पाणीसाठा साधारणत: जानेवारीपर्यंत ट्रेकर्सना आधार देतो.

उभ्या उताराच्या वळणवाटेवर दगड घट्ट बसवून फरसबंदीची उभी वाट चढताना घामटं निघू लागलं. आता यापुढची चढाई बऱ्यापकी ओढय़ातूनच होती. ओढय़ातून डावीकडे जाणारी उभ्या धारेवरची वाट घाटमाथ्याकडे पेठेच्या वाडीकडे जाते. साकेत आणि मििलदने ओढय़ाच्या उजव्या काठावरून चढणारी आणि पुढे िखडीतून पाचनईकडे नेणारी वाट अचूक पकडली. मी मात्र डोंगरउतारावरून माती-धोंडे-काटक्यांमधून धस्सक-फस्सक करत उगा जिवाला त्रास करून घेतला. मग योग्य वाट गाठल्यावर क्षणभर विश्रांती घेतली. ऊर धपापत होतं – चढाईमुळे आणि समोरच्या दृश्यानेही. गच्च झाडीतून चढत कसं आणि कित्ती चढलो याचा आलेख डोळ्यांसमोर होता. निळंशार आभाळ, हिरवंगर्द कारवीचं रान आणि काळ्या कातळाच्या पाश्र्वभूमीवर न्हाप्ता शिखर, त्याचे पूर्वेकडचे कडे, जोडशिखरे आणि माथ्याजवळचं छोटंसं नेढं भन्नाट दिसत होतं.

आता सादडे घाटाची नाळ सुरू झाली. दोहोबाजूच्या उंचच उंच कातळिभतींमधून अजस्र धोंडय़ांच्या राशीवरून चढत गेलो. पावसाळ्यात धबाबा तोय आदळून बनलेल्या खोलगट घळीतून चढताना क्वचित खोदलेल्या पायऱ्या कवतिकाने निरखल्या. अखेरीस पोहोचलो सादडे घाटाच्या िखडीत-सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यावर. बेलपाडय़ातून निघाल्यापासून इथे पोहोचायला चार तास लागलेले. िखडीत कातळावर बसून भर्राट वारं खाताना ऊर धपापलेलं, घामाने गच्च भिजलेलो; पण न्हाप्ता शिखराच्या अ-ज-स्त्र दर्शनाने अग्गदी तृप्त झालेलो. सादडे घाट फक्त ट्रेकर्ससाठी. उभ्या चढाईची, पण वापरातली पाऊलवाट आहे. कोठेच दोर किंवा इतर उपकरणांची गरज नाही. हरिश्चंद्रगडाच्या परिक्रमेतला महत्त्वाचा टप्पा गाठलेला. ट्रेकचा उत्तरार्ध सुरू झाला..

कोकणकडय़ाचं रौद्र दर्शन

हरिश्चंद्रगडाची परिक्रमा करताना आता आम्हाला पोहोचायचं होतं थेट गडावरच. पाचनईच्या नेहेमीच्या वाटेपेक्षा आम्ही शोधणार होतो, कोंबडा शिखराजवळून थेट कोकणकडय़ाकडे चढणारी आडवाट!

सादडे घाटाच्या िखडीतून पूर्वेला सदाहरित रानातून उतरणारी वाट पकडली. वाहत्या झऱ्याच्या शेजारून उतरत दहा मिनिटात गवताळ माळावर आलो, अन् समोर आला मुळा खोऱ्यातून घुमणारा वारा. डावीकडे उत्तरेला कलाडगड आणि ‘कलाडचा कोंबडा’ नावाचा सुळका, वनखात्याचा निरीक्षण मनोरा, उजवीकडे दक्षिणेला अस्ताव्यस्त पसरलेला हरिश्चंद्र पर्वत आणि कोंबडय़ाचा तुरा असावा अशा आकाराचं गडाचं ‘कोंबडा’ शिखर. वाट कशी असेल याचा अंदाज घेऊन, वाटांच्या चौकापासून उजवीकडे दक्षिणेला वळलो. वाऱ्याने पठारावर डोलणारे गवत, मध्येच कातळाची सपाटी, रेंगाळलेले पाण्याचे ओहोळ, रानफुलांची दुलई अशी गवताळ माळावरची परिसंस्था  अनुभवत तासभर सुरेख चाल होती. पाणथळ भागापाशी शेरळाच्या रानफुलांचे तुरे, शेताच्या खळ्याशेजारी शेंदूरचíचत रानदेवाचं ठाणं आणि पल्याड वाहत्या ओहोळापाशी गारेगार सावली होती. खादाडी, थोडकी विश्रांती आणि गप्पाष्टकासाठी परफेक्ट स्पॉट!

मंजिऱ्याच्या तणांच्या दुलईमागे कोंबडा आणि त्याची झाडीभरली िखड खुणावत होते. थेट िखडीची दिशा पकडून माळ तुडवत निघालो. िखडीकडे चढणाऱ्या वाटेची सुरुवात किंचित शोधावी लागली. आणि, गच्च सदाहरित जंगलातून ओढय़ाच्या उजवीकडून कारवीतून चढणारी सुरेख मळलेली वाट लागली. िखडीत पोहोचलो आणि लक्षात आलं, की कोकणकडय़ाशेजारून ट्रेकर्समध्ये प्रसिद्ध असलेली ‘नळीची वाट’ जिथे घाटमाथ्यावर पोहोचते त्याच िखडीत आम्ही पोहोचलेलो. पश्चिमेकडील काळू नदीच्या आणि पूर्वेच्या मुळा नदीच्या खोऱ्याच्या दृश्याने थकवा कुठच्या कुठे पळून गेला. एकीकडे नळीच्या थरारक वाटेचं आणि रोहिदास शिखराचे दर्शन; तर दुसरीकडे मुळा खोऱ्यातून झाडीतून चढून आलेली वाट! आता गडावर पोहोचण्यासाठी १५० मीटर्सची चढाई बाकी होती. कोंबडय़ाच्या भव्य कातळाकडे पाठ फिरवून, समोरच्या उतरंडीच्या कातळावर १० मीटर सोप्या श्रेणीचे कातळारोहण करायचं होतं. वाऱ्यामुळे सॅक हेलकावे घेत होती आणि ट्रेकर्सची भंबेरी उडवत होती. कातळ चढल्यावरच्या पठारावर डहाणीच्या तुऱ्यांवर मोहून भुंगे आणि मधमाश्या गुणगुणत होते. पठार पार करून झुडुपांमधून चढत, शेवटी कातळावरून आम्ही पोहोचलो हरिश्चंद्रगडावर! सादडे घाटातून निघाल्यापासून घाटमाथ्यावरच्या प्रसन्न वाटांनी अडीच तासात गडमाथा गाठलेला आणि समोर आलं अद्भुत दर्शन कोकणकडय़ाचं..

कोकणकडय़ावर नितांतसुंदर मुक्काम

रविवारची पर्यटकांची गर्दी ओसरू लागली आणि सख्या कोकणकडय़ासोबत आम्हाला निवांत मोकळा वेळ मिळाला. सोनेरी उतरत्या उन्हात उजळलेल्या कोकणकडय़ाचं – एकाच वेळी हृदयाचा थरकाप उडवणारं आणि त्याच वेळी उत्कट मनस्वी आनंद देणारं – दृश्य अनुभवत निवांत तासन्तास बसलो.

ट्रेकर्सना मदत करणाऱ्या भास्करकडे नेहेमीप्रमाणे मुक्काम होता. गडावर भास्कर नव्हता, पण यावेळी भेटला भास्करचा बाबा. शेवग्याच्या शेंगांची विलक्षण चवदार भाजी, भाकरी, पिठलं-भात आणि ठेचा असं जगात भारी जेवण बाबाने आग्रह करकरून वाढलं. आजच्या कमíशयल युगात भास्करच्या बाबाकडून मात्र जे निखळ मत्र आणि प्रेम अनुभवलं, त्याला तोडच नाही. मिश्कील, प्रेमळ, गप्पिष्ट, सारखं गदागदा हसणाऱ्या भास्करच्या बाबाने आमच्या मनात कायमचं घर केलं.

जेवणं झाल्यावर परत कोकणकडा फक्त आमच्यासाठी मोकळा मिळाला. चंद्रप्रकाशात उजळलेल्या कोकणकडय़ावर वाफाळलेल्या कॉफीच्या मगने हात शेकत, तारांगणातल्या उल्का धुंडाळत आणि दूरवरच्या धूसर गूढ शिखरांची टोकं न्याहाळण्यातला आनंद समजायला ट्रेकरचं काळीज हवं..

भन्नाट उतराई

दिवस तिसरा. आज हरिश्चंद्रगड परिक्रमेची सांगता करण्यासाठी जुन्नर दरवाजाची आडवाट निवडलेली. कोकणकडा आणि भास्करच्या बाबाला अलविदा करून सातच्या आत पूर्वेला मंगळगंगेच्या काठावरचं कुळकुळीत काळ्या पाषाणातले भव्य हरिश्चंद्रेश्वर राऊळ गाठलं. विश्वामित्र-हरिश्चंद्राच्या पौराणिक कथेची पाश्र्वभूमी असल्याने परिसरात लेणी-राऊळं-टाकी-शिलालेख-शिल्पे यांचा खजिना होता. समोरच्या पुष्करणीतलं पाणी ओंजळीत घेऊन एका गावकऱ्याने अघ्र्य वाहिलं, अन पाण्यातल्या तारामती शिखराच्या प्रतििबबावर तरंग उमटले.

आता आम्हांला हरिश्चंद्र शिखराजवळ चढून जुन्नर दरवाजाची वाट गाठायची होती. सूर्याची कोवळी किरणं दाट झाडीपासून निसटून गवतातून-कातळावरून जाणाऱ्या वाटेला बिलगू लागली. नेहेमीची खिरेश्वरची वाट सोडून उजवीकडे हरिश्चंद्र शिखराकडे चढणारी ठळक वाट घेतली. सुरेख कारवीतून, झुकलेल्या फांद्यांखालून चढत जाताना देखण्या मदम-पुष्पापाशी मधमाशा गुणगुणत होत्या.

हरिश्चंद्र आणि तारामती शिखरांना जोडणाऱ्या धारेवर पोहोचल्यावर, सकाळच्या कोवळ्या उन्हांत समोर आली काहीच्या काही अशक्य लँडस्केप्स. निळ्या आभाळात हलकेच विखुरलेले ढगाचे पुंजके, त्याचे क्षणाक्षणाला बदलत जाणारे रंग. उत्तरेला तालेवार दुर्ग-डोंगर-अलंग-कुलंग-मदन-कळसूबाई-कलाडगड-आजोबा-कात्राबाई-मुडा-गवळदेव-घनचक्कर-भरवगड-पाबरगड-औंढा-पट्टा-बितन; पश्चिमेला नागफणीसारखं उठवलेलं तारामती आणि मागचं रोहिदास शिखर आणि दक्षिणेला सिंदोळा, निमगिरी, माळशेजची शिखरे, ढाकोबा, गोरख-मिच्छद्र, हटकेश्वर आणि िपपळगाव जोगा धरणाचं पाणी असं विलक्षण पॅनोरमा!!!

हरिश्चंद्र शिखराला डावीकडे ठेवून गेल्यावर, खोलवर घळीत डोकावणारी चिंचोळी आडवी वाट होती. हरिश्चंद्र शिखराच्या उतारावर कातळात कोरलेलं पाण्याचं टाकं, घराचं जोतं आणि खोदीव पायऱ्या न्याहाळल्या. पठारावरून डावीकडे पूर्वेला जात दक्षिणेला उतरणारी ‘राजनाळ’ गाठली. सकाळी कोकणकडय़ापासून निघाल्यापासून गडदर्शन करत, इथे पोहोचायला दोन तास लागलेले. आता दगड-धोंडय़ातून अरुंद नाळेची उभी उतराई सुरू झाली. काही ठिकाणी उभ्या कातळाकडे तोंड करून उतरणं भाग होतं, तेव्हा आजूबाजूच्या कातळातले गोल आधार खळगे सहजीच हातात येत होते. शिविलग आणि पूजक खोदलेले शिल्प, खोदलेल्या पायऱ्या, मेटाच्या जागा बघता, पूर्वी कदाचित हीच मुख्य वाट असेल असं वाटलं. नाळ संपून धोंडे भरलेला ओढा सुरू झाला, ओढय़ात झुडुपे सुरू झाली, डावीकडच्या धारेमधले आरपार छिद्र नेढे डोक्यावर आलं. मागे वळून हरिश्चंद्रच्या भव्य कातळकडय़ांना डोळ्यांत साठवलं आणि ओढा सोडून डावीकडची आडवी वाट पकडली.

मोठ्ठी नसíगक गुहा बाजूला ठेवत गच्च कारवीमधून पुढे धारेवर पोहोचलो. कोरांटीसारखी दिसणाऱ्या कारवीच्या जातीतल्या ‘आखरा’ नावाच्या झुडुपांमधून वाट होती. कमरेएवढय़ा उंचीची ही झुडुपं अतिशय बोचत होती. चार वर्षांनी फुलणाऱ्या आखराचा मध औषधी असतो म्हणे. उभ्या धारेवरची घसारायुक्त उतराई केली. सुळकेवजा डोंगरास डावीकडून वळसा घालून आडव्या वाटेवरून कोरीव पावठय़ा न्याहाळत ओढय़ाजवळच्या गच्च झाडीत विसावलो. झाडीतून उतरणाऱ्या उभ्या वाटेने खिरेश्वर गावची सपाटी गाठली. हरिश्चंद्राच्या थरारक परिक्रमेची सांगता करणारी राजनाळ उतरायला आम्हाला तीन तास लागलेले…
साईप्रसाद बेलसरे – response.lokprabha@expressindia.com