कॉर्पोरेट कथा : मॅनेजमेंट बाय वॉक

आपले ध्येय गाठण्यासाठी जर साधने उपलब्ध नसतील तर एकाच जागी खिळून राहू नका, पुढे चालत राहा.

prashant-dandekarजपानी लोक हे उद्योगप्रिय, शिस्तप्रिय, वेळेचे बंधन काटेकोरपणे पाळणारे व त्याचबरोबर व्यवस्थापनाचे वेगवेगळे फंडे राबविणारे लोक आहेत. कायझेन, मॅनेजमेंट बाय वॉक या शब्दसंज्ञा त्यांचीच देणगी आहे.  आज आपण बघणार आहोत ‘मॅनेजमेंट बाय वॉक’ ही संकल्पना.

जपानमध्ये बऱ्याच बस स्टॉपवर खालील सुविचार लिहिलेला असतो. इथे फक्त बसेस थांबतात पण आपला अमूल्य वेळ मात्र नाही. तेव्हा आपले ध्येय गाठण्यासाठी चालत राहा. किती सुज्ञ विचार आहे ना!. आपले ध्येय गाठण्यासाठी जर साधने उपलब्ध नसतील तर एकाच जागी खिळून राहू नका, पुढे चालत राहा. ध्येय गाठण्याच्या मार्गावर निरंतर चालत राहा, साधन कधी ना कधी वाटेत मिळतेच.

हा विचार मॅनेजमेंट बाय वॉकचा सुंदर आविष्कार आहे. व्यवस्थापन फंडा हस्तिदंती मनोऱ्यात बसूनच राबवायचे नसतात, तर सहजपणे कंपनीमध्ये/ शॉप फ्लोअरमध्ये चालता चालतादेखील राबवायचे असतात.

एकदा सुप्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये मी मसाई यांचे व्याख्यान ठेवले होते. विषय होता- अनुत्पादक खर्च, ऑपरेटिंग कॉस्ट कमी करणे. मसाई यांच्या व्याख्यानासाठी आलिशान हॉल राखून ठेवण्यात आला होता. मसाई यांना ऐकण्यासाठी हॉल तुडुंब भरला होता. त्यांचे आगमन होताच टाळ्यांचा कडकडाट झाला, पण मसाई शांतपणे म्हणाले, ‘स्वागताबद्दल धन्यवाद, पण माझे व्याख्यान बंद हॉलमध्ये कसे होणार? कारण इथे तर कोणतेच काम दिसत नाही आहे. त्यामुळे आपण कामाच्या ठिकाणी जाऊ  व तेही चालत.’

मसाई यांनी सुरुवात केली ते पहिल्या मजल्यावरील कॉर्नरच्या पहिल्या खोलीपासून. ती खोली म्हणजे लॉण्ड्री रूम होती. उघडय़ा खोलीतून वाऱ्याची छान झुळूक येत होती. समोर मावळत्या सूर्याचे मनमोहक दर्शन होत होते. हे सर्व अनुभवल्यावर मसाई म्हणाले, ‘‘ही लॉण्ड्री रूम इथून हलवा व तळमजल्यावर न्या. ही रूम एखाद्या अतिथीला द्या व बक्कळ नफा कमवा. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीतील पोटेन्शियल ओळखू शकत नाही व त्याचे आपण अंडर युटीलायझेशन करतो मग ती वस्तू असो की माणूस.’’

मसाई आता पुढच्या खोलीकडे वळले होते. ती खोली म्हणजे रेस्टॉरंटला लागून असलेली बेसिन होती. त्या बेसिनमध्ये असंख्य महागडय़ा प्लेट्स, काचेचे ग्लास एकावर एक पडले होते. ते सर्व धुण्याच्या प्रतीक्षेमध्ये होते तर शेजारच्या कपाटामध्ये धुतलेले ग्लास, प्लेट्स व चमचे ठेवले होते. कपाट पाऊण भरले होते. हे पाहून मसाई खूप वैतागले. ते म्हणाले, ‘‘हा शुद्ध पैशाचा दुरुपयोग आहे. सर्वात आधी कपाटामधील अर्धे कटलरी सामान स्वच्छ पुसून, पॅकेजिंग करून बाजूला ठेवून द्या. नाही तर दुसऱ्या ठिकाणी जिथे त्यांची खरोखर गरज आहे तिथे पाठवून द्या. कपाटात सामान कमी असल्याने वापरातले प्लेट्स, कप, ग्लासेस वेळच्या वेळी धुणे आवश्यक होऊन बसेल. त्यामुळे खरकटय़ा भांडय़ांचा पसारा दिसणे कमी होईल व त्याचसोबत एकावर एक पडून असलेला ढीग कमी झाल्याने कटलरी तुटण्याची-फुटण्याची शक्यता कमी होईल व नुकसानदेखील. जपानी भाषेत ‘मुदा’ म्हणजे अनावश्यक खर्च कमी करण्यावर भर दिला जातो. पैशाची विपुलता व त्यामधून येणारी बेफिकिरी खूप नुकसान करते.’’ मसाई यांचे बोलणे चालूच होते. दुसऱ्या ठिकाणी वस्तू पाठवून दिल्याने त्यांचादेखील नवीन खरेदीवरील खर्च वाचेल. यालाच तर ऑपरेटिंग कॉस्ट कंट्रोल म्हणतात. सर्वानाच मसाई यांचे मॅनेजमेंट बाय वॉक कळतपण होते व वळतपण होते.

मसाई म्हणाले, तुम्ही कामाच्या जागी फेरफटका मारला तर तुमचे कुठे काय चुकत आहे ते सहज कळेल. मसाई म्हणाले, ‘एकदा माझा मित्र त्याच्या अमेरिकन मित्राबरोबर गावाबाहेरच्या जंगलामध्ये मॉर्निग वॉकला गेला होता. रस्त्याच्या कडेला कार उभी करून, दोघे मित्र हायवेच्या कडेला असलेल्या सव्‍‌र्हिस रोडवर चालू लागले. चालता चालता संभाषणाचा विषय होता, गळेकापू स्पर्धेमध्ये आपल्या स्पर्धकांपेक्षा एक पाऊल कसे पुढे ठेवायचे. बोलता बोलता दोघे मित्र मुख्य रस्ता सोडून जंगलामध्ये शिरले. काही अंतर कापल्यावर जेव्हा त्या दोघांना वाघाची डरकाळी ऐकू आली तेव्हा ते भानावर आले. अमेरिकन मित्र जपानी मित्राला म्हणाला, ‘मित्रा, चल पळू या इथून. वाघ येण्याआधी मुख्य रस्त्यावर लागू व आपल्या गाडीत बसू,’ असे म्हणून अमेरिकन पळायलादेखील लागला. जरा वेळाने त्याने पाठी वळून पाहिले तर जपानी मित्र अजून ही बुटाची सुटलेली नाडी बांधत होता. हे पाहून अमेरिकन मित्र म्हणाला, ‘अरे बूट काय बांधत आहेस, पळ आधी.’ त्यावर जपानी मित्र म्हणाला, ‘मित्रा जीव वाचविण्यासाठी मला गाडीपर्यंत पोहोचण्याची गरज नाही, पळताना तुझ्या पुढे एक पाऊल राहिलो तरी पुरेसे आहे व ते एक पाऊल पुढे राहण्यासाठीच मी बुटाची सुटलेली नाडी घट्ट बांधत आहे.’ हे ऐकून अमेरिकन मित्र ओशाळला. त्याला हे कळलेच नाही की वाघाने जर एकाला पकडले तर दुसऱ्याला पुढे धावण्याचीच गरज लागणार नाही. त्यामुळे जीव वाचविण्यासाठी कार गाठणे जरुरी नाही. जपानी मित्राने त्या आणीबाणीच्या प्रसंगीदेखील स्पर्धेत टिकून राहण्याचा महामंत्र आपल्या अमेरिकन मित्राला सांगितला होता.

कधी कधी जेव्हा आपण अचानक समोर आलेल्या पेचप्रसंगामुळे घाबरलेलो असतो तेव्हा आपण सारासार विचारशक्ती हरवून बसतो. आपण सोपी युक्ती शोधण्याऐवजी क्लिष्ट उपाय शोधण्यामध्ये आपली शक्ती वाया घालवितो. अशा वेळी खरे तर गरज असते ती फक्त एक पाऊल इतरांपेक्षा पुढे राहण्याची.
प्रशांत दांडेकर – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Management by walk

Next Story
मोबाइल नव्हते तेव्हा… तेव्हाही संपर्क परिपूर्णच!
ताज्या बातम्या