News Flash

तोंडचे पाणी पळाले

पेरण्या करून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांना चिंतेने धार लागायची वेळ आली आहे.

| July 19, 2015 01:59 am

महाराष्ट्रात जूनमध्ये पाच-सहा दिवस दमदार बरसल्यानंतर पाऊस जो सुट्टीवर गेला आहे, तो अद्यापि परतायचे नाव नाही. पेरण्या करून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांना चिंतेने धार लागायची वेळ आली आहे. एकीकडे पावसाअभावी दुष्काळी स्थिती आ वासून आहे, तर दुसरीकडे धरणांनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह जलसिंचनाचे संकटही गहिरे झाले आहे. या साऱ्याचा विभागवार आढावा घेणारे रिपोर्ताज..

विदर्भ.. तोंडचे पाणी पळाले
 देवेंद्र गावंडे
गेल्या वीस दिवसांपासून विदर्भात पावसाचा पत्ता नाही. उन्हाळ्यालाही लाजवेल असे अंगाची काहिली करणारे ऊन, त्या उन्हात शेतात आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी, कोणतेही शिवार बघितले तरी अर्धवट उगवलेले आणि आता करपू लागलेले पीक, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची वानवा, ओस पडलेले भाजीबाजार.. हे चित्र विदर्भात सर्वत्र बघायला मिळते. ‘जुलै कोरडा गेला तर करायचे काय?’ हाच चिंतित करणारा प्रश्न ५० लाख हेक्टरमध्ये खरिपाच्या हंगामाचे नियोजन करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला सतावतो आहे. २२ जूनपासून पावसाने दडी मारली आहे. अधूनमधून आकाशात ढग दिसतात. त्यांची गर्दीही झालेली दिसते; पण पाऊस मात्र पडत नाही. या स्थितीमुळे प्रामुख्याने कोरडवाहू शेतकरी हैराण झाला आहे. जूनचा दमदार पाऊस बघून पूर्व विदर्भात आठ लाख हेक्टर, तर पश्चिम विदर्भात १२ लाख हेक्टरमध्ये शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. यंदा पाऊस बरा असेल असा आडाखा असल्याने शेतकऱ्यांनी कापसाचे क्षेत्र वाढवले. आता ही पेरणी वाया जाण्याचीच भीती व्यक्त होत आहे. पूर्व विदर्भात धानाचे पीक पिवळे पडले आहे. पश्चिम विदर्भात उडीद व मुगाचा पेरा भरपूर असतो. यंदा तो नाहीच. आणि आता त्याची पेरणीही होऊ शकत नाही, कारण बराच उशीर झाला आहे, असे शेतकरी सांगतात.
दरवर्षी जुलैमध्ये भरणारी लहान-मोठी धरणे यंदा तळाला लागलेली दिसतात. पश्चिम विदर्भात २५, तर पूर्व विदर्भामध्ये २४ टक्के एवढाच पाणीसाठा त्यांत शिल्लक आहे. ही धरणे भरली नाही तर आताच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. विदर्भातील जलस्रोत मजबूत होऊ शकलेले नाहीत. पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडेच आहेत. आज पश्चिम विदर्भातील ११८ गावे आणि आठ वाडय़ांमध्ये पाणीटंचाईमुळे ऐन पावसाळ्यातही टँकर्स सुरू आहेत. धरणांनी तळ गाठलेला बघून पाणीवाटपाचे नियोजन करणारी यंत्रणाही हबकून गेली आहे. गेल्या वर्षी वादळी पावसाने वेळोवेळी तडाखा दिला. त्यात हातात आलेले पीक गेले. यंदा नव्या राज्यकर्त्यांनी कर्ज पुनर्गठन केले. राष्ट्रीयीकृत बँकांना कर्ज द्यायला लावले. या साऱ्या भानगडी करून नवे कर्ज कसेबसे मिळवणाऱ्या शेतकऱ्याला आता पावसाने इंगा दाखवायला सुरुवात केली आहे. विदर्भात भाजीपाल्याचे उत्पादन तसेही कमी. बाजारात जो माल येतो तो हंगामानुसार. यंदा पाऊसच नसल्याने या बाजारावरसुद्धा अवकळा आलेली दिसते. जूनच्या पावसानंतर विदर्भातील कृषी उत्पादनाच्या बाजारात शंभर कोटींची खरेदी झाली. आता ही खरेदी वाया जाण्याची भीती या क्षेत्रातले जाणकार व्यक्त करताना दिसतात. अजून दोन आठवडे पाऊस पडला नाही तर बळीराजाला दुबार पेरणीला सामोरे जावे लागेल. त्यासाठी लागणारा पैसा कसा उभा करायचा, हा बहुसंख्य शेतकऱ्यांसमोरचा प्रश्न आहे. विदर्भात जलयुक्त शिवार योजनेतून यंदा बरीच कामे झाली. शेकडो शेततळी, लहान बंधारे तयार झाले. हे सर्व बंधारे व तळी सध्यातरी कोरडीठाक आहेत. जूनच्या पावसाचे पाणी त्यात साचले, पण कडक उन्हाने ते आटले. ‘सरकारने प्रयत्न केला, पण निसर्गच कोपला, त्याला करायचे काय?’ असा प्रश्न आज गावागावात विचारला जातो आहे. सध्या मे महिन्याला लाजवेल असे ऊन पडल्याने साथीच्या आजारांची भीती गाठीला आहेच. एकूणच निसर्गाच्या या उफराटय़ा चक्राने अनेकांच्या डोळ्यांत आसवे आणली आहेत.        

मराठवाडा.. चिंतेचे मळभ
सुहास सरदेशमुख

2कोरडय़ा नद्या, आटलेली धरणे, टँकरच्या फेऱ्या, खोल खोल जाणाऱ्या विंधन विहिरी हा भवताल यावर्षी तरी बदलेल, अशी पावसाने आशा लावलेली. गेल्या दशकभरात मृग नक्षत्रादिवशी कधी पावसाने हजेरी लावली नव्हती; पण यावर्षी तो आला आणि दुष्काळी मराठवाडय़ातील माणसाला जगण्याची नवी उमेद मिळण्याची आशा निर्माण झाली. पण एक-दोनदा तोंड दाखवून पाऊस जो गेला, तो गेलाच. आता पिकांनी माना टाकल्या आहेत. जी काही पिके तग धरून आहेत, त्यांची जगण्याची उमेद फार फार तर तीन-चार दिवसांची.
यावर्षी पावसाला वेळेवर सुरुवात झाल्याने मूग व उडीद या पिकांचा पेरा चांगला वाढला होता. बीड, औरंगाबाद, जालना आणि अगदी उस्मानाबाद व लातूर या तुलनेने पावसाची कमी सरासरी असणाऱ्या जिल्ह्य़ांमध्येही पेरणी झाली. तब्बल ७४ टक्के इतकी पेरणी झाली. एका एकराचा खर्च पाच हजार रुपये जरी धरला, तरी ७० हजार एकरांवरील पेरणीचा हिशेब न केलेलाच बरा. कारण ही पेरणी वाया गेली आहे. आता नव्याने पेरणी करायची तर त्यासाठी पैसा कोठून आणायचा, हा बळीराजासमोरचा प्रश्न आहे. बँकांनी पीककर्ज देण्यात हात आखडता ठेवला तो ठेवलाच. या कर्जप्रक्रियेसाठी दहा टक्क्यांपर्यंत शुल्कदेखील आकारले. ३२ हजार हेक्टरवर कापूस, सोयाबीन, मका, मूग, उडीद या पिकांचे बियाणेही आता वाया गेले आहे. नव्या पेरणीसाठी पुन्हा रान तयार करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. जी काही पिके तग धरून आहेत ती कधीही करपतील असेच वातावरण असल्याने गावात गेल्यावर शहाण्यासुरत्या माणसाला प्रश्न विचारला जातो की, ‘सरकार विमानाने पाऊस पाडणार होते, त्याचे काय झाले?’
इथल्या सततच्या दुष्काळावर काय केल्याने मात होईल, या प्रश्नाच्या उत्तरात जे काही करायला सांगितले जाईल ते करण्याची मानसिकता मराठवाडय़ात आता निर्माण झाली आहे. त्यामुळेच जलयुक्त शिवार योजनेला प्रतिसाद मिळाला. मात्र, सरकारी काम कितीही वेगात करण्याचे ठरले, तरी त्याची म्हणून एक गती असते. त्यामुळे सिमेंट बंधाऱ्यांची अनेक कामे तशीच रेंगाळली आहेत. पीक  तर गेलेच, पण रोपांची एवढीही वाढ झाली नाही, की त्याचा चारा म्हणून उपयोग होईल. त्यामुळे पाऊस आला नाही तर स्थिती हाताबाहेर जाईल, हे नक्की.
गेल्या तीन वर्षांपासून मराठवाडय़ातील नांदेड वगळता एकाही शहरात दररोज पिण्याचे पाणी येत नाही. इथल्या लोकांना याची आता सवयच झाली आहे. महिनाभराने नळाला पाणी आले तरी त्याचे अप्रूप वाटावे अशीच एकूण स्थिती आहे. दुष्काळ पुन्हा एकदा हजर झाला आहे. शुष्क भोवतालाची सवय असणाऱ्यांना आता ही स्थिती किती काळ आणि कशी सहन करता येईल, हे सांगणे अवघड आहे. दुष्काळात लढण्याची ताकद निर्माण करण्यासाठी लागणारे उसने अवसानसुद्धा आज मराठवाडय़ातल्या माणसात शिल्लक राहिलेले नाही. या भागाचे अर्थकारण आक्रसलेले होतेच; आता पुन्हा आभाळमायाही आटल्याने ‘टँकरवाडय़ा’तील चिंता आणखीन वाढली आहे.    

उत्तर महाराष्ट्र.. दुबार पेरणीची आफत
अनिकेत साठे
दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या उत्तर महाराष्ट्रात पावसाने जवळपास तीन आठवडय़ांपासून हात दाखविल्याने शेतकरी अस्वस्थ झालेला आहे. पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र होण्यासोबत आतापर्यंत लागवड झालेल्या एकूण क्षेत्रापैकी १८ ते २० टक्के क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पावसाअभावी कापूस, मका, ज्वारी, बाजरी, भुईमुग आणि कडधान्याची रोपे जळण्याच्या मार्गावर असल्याने पुन्हा पेरणीची वेळ आल्यास पैसा कुठून आणणार, ही चिंता शेतकऱ्यांना सतावते आहे. उत्तर महाराष्ट्रात जूनच्या मध्यावर पावसाचे जोरदार आगमन झाले होते. पाच ते सहा दिवस मुसळधार पाऊस झाला. वेळेवर पावसाचे आगमन झाल्यामुळे सुखावलेला शेतकरी तो त्यानंतर अंतर्धान पावल्याने हबकला आहे. पीककर्ज काढून बहुतेकांनी खरीप पेरणी केली होती. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांत एकूण क्षेत्रफळाच्या ४० ते ६० टक्क्यांपर्यंत पेरणी झाली आहे. नाशिकचा विचार करता सहा लाख ६० हजार हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी जवळपास तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्यातील ५० हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करावी लागणार असल्याचा आराखडा कृषी विभागाने तयार केला आहे. धुळे जिल्ह्यात ४० हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीची तयारी करण्यात आली. जळगाव व नंदुरबार जिल्ह्यात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात वर्षभर पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यात आता नेमका मोसमातच पाऊस गायब झाल्यामुळे नवे संकट उभे आहे. मागील काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. नैसर्गिक आपत्तीची नुकसानभरपाई मिळत नसताना डोईवर कर्जाचा डोंगर वाढत असल्याची अनेकांची भावना आहे.
दुसरीकडे पावसाअभावी शहरांवरदेखील पाणीकपातीची टांगती तलवार आहे. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये जुलैच्या मध्यावर ८४ गावे आणि १९० वाडय़ांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जळगावमध्ये ही संख्या पाच, तर धुळे जिल्ह्यात दोन गावे आहे. दुर्गम भागात पिण्याच्या पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात लोकांना भटकंती करावी लागते आहे. उत्तर महाराष्ट्रातील मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये १३ ते २२ टक्क्यांच्या दरम्यान जलसाठा आहे. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यास सुरुवात झाली असून ऑगस्ट महिन्यात पहिली शाही पर्वणी आहे. लाखो भाविकांचा सहभाग असणाऱ्या या मेळ्यात पिण्याच्या पाण्याची मोठय़ा प्रमाणात तजवीज करावी लागणार आहे. त्यामुळे पावसाचे लवकर पुनरागमन न झाल्यास वर्षभर मुक्तहस्ते पाणी वापरणाऱ्या नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.    

कोकण..  भातलावणी रखडली
सतीश कामत
राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच कोकणातही पावसाने दडी मारल्यामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. तसं पाहिलं तर या विभागात गेली काही र्वष पावसाची अनियमितता वाढली आहे. शिवाय दोन मोठय़ा पावसांच्या दरम्यानचा कोरडा कालखंड वाढता राहिला आहे. या प्रदेशातील मुख्य अन्न असलेल्या भातपिकाच्या उत्पन्नावर त्याचा विपरित परिणाम झाला आहेच; पण यंदाच्या वर्षी जूनच्या तिसऱ्या आठवडय़ात झालेल्या धुंवाधार पावसानंतर सुमारे पंधरा दिवसांपेक्षाही जास्त काळ पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे लावण्या रखडल्या आहेत; त्याचबरोबर भाताची रोपेही पिवळी पडू लागली आहेत.
कोकण विभागातील तीन जिल्ह्यांपैकी रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. त्यापैकी आतापर्यंत सुमारे ३० टक्के पाऊस झाला आहे. पण त्यातील बहुतांश जूनच्या दुसऱ्या आठवडय़ातील आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भातशेती अडचणीत सापडली आहे. भाताचं कोठार मानल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात एकूण सुमारे सव्वा लाख हेक्टर क्षेत्र भाताखाली आहे. पण त्यासाठी केल्या जाणाऱ्या लावणीच्या जेमतेम २० टक्के कामं पूर्ण झाली आहेत. भातखाचरांमधील पाणी नाहीसं झाल्यामुळे अनेक ठिकाणी रोपं जळू लागली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातही जूनच्या मध्यानंतर पावसाने त्या महिन्याची सरासरी गाठली असली तरी गेल्या सुमारे पंधरा दिवसांत जिल्ह्यात सरासरी शंभर मिलिमीटरसुद्धा पाऊस पडलेला नाही. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे साडेचारशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. याचा मोठा फटका भातशेतीला बसला आहे. जिल्ह्यात एकूण सुमारे ७५ हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती होते. पण यंदा पुरेशा पावसाअभावी आत्तापर्यंत जेमतेम सुमारे ३० टक्केच लावणी झाली असून उरलेल्या लावणीसाठी शेतकरी मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची परिस्थिती बरी आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत यंदा फक्त ४७ मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. ही तूट कधीही भरून निघू शकते. पण याही जिल्ह्यात विशिष्ट कालावधीत भरपूर पाऊस आणि उरलेले दिवस चक्क ऊन असे वातावरण असल्यामुळे लावणीची गती मंदावलेलीच आहे. जिल्ह्यातील सुमारे ६२ हजार हेक्टर भातशेतीपैकी सुमारे ७० टक्के क्षेत्रातील लावणीचं काम बाकी आहे.
राज्यात सर्वत्रच पावसाने अशा प्रकारे ओढ दिली असल्यामुळे दुबार पेरणीची चर्चा सुरू झाली आहे. अन्य पिकांबाबतीत तसं शक्य असलं तरी कोकणातील भातशेतीबाबत आधी पेरणी आणि उगवून आलेल्या रोपांची लावणी करण्याच्या पद्धतीमुळे हे जवळजवळ अशक्यच असतं. कारण पेरणी-लावणीचं वेळापत्रक पावसाशी निगडित आहे. त्यामुळे नव्याने पेरणी केल्यास हे सर्व वेळापत्रक पुढे सरकेल आणि त्या प्रमाणात नंतरच्या काळात पाऊस मात्र कमी झाल्यामुळे भात चांगल्या प्रकारे पिकू शकणार नाही.
राज्याच्या अन्य भागांप्रमाणे कोकणात कधीही दुष्काळ पडलेला नाही. सुमारे आठ-दहा वर्षांपूर्वीपर्यंत तर पाऊस बऱ्यापैकी नियमितपणे पडत असे. अगदी अलीकडे २०१२-१३ च्या मोसमात पावसाळ्याचे चारही महिने नियमितपणे पाऊस पडला होता. पण असं वर्ष अपवादानेच येऊ लागलं आहे. तरीसुद्धा इथल्या शेतकऱ्याची उपजीविकेची गरज भागण्याइतकं भात पिकत आलं आहे. तसंच पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष्य कधीही निर्माण झालेलं नाही. या पाश्र्वभूमीवर यंदा पावसाने खूपच ताण दिला असला तरी पावसाळ्याच्या उरलेल्या सुमारे अडीच महिन्यांच्या कालावधीत ही कसर भरून निघेल अशी आशा इथला शेतकरी बाळगून आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 1:59 am

Web Title: absence of rain create seviour condition in all parts of maharashtra
Next Stories
1 मर्द तेथेचि जाणावा
2 श्रीजगन्नाथाचे नव-कलेवर
3 देवलांच्या नाटय़लेखनाबद्दलचे वेगळे तपशील
Just Now!
X