|| मकरंद देशपांडे

आठवणींशिवाय माणूस जगू शकत नाही. पण माणूस आठवण बनवतो का? आठवण आपोआप बनते का? आठवण ही जगलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या, अनुभवलेल्या क्षणांची असते. चांगल्या-वाईट, उपयोगी-निरुपयोगी, सकारात्मक-नकारात्मक घटनांची असते. आपल्या बोलण्यात सहज आपण म्हणतो- ‘मला आठवलं’, ‘मला आठवतंय’ किंवा ‘मला आत्ता आठवत नाहीए, पण आठवेल.’ जगलेला ‘काल’ हा आज आठवण बनून उद्याच्या उद्यासाठी आजन्म जिवंत असतो..आठवणीत.

मी लंडनला होतो आणि मला मुंबईची खूप आठवण आली. मुंबईतल्या तालमींची, पृथ्वी थिएटरची, घरची आणि मुंबई शहराच्या काही प्रिय-अप्रिय घटनांची.. आणि लंडन आणि मुंबईतलं अंतरच मिटलं. मग विचार आला की- आठवण काढल्यानं आठवण आलीये की आठवणींची गरज होती म्हणून? आणि समजा, उद्या काही आठवलंच नाही तर? फक्त मलाच नाही, तर अख्ख्या मुंबई शहराला!!

नेमकं काय होईल? एक नक्की, की ज्या अप्रिय घटना घडल्या आहेत, त्यांची अप्रिय आठवण राहणार नाही. आपल्या मनाला कॉम्प्युटरसारखं डिलीट फंक्शन नसतं. पण जर स्मृतीच नाहीशी झाली तर आपोआप सगळंच डिलीट होईल. एखादं मशीन पुन्हा फॉरमॅट करताना आधी आहे ते सगळं  डिलीट होतं. वाह!!  म्हणजे एक नवीन मुंबई शहर!! चालेल का?

पुन्हा नव्यानं ओळखी, नवीन नाती, नव्यानं देवावर श्रद्धा, नव्यानं प्रेम, नवीन भांडणं, नवीन संवाद, नवीन व्यवस्था, नवीन राजनीती, नवीन दृष्टिकोन.. ‘अ ब्रँड न्यू लाइफ’!! लंडनहून विचार करताना मजा वाटली. पण सगळं नवीन करताना जुनं घालवायला काहीतरी भन्नाट किंवा विक्षिप्त घडावं लागेल.

माझ्यासारख्या नाटककारानं आता हा विचार आपल्या पेनमध्ये भरला. फारच महत्त्वाकांक्षी आणि अवघड विषय निवडला गेला- नाटक लिहायला! मग आता नाटक लिहिताना तो सोपा करायला हवा. पण त्याचा रिझल्ट हा एका खऱ्या अर्थाने प्रायोगिक नाटकात होणार, याबद्दल शंका नव्हती.

एका शहराची मेमरी घालवायची कशी? एखाद्या सव्‍‌र्हरशी जोडलेलं नेटवर्क कट करण्याएवढं ढोबळ असून चालणार नाही.. म्हणजेच काही प्रतीकात्मक लिहावं लागणार. आठवण म्हणा किंवा स्मृती म्हणा; पण खूप आठवायच्या झाल्या किंवा खूप वषर्ं आठवणी टिकवायच्या झाल्या तर त्याला ‘एलिफंट मेमरी’ लागते. असं म्हणतात की, हत्ती हा मिळालेल्या अन्नाची आणि पाण्याची जागा वर्षांनुवर्षे लक्षात ठेवतो. त्याच्या स्मरणशक्तीमुळे तो ऐंशी वर्षांपर्यंत जगू शकतो. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. त्यामुळे पशाची कसरत आणि जीवनाची सर्कस मुंबईत चालते. फक्त त्याचं कॅल्क्युलेशन करायला सगळे ‘मॅथ्स एक्स्पर्ट’ असतातच असं नाही. आता या प्रतीकांमधनं कथासूत्र आणि त्यातलं नाटय़ शोधायचं!! मनाला कुणीतरी मोहिनीविद्येने मंतरून टाकलंय असं वाटलं.

प्रतीकाचा भार उचलणारा हा एक बँक कॅशियर सुदर्शन आहे आणि त्याने आपल्या बायकोवर पशापेक्षा जास्त प्रेम केल्यामुळे संशयाने त्याला ग्रासलंय. त्यामुळे आपल्या बायकोला प्रेमानं ‘सा’ म्हणणाऱ्या सुदर्शनने आपल्या बायकोबरोबर घालवलेल्या जवळपास सगळ्या प्रिय क्षणांना अप्रिय केलं आहे. भेटणारा प्रत्येक पुरुष हा ‘सा’कडे वेगळ्या नजरेनं पाहतो आणि ‘सा’ला त्या प्रत्येकाबद्दल आकर्षण असतं असं सतत वाटल्याने तो मुंबई या मायानगरीत एका रात्री आपल्या बायकोचा पाठलाग करतो. ती आपल्या पहिल्या नवऱ्याला (डायव्होर्सड्) सोडायला (दारू प्यायलेला असल्यानं) त्याच्या घरी जाते. सुदर्शनला त्या रात्री ‘सा’चा इतिहास संपवायचा असतो. पण तो इतिहास त्याच्या मनाने बनवलेल्या अप्रिय आठवणींचा असतो.

त्याच रात्री कथानकात आणखीन एक पात्र- गणिताची शिक्षिका आपल्या छोटय़ा मुलाला घेऊन सर्कस पाहायला जाते. तिथं एक हत्ती साखळदंडाने बांधलेला असतो, कारण त्याची मन:स्थिती नीट नसते. सर्कस पाहून तिच्या मुलाला विदूषक आवडतो. सर्कसच्या तंबूच्या मागे ती मुलाला विदुषकाला भेटवते. विदूषक तिच्या मुलाला खूप हसवतो. आईला खूप बरं वाटतं. तिच्या आयुष्याचं गणित चुकलेलं असल्यानं (नवरा सोडून गेलेला असल्याने) तिला आपल्या वाटय़ाला आलेल्या दु:खावर रडण्यापेक्षा आनंदाने डोळ्यांत पाणी येतं. आणि अचानक मानसिक संतुलन बिघडलेला हत्ती साखळदंड तोडून पळतो.

आता मुंबईच्या रस्त्यांवर सुदर्शन आपल्या बायकोचा संशयामुळे पाठलाग करतोय. त्याला तिच्याबद्दलच्या अप्रिय आठवणींचा इतिहास बदलायचाय. आणि सर्कशीतला हत्ती- ज्याने गणिताच्या शिक्षिकेच्या डोळ्यांतले अश्रू पाहिले आणि साखळदंड तोडले- तोही आता वेडापिसा होऊन मुंबई शहराच्या रस्त्यांवर फिरतोय.

रात्रभर दोन हत्ती मुंबईत वेडेपिसे फिरत होते. एक सुदर्शनच्या मनातला अप्रिय आठवणींचा आणि दुसरा सर्कशीतला (त्याचं मानसिक संतुलन ढळण्याचं कारण- सर्कस)! दोन्ही हत्तींच्या पिसाटण्यानं भांबावून गेलेली रात्र पहाट घेऊन आली ती वेड लावणारी- किंवा काहीही वाटणंच विसरायला लावणारी. रात्रभर धिंगाणा घालत होता म्हणून सुदर्शनला पोलिसांनी पकडलं होतं. पण पहाटे तो आनंदात होता. कारण त्याने आपला हत्ती रात्री गायब केला होता. अर्थात आता तो ‘सा’च्या संशयातून बाहेर पडला होता. पण पोलिसांचा त्याच्यावर संशय होता. कारण मुंबईतल्या भीतीदायकरीत्या पसरलेल्या ‘मेमरी किलर’ व्हायरसचा संसर्ग त्या रात्रीच झाला होता. सर्कसमधला हत्ती गेट- वे ऑफ इंडियातून समुद्रात उतरला होता. सुदर्शनचं म्हणणं असं की, त्यानं एका हत्तीला समुद्रात उतरताना पाहिलं आणि त्यानं त्याच्या आठवणींच्या हत्तीलाही समुद्रात टाकलं. पोलिसांना केस उलगडत नाही. पण सगळं तिथंच थांबतं. कारण ‘अरेस्ट सुदर्शन’ असा हुकूम निघतो आणि मुंबई शहराची संपूर्ण मेमरी जाते. आता फक्त जगणारा क्षण जिवंत. मागचं काहीच नाही. मॅथ्स टीचर मुलाला रोज सर्कस दाखवायला घेऊन जाते. रोज नव्यानं ती विदुषकाला भेटते. विदूषक रोज तिच्या मुलाला हसवतो. तिला त्याच्याशी प्रेम होतं. सुदर्शनला ‘सा’ला पाहून आता प्रसन्न वाटतं. रोज सुदर्शन कोर्टात येतो, पण केस पुढे जात नाही. मुंबईतलं जीवन मात्र रोज नव्यानं नवीन असतं.

नाटक लिहिताना मी दोन सूत्रधार वापरले. एक सूत्रधार कोर्टाच्या वर बसणारा कावळा. (वरून आढावा घेणारा. वर्षांनुवषर्ं सडत पडलेल्या केसेसना शिवणारा!) दुसरा सूत्रधार सर्कसच्या तंबूवर बसलेला- सर्कसच्या प्राणघातक खेळांचा आढावा घेणारा कावळा. दोन कावळे सूत्रधार. दोघे दोन दृश्य सांगतात. एक सुदर्शनचं, दुसरं मॅथ्स टीचरचं. मग दोन्ही दृश्यं एका रात्रीत भेटतात आणि एक मोठा अपघात.. ज्यात मुंबईची स्मरणशक्ती जाते.

लंडनहून मुंबईच्या परतीच्या प्रवासात विमानात नाटक लिहून पूर्ण झालं. लगेच पृथ्वी थिएटरला गेलो. आमचे गुरुजी पंडित सत्यदेव दुबेजी कॅफेमध्ये होते. मी त्यांना नवीन नाटक ऐकवलं. ते म्हणाले, हे नाटक खूपच वेडं आहे. याचं दिग्दर्शन मी करणार. आणि मला सुखद, पण धक्काच बसला. कारण मला हे नाटक स्वत:  डिरेक्ट करायचं होतं. मग आम्ही ठरवलं की, आपण दोघं मिळून हे नाटक बसवू या. मग तालमीचे नियम ठरवले.. अर्धी तालीम ते घेणार, मग मी. आणि त्यांनी डिरेक्ट केलेला सीन मी पाहणारसुद्धा नाही. त्याच्या पुढचा सीन मी करणार आणि दुसऱ्या दिवशी तेसुद्धा मी बसवलेला सीन पाहणार नाहीत. मला आधी या नियमांची गंमत वाटली. पण आम्हा दोघांच्या तालमीची पद्धत वेगळी; त्यामुळे माझी थोडी पंचाईत झाली. दुबेजी तालमीत शिस्तप्रिय आणि कडक मास्तर. त्यांच्या तालमीनंतर

मी पोहोचायचो तर नट-नटींच्या डोळ्यांत

पाणी. कारण मास्तरांनी त्यांना नुसत्या आत्मविश्वासाने अभिनय येत नाही, त्यासाठी वाणी शुद्धच पाहिजे, वगैरे वगैरे सांगितलेलं असे. मग मी नटांची समजूत घालायचो आणि दुबेजींची पद्धत या नाटकातच नाही, तर पुढे जीवनभर कशी उपयोगी आहे, हे त्यांना सांगायचो.

मानव कौल- सुदर्शन, काश्मीरा शाह-‘सा’, रुबी भाटिया- मॅथ्स टीचर, राजेश सिंग- विदूषक आणि जितू शास्त्री व अनुपम श्याम हे कावळे बनले. विनीत शर्मा- विवेक शर्मा हे जुळे भाऊ समाजाचे प्रिय-अप्रिय सूचक. सर्कसचा सूचक म्हणून विजय हा बुटका होता. आणि दहा जणांचा कोरस.

एकूण नाटकासाठी भन्नाट कलाकार मंडळी एकत्र झाली. मानव कौल आता नावाजलेला लेखक-दिग्दर्शक-नट आहे; पण तेव्हा खूपच विश्वसनीय नट होता. सांगितलेलं करायचा. काश्मीराने माझ्याबरोबर आधी दोन नाटकं केली होती. रुबी भाटीया ही अप्रतिम व्ही.जे. होती आणि खूपच हुशार, बुद्धीने तल्लख. तिच्यासाठी नाटक हे माध्यम नवीन, त्यामुळे मला खूप ऊर्जा मिळाली. राजेश सिंग हा दुबेजींचा भरवशाचा अभिनेता. शिस्तप्रिय आणि प्रेमळ.

नितीन चंद्रकांत देसाई ह्य प्रख्यात कलादिग्दर्शकाला (मत्रीच्या हक्कानं) सांगितलं की मला मुंबई लोकल ट्रेनचा एक डबा हवाय आणि तोसुद्धा रंगमंचावर चक्कर मारून विंगेत जाणारा, मुंबई शहर सूचकपणे दाखविण्यासाठी तो लोकलचा डबा पुरेसा होता. नितीनने, नितीन कुलकर्णीकडे हे काम दिलं आणि त्यानी युक्तीनं तो डबा बनवला, कापडाचा. त्यामुळे तो घडी करून ट्रंकमध्ये ठेवता यायचा. त्या डब्यात कोरसची माणसं पॅसेंजर, ड्रायव्हर आणि डबा फिरवणारीसुद्धा!! आजही नाटक आठवलं की तो डबा आठवतो.

दुबेजींकडून मला दोन गोष्टी शिकायला मिळाल्या. एक म्हणजे कोरसचा शिस्तबद्ध वापर आणि दुसरी म्हणजे मुख्य पात्रांची एन्ट्री-एक्झिट आणि त्याचा वेग.

‘अरेस्ट सुदर्शन’ हे नाटक म्हणून अपयशी ठरलं, पण जीवनभरासाठी एक न विसरणारी आठवण झालं.

जय दुबेजी ! जय नितीन !

जय मानव ! जय रुबी !

mvd248@gmail.com