13 August 2020

News Flash

सांगतो ऐका : आई तेंडुलकर एक भन्नाट माणूस

प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध अशा पाच तेंडुलकरांची व्यक्तिचित्रे त्या लेखात रेखाटण्याचा माझा विचार होता.

आई गणपत तेंडुलकर (१९०४-१९७५) हे एखाद्या कथा-कादंबरीत फिट्ट बसावं असं अतिशय चित्ताकर्षक आणि तितकंच गुंतागुंतीचं व्यक्तिमत्त्व होतं.

मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com

हा लेख Tendulkar Quintet (तेंडुलकर पंचक) वर लिहावा असं मला पहिल्यांदा वाटलं होतं. (‘क्विंटेट’ म्हणजे पाच जणांचा समूह.. जवळजवळ नेहमीच संगीतवादकांचा!) प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध अशा पाच तेंडुलकरांची व्यक्तिचित्रे त्या लेखात रेखाटण्याचा माझा विचार होता. त्या व्यक्ती म्हणजे : सचिन रमेश, विजय धोंडोपंत, सुरेश धोंडोपंत (विजय आणि सुरेश हे दोघे सख्खे भाऊ!), दीनानाथ गोपाळ आणि आई गणपत. पण तो विचार मी बदलला. कारण माझ्या हे लक्षात आलं की सचिनबद्दल माझ्याकडे नवीन सांगण्यासारखं काहीच नाहीये. विजय तेंडुलकरांवर एक स्वतंत्र लेख लिहावा लागला असता. हार्वर्डमधून डॉक्टरेट मिळवलेले आणि ‘दारिद्य्ररेषा’ या अर्थशास्त्रातील संकल्पनेसाठी प्रसिद्धी पावलेले अर्थशास्त्रज्ञ सुरेश तेंडुलकर आणि महात्मा गांधी यांचं आठ खंडी चरित्र लिहिणारे दीनानाथ गोपाळ तथा डी. जी. तेंडुलकर यांच्याविषयी वाचकांना फारसं कुतूहल असेल असं मला वाटलं नाही. म्हणून मग मी शेवटी ‘आई तेंडुलकर’ या पाचव्या तेंडुलकरांवर लिहिण्याचा निर्णय घेतला. याचं कारण म्हणजे या पाचांपैकी अतिशय चित्ताकर्षक आणि जवळजवळ पूर्णपणे अप्रसिद्ध असं हे व्यक्तिमत्त्व आहे. आणि त्यांची माहिती करून घेणं वाचकांना निश्चितच आवडेल.

सर्वात आधी त्यांच्या संपूर्ण हटके अशा ‘आई’ या नावाबद्दल! (हे नाव त्यांनी स्वत:च ठेवून घेतलं असावं असा माझा समज आहे.) प्रथमदर्शनी हे नाव खूपच विचित्र वाटतं. म्हणजे एखाद्या मराठी मुलीचं नाव ‘बाप’ असावं, इतकं विचित्र. पण ‘आई’ (Ayi) या शब्दाचा लॅटिन भाषेतला अर्थ ‘शहाणीव असलेला पक्षी’ असा आहे. आता मी या लेखनासाठी निवडलेला हा पक्षी किती शहाणीव असलेला होता, हे शेवटी तुम्हीच ठरवा.

आई गणपत तेंडुलकर (१९०४-१९७५) हे एखाद्या कथा-कादंबरीत फिट्ट बसावं असं  अतिशय चित्ताकर्षक आणि तितकंच गुंतागुंतीचं व्यक्तिमत्त्व होतं. जगातल्या कुठल्या लेखकानं अशा पात्राची निर्मिती केली असती, असा एक विचार माझ्या मनात आला आणि संभाव्य लेखक म्हणून शेक्सपियर, गटे किंवा टॉलस्टॉय ही नावं समोर आली. अतिशय संक्षिप्त आणि पुढे दिलेल्या त्यांच्या बायोडेटावर एक नजर टाकली तरी मी काय म्हणतोय याची कल्पना तुम्हाला नक्कीच येईल.

जन्म पोर्तुगीज राजवटीतील गोव्यामध्ये. एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात. लहानपणीच पितृछत्र हरपलं. शिक्षण भारत, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी इथे. एकूण शैक्षणिक कारकीर्द नेत्रदीपक. इंग्लिश, फ्रेंच आणि जर्मन या भाषांसह सहा भाषांवर प्रभुत्व. जर्मनी आणि भारतात एक यशस्वी पत्रकार/ संपादक म्हणून कार्य. फ्रँक सिनात्रासारखी चार लग्ने झाली. गांधीजी आणि सरदार पटेल यांचा निकटचा सहवास लाभला. पंडित नेहरूंशी जानपहेचान आणि हॉलीवूड स्टार ग्रेगरी पेकशी नातं. हिटलरची जर्मनी आणि गांधीजींचा भारत त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला. पाश्चिमात्य संस्कृतीने प्रभावित आणि कल बराचसा चंगळवादाकडे. तरीही मनाने प्रखर राष्ट्रभक्त आणि गांधीवादी. त्यांच्या कृती या नेहमीच विचारांपेक्षा भावनेने प्रेरित असायच्या. आणि बहुतेक वेळा त्या योग्यच असायच्या. याचे मुख्य कारण.. हिज हार्ट वॉज ऑलवेज इन द राइट प्लेस. १९७५ साली बेळगाव इथे निधन.

तेंडुलकरांचं सुरुवातीचं शिक्षण गोव्यातच झालं. पण वय कमी पडल्यामुळे ते शालान्त परीक्षा देऊ शकले नाहीत. ते मग अहमदाबाद इथे गेले आणि टिळक विद्यापीठात नाव दाखल केलं आणि परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. (इथेच ते सत्याग्रही चळवळीत ओढले गेले. साबरमती आश्रमात दाखल झाले आणि गांधीजींच्या प्रभावाखाली आले. काही काळ सरदार पटेलांचे खाजगी सचिव म्हणूनही त्यांनी काम केलं.) इथेच त्यांची भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील काही महत्त्वाच्या नेत्यांशी ओळख झाली.

१९२० साली टोपीवाला शिष्यवृत्ती मिळवून ते उच्च शिक्षणासाठी ग्रेट ब्रिटनला रवाना झाले. पण ब्रिटिश विद्यापीठात त्यांना मनासारखे हवे ते विषय निवडता न आल्यामुळे त्यांनी आपला मोहोरा फ्रान्सकडे वळवला. पॅरिस येथील Ecole Normale Superieure या प्रतिष्ठित विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर ते जर्मनीला गेले. तिथे त्यांनी Gottingen विद्यापीठात ‘अप्लाइड मॅथेमॅटिक्स’ या विषयाचा अभ्यास केला. आणि शेवटी बर्लिन विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीयरिंगमध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळवली.

पॅरिसमध्ये शिकत असताना तेंडुलकर साशा पासिनी नावाच्या एका सुंदर इटालियन तरुणीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी त्यांनी लग्न केलं. साशा एक कलाकार व लेखिका होती. तिचं आधी एक लग्न झालेलं होतं. मात्र त्यांचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. साशाला व्हेरॉनिक नावाची पहिल्या लग्नापासूनची मुलगी होती. तिने अभिनेता ग्रेगरी पेकबरोबर लग्न केलं होतं. म्हणजे ‘रोमन हॉलिडे’चा हीरो हा एका अर्थाने त्यांचा जावई लागत होता. व्हेरॉनिक आणि ग्रेगरी या दोघांनाही हे मराठी सासरेबुवा खूप आवडत असत आणि शेवटपर्यंत ते त्यांना विसरले नाहीत. तेंडुलकरांचं दुसरं लग्न झालं ते Gottingen विद्यापीठातील त्यांच्या प्रोफेसरच्या मुलीशी. त्यांचं हे दुसरं लग्नदेखील फार काळ टिकलं नाही.

आणि आता त्यांच्या तिसऱ्या लग्नाची थोडक्यात हकिकत.. जर्मनीत असताना तेंडुलकर त्या देशातील डाव्या विचारसरणीच्या एका महत्त्वाच्या वृत्तपत्रात भारतीय स्वातंत्र्यलढय़ावर लेख लिहीत होते. शिष्यवृत्तीचा पैसा अपुरा पडत होता म्हणून ते हे काम करत होते. थिआ नावाची एक जर्मन महिला त्यांचे हे लेख नियमितपणे वाचत असे. थिआ.. पूर्ण नाव- थिआ व्हॉन हरबाऊ (Thea Von Herbou (१८८८-१९५४) ही कोणी साधारण महिला नव्हती, तर ती- (१) एका कुलीन जर्मन खानदानाची वंशज होती. (२) फ्रित्झ लँग (Fritz Lang) या जगप्रसिद्ध जर्मन सिने-दिग्दर्शकाची ती पत्नी होती. (३) आणि ती स्वत: पटकथालेखक, कादंबरीकार, दिग्दर्शक आणि अभिनेत्रीही होती. (४) ती पक्की भारतप्रेमी (Indophile) होती. आणि (५) नाझी समर्थक असूनदेखील जर्मनीत अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी ती अथक प्रयत्न करत होती.

लवकरच थिआ आणि आई हे एकमेकांना भेटले आणि परस्परांच्या प्रेमात पडले. (महदाश्चर्य म्हणजे थिआ या आईपेक्षा तब्बल १७ वर्षांनी मोठय़ा होत्या.) आपल्या पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी आपल्या या लेखाच्या हीरोबरोबर १९३३ साली विवाह केला. (हे सर्व अर्थातच गुप्तपणे झालं. कारण नाझी राजवटीत असला विवाह होणं केवळ अशक्य होतं.) दुसरं महायुद्ध पेटल्यानंतर तेंडुलकरांना जर्मनी सोडून भारतात परत यावं लागलं.

आयुष्याच्या संध्याकाळी थिआ तीन व्यक्तींच्या फोटोंवर हात फिरवत जुन्या आठवणींत बुडून जात असे. हे फोटो होते- हिटलर, गांधी आणि आई तेंडुलकर यांचे. जगाच्या इतिहासात अशा या विचित्र त्रयीवर प्रेम करणारी थिआ ही एकच व्यक्ती होती यात शंका नाही.

लागोपाठ तीनदा ‘Till death do us part’ म्हणून झाल्यानंतर अखेर चौथ्यांदा तेंडुलकरांचं ‘शुभ मंगल सावधान’ झालं! तेंडुलकर भारतात परत आल्यानंतर त्यांनी बेळगावमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. लवकरच त्यांनी एक राष्ट्रवादी वर्तमानपत्र चालू केलं आणि सिमेंटचा कारखाना उभारण्याची योजना आखली. पण हा प्रकल्प अयशस्वी ठरला. त्याच सुमारास ते आपल्याहून वयाने खूप लहान असलेल्या इंदुमती गुणाजी नावाच्या मराठी ध्येयवादी मुलीच्या प्रेमात पडले. इंदुमती काँग्रेस पार्टीची कार्यकर्ती होती आणि गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात तिने काम केलं होतं. लग्न करण्यावर दोघंही ठाम होते. पण या लग्नाला इंदुमतीच्या वडिलांचा विरोध होता. आणि ते साहजिकच होतं. कुठल्या गांधीवादी पित्याला विशीतल्या आपल्या मुलीने तीन लग्नं झालेल्या, जरा जास्तच आंग्लाळलेल्या, सतत सिगारेट ओढणाऱ्या, मद्यपान करणाऱ्या आणि बेळगावच्या गल्ल्यांमधून आपल्या लाल मर्सिडिजमधून मिरवणाऱ्या माणसाशी लग्न केलेलं आवडलं असतं?

इंदुमतीच्या वडिलांची गांधीजींशी चांगली ओळख होती. त्यांनी गांधीजींना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. गांधीजींनी तीन अटींवर या लग्नाला मान्यता देण्याचं आणि जोडप्याला आशीर्वाद देण्याचं कबूल केलं. त्या अटी अशा : (१) तेंडुलकरांनी थिआकडून एक प्रकारचं ‘नो ऑब्जेक्शन’ प्रमाणपत्र आणावं. (ते त्यांनी मिळवलं.) (२) या जोडप्यानं पाच र्वष वेगळं राहावं. (दोघंही स्वातंत्र्य संग्रामात होते. आणि ब्रिटिशविरोधी कारवायांसाठी दोघांनाही तुरुंगवास भोगावा लागल्यामुळे ही अट सहज साध्य झाली.) आणि (३) भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत या जोडप्यानं मूल होऊ देता कामा नये. सुदैवाने १९४७ साली ब्रिटिशांनी भारत सोडला आणि या दाम्पत्याला दोन मुलं- एक मुलगा आणि एक मुलगी- झाली.

१९५३ साली तेंडुलकरांच्या आग्रहावरून इंदुमती त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाला घेऊन बर्लिनला गेली आणि थिआबरोबर तिने दोनएक महिने घालवले. त्या दोघींचं मस्त जमलं आणि त्यांनी अत्यंत आनंदाने तो काळ घालवला.

तेंडुलकर दाम्पत्याचं सहजीवन सुखी होतं का? कोणास ठाऊक! पण एक गोष्ट नक्की.. त्या दोघांनीही शेवटपर्यंत एकमेकांना साथ दिली. आणि आपल्या लेखाच्या हीरोचं याबाबतीतलं ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता ही एक फार मोठी गोष्ट होती.

जाता जाता दोन विचार.. आई तेंडुलकर नावाच्या या ‘शहाणीव असलेल्या पक्ष्याची’ जीवनातील भरारी पाहून मला जुनी गायिका खुर्शीदच्या १९४२ सालच्या ‘पंछी बावरा, चांद से प्रीत लगाये’ या सिनेगीताची आठवण होते. दुसरा.. बऱ्याच वेळा मी माझा जुना मित्र सोपानचा माझ्या ‘सांगतो ऐका’ कॉलमसाठी ‘साऊंडिंग बोर्ड’सारखा उपयोग करतो. हा लेख वाचून सोपान मला म्हणाला, ‘‘आई तेंडुलकरसारख्या इतक्या निगेटिव्ह कॅरेक्टरवर एक पूर्ण कॉलम तू का फुकट घालवतोस?’’ मी त्याला म्हटलं, ‘‘अरे, तेंडुलकर हा माणूस अतिशय प्रेमळ असून, एक गांधीवादी कार्यकर्ता पण होता.’’ यावर सोपान म्हणाला, ‘‘त्याने एक नाही, दोन नाही, चार लग्नं केली. सामाजिक शिष्टाचाराची त्याला फार पर्वा होती असं वाटत नाही. आणि कोणी कित्ता गिरवावा असं काही त्याचं व्यक्तिमत्त्व नव्हतं. He was a seriously flawed human being.’’ वादविवाद संपवण्याच्या उद्देशाने मी शेवटी सॉमरसेट मॉमचं ‘I Don’t envy God on the Day of Judgement’ हे प्रसिद्ध वाक्य त्याच्या तोंडावर फेकून त्याला म्हटलं, ‘‘अरे, आपण काय देव आहोत का?’’

पण सोपानला काही हे पटलं नाही. फार क्वचित त्याला माझं काही पटतं.

शब्दांकन : आनंद थत्ते

(ज्या वाचकांना या चरित्रनायकाबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी दोन पुस्तकं : १) ‘इन द श्ॉडो ऑफ फ्रीडम- थ्री लाइव्हज् इन हिटलर्स बर्लिन अ‍ॅण्ड गांधीज् इंडिया’, लेखक- लक्ष्मी तेंडुलकर धौल, प्रकाशक- झुबान पब्लिशर्स, नवी दिल्ली. २) या पुस्तकाचं मराठी भाषांतर.. ‘दोन देश, तीन कथा- डॉ. आई तेंडुलकर’, प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे. या पुस्तकात लक्ष्मी तेंडुलकर यांनी आपल्या वडिलांचं बहुरंगी आणि काल्पनिक वाटावं असं जीवन ऐतिहासिक सत्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता अत्यंत समर्थपणे रेखाटलेलं आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 12:08 am

Web Title: tendulkar quintet ayi tendulkar sangato aika dd70
Next Stories
1 अफसाना लिख रही हूँ.. : ‘तेरी बिंदिया रे..’
2 खेळ मांडला.. : लिव्हरपूलची जर्मन ‘संस्कृती’
3 अस्तित्व आणि पुरोगामित्व…
Just Now!
X