सौमित्र kiishorkadam@gmail.com

धर्मराज पाटील..तरुण वन्यजीव संशोधक, नदी संवर्धन आणि पक्ष्यांविषयी तळमळीने काम करणारा वन्यप्रेमी आणि कवी. गुलज़ार हे त्याचे दैवत. त्यांची आपली भेट व्हावी म्हणून तो आस लावून बसला होता. पण.. त्याच्या शेवटच्या श्वासांबद्दल..

आता मी हे लिहितो आहे, पण हे प्रसिद्ध करेपर्यंत मी असेन का?

प्रसिद्ध झालं हे तुमच्या वाचनात येईपर्यंत तरी मी असेन का?

आपण कधीही जाऊ शकतो या शक्यतेसोबत आता आपण सगळेच जगत नसतो का?

मृत्यू यावा तर मांजराच्या पावलांनी

कळूही नये कधी उडून गेला आपल्यातला

हंस अकेला..

गुलज़ारसाहेबांची एक नज्म आहे..

‘मिटा दो सारे निशाँ कि थे तुम

उठो तो ऐसे कि कोई पत्ता हिले, न जागे

लिबाज़ का एक-एक तागा उतार कर यूँ उठो

कि आहट से छॅं न जाओ

अभी यहीं थे

अभी नहीं हो

खयाल रखना कि ज़िन्दगी की कोई भी सिलवट

न मौत के पाक साफ चेहरे के साथ जाए’

धर्मराज..

धर्मराज पाटील. वय वर्ष अवघं चाळीस.

मी याला ओळखत नव्हतो़ . जो गेल्या एक मार्चलाच निघून गेलाय या जगातून.

तो रानावनात फिरायचा.. पक्ष्यांशी बोलायचा.. एक नामवंत पक्षीतज्ज्ञ होता तो.. त्याची या विषयात पीएच. डी. होती. उद्या- म्हणजे २१ मार्चला त्याचा वाढदिवस. आणि २१ मार्च म्हणजे ‘वन दिन’.. फॉरेस्ट डे.

त्याच्याबद्दल वाचून आणि ऐकून पु. शि. रेग्यांची कविताच आठवते..

‘पक्षी जे झाडावर गाणे गातो

आहे झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात

झाडावर गाणे जे पक्षी गातो

आहे पक्षी दुसरा गाण्यातच त्या पुन्हा..’

असेल.. तो कुठल्या तरी झाडाच्या कुठल्या तरी फांदीवर बसून कुठल्या तरी पक्ष्याशी गप्पा मारत बसला असेल. म्हणूनच..

‘मेनी हॅपी रिटर्न्‍स ऑफ द डे धर्मराज. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.’

दिनांक २३ फेब्रुवारी रात्री पावणेदहा.

मला अमित भंडारी या माझ्या जिवलग मित्राचा एक मेसेज येतो. त्यात फक्त एक व्हॉइस क्लिप असते. आवाज एका मुलीचा असतो. खूप असहाय आणि रडवेला.

‘ हाय अमित.. मी तुला माझ्या फ्रेंडविषयी सांगितलं होतं ना.. जो गुलज़ारांचा एकदम फॅन आहे आणि खूप छान पोएट्री लिहितो.. तो फ्रायडेला त्याच्या घरात बेशुद्ध सापडला. ही हॅड ब्रेन हॅमरेज. चौदा तास तो तसाच पडून होता. अनमॅरीड आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं तर तो फ्रायडेपासून कोमात गेल्याचं सांगितलं. आम्ही सगळे ट्राय करतोय- की तो कोमातून बाहेर यायला पाहिजे. तर माझी एक अशी रिक्वेस्ट होती, की तो जस्ट महिनाभरापूर्वी भेटला होता आणि म्हणाला होता की, मी खूप वर्ष गुलजारांना भेटायचा प्रयत्न करतोय, पण जमलं नाही. पण आता आयुष्यात एकदा तरी त्यांना भेटायलाच पाहिजे असं डेस्परेटली वाटतं आहे. तर मी त्याला म्हटलं, आपण ट्राय करू कसं पण. गुलजारांना भेटणं त्याचं एकदम काय म्हणतात ते लाइफ अ‍ॅम्बिशन होतं. तर माझी अशी रिक्वेस्ट होती की, तो कोमातून बाहेर येण्यासाठी कॅन गुलज़ारजी सेंड हिम वन व्हॉइस मेसेज अड्रेसिंग धर्मराज.. जो त्याला रीपिटेडली ऐकवला तर कदाचित काहीतरी फायदा होईल. तो कोमातून बाहेर येईल आणि त्याची लाइफ.. हे होऊ शकेल? कॅन यू हेल्प प्लीज?’

एका अनोळखी माणसासाठी किशोरला कसं सांगायचं,

हा कॉम्प्लेक्स घेऊनच अमितने नुस्ती ती व्हॉइस क्लिप पाठवली असावी.

 मी ऐकून सुन्न होतो. रात्रीचे पावणेदहा वाजलेले असतात.

‘गोंधळ’ नावाच्या चित्रपटाच्या शूटला मी राजगुरूनगरमधल्या ‘व्हिट्स कामत’ या हायवेलगतच्या हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरल्या ३०१ नंबरच्या रूममध्ये असतो.. 

ते वाचून काय वाटलं, अजून कळत नाही. कदाचित कोमात गेलेल्या माणसालाही असंच होत असेल.

मी खूप वेळ नुस्ता हायवेवरलं ट्रॅफिक पाहत खिडकीशी उभा राहतो.. काळ सेकंदांचा आवाज करत प्रत्यक्ष जाताना जाणवत राहतो.. मला गुलज़ारसाहेबांच्याच ओळी अचानक आठवू लागतात..

‘वक्म्त को आते ना जाते ना गुजरते देखा

ना उतरते हुए देखा कभी इलहाम की सूरत

जमा होते हुए एक जगह मगर देखा है..’

शेवटी न राहवून मी गुलज़ारसाहेबांना फोन लावतोच. रिंग वाजत राहते. त्यांनी फोन उचलावा.. प्रत्येक रिंगनंतर ‘आता उचलावा.. आता उचलावा.. उचलावा..’ असं मनोमन म्हणत राहतो. पण खूप वेळ रिंग वाजून थांबते. झोपले असतील कदाचित. कारण ते दहालाच झोपतात हे मला माहीत असतं.

मी पुन्हा ट्रॅफिक पाहत राहतो. त्यांना मेसेज करावा असं वाटतं.. पण मेसेजमध्ये या घटनेचं गांभीर्य- वा मला जे होतंय ते कळेल का त्यांना.. म्हणून मेसेज करत नाही. आणि इतक्या रात्री गुलज़ारसाहेबांना परत फोन करून उठवावं.. मन धजत नाही.

मी त्या धर्मराजला ओळखत नसतो. पण तो कोमात आहे.. अजूनही जगू शकतो. फक्त गुलज़ारसाहेबांचा आवाज.. पण.. मी असहाय होतो.. खिडकीशी उभा राहून नुस्ते ट्रॅफिकचे दिवे इकडून तिकडे, तिकडून इकडे पळताना पाहत राहतो.. पाय दुखू लागतात.. मोबाइल पाहतो तर रात्रीचे बारा वाजलेले असतात.. मग बेशुद्ध होण्यासाठी मी खूप पितो.. सकाळी सातचा कॉल टाइम असतो. हायवेवर सैरावैरा पळणारे दिवे पाहत कधी कोमात जातो कळत नाही.

पहाटे कधीतरी झोप उचटते. पाच वाजलेले असतात. उठून झटपट आंघोळ करून गाडीची वाट पाहतो. गाडी सात वाजता येणार असते आणि आता पावणेसहा वाजलेले असतात. मी पुन्हा तो व्हॉइस मेसेज ऐकतो. पुन्हा ट्रॅफिक पाहत राहतो. पुन्हा पापण्या जड होतात. मी पुन्हा बिछान्यावर कोलमडतो.

आठला अचानक जाग येते. खडबडून जागा होतो. एवढय़ा सकाळी करावा का फोन गुलज़ारसाहेबांना? मन धजावत नाही.

साडेआठला गाडी येते. मी त्यात बसतो. लोकेशन वळद नावाचं सत्तेचाळीस कि. मी. लांबचं गाव असतं. मी गाडीत बसतो. पुन्हा डोळे मिटतात. गाढ झोप लागते.

‘‘सर, लोकेशन आलं..’’ माझा हेल्पर बॉय जयराम सांगतो. मी उठतो. कुठे आलोय कळत नाही. मग क्षण- दोन क्षणांत मेंदू भानावर येऊन मी उतरतो. माझे डोळे लाल असतात. माझ्याकडे सगळे कसंनुसं बघतात. मी नजर खाली करून मेकअप रूमच्या दिशेने जातो.

यंत्रवत कॉस्च्युम, मेकअप, कॉफी सगळं होत राहतं. कधी दहा वाजतायत याची मी मनोमन वाट पाहत असतो. तितक्यात असिस्टंट येऊन मला सीन सांगतो. सीन विनोदी ढंगाचा असतो. (इतक्या गंभीर मन:स्थितीतून रात्रभर गेल्यानंतरही हे असं.. असंच फिल्मी वाटणारं घडत असतं कितीकदा आपल्या आयुष्यात. पण तेच पडद्यावर पाहून आपण हसतो.) मी नुसता ऐकून घेतो. दहा कधी वाजतात याची मी वाट पाहत राहतो.

दहा वाजायला दोन-तीन मिनिटं असताना मी चालू सीन थांबवतो आणि सगळ्यांना काय झालंय आणि मला आता काय करावं लागेल, ते सांगतो. अख्खं युनिट गंभीर होतं. मी गुलज़ारसाहेबांना फोन लावतो. ते उचलतील की नाही? सकाळच्या मीटिंगमध्ये असतील तर..? या संभ्रमात असतानाच चार रिंगनंतर ते फोन उचलतात. मी त्यांना रात्री फोन केल्याचं सांगतो.. ‘तुम्ही रात्रीच का उचलला नाहीत फोन?’ हे न बोलता बोलण्याच्या सुरात सांगू पाहतो. मग मी ती व्हॉइस क्लिप, तो मुलगा, तो कोमा.. हे सगळं सांगतो. ते शांतपणे ऐकून घेतात. माझं संपतं. मधे काही क्षण फक्त आमचे श्वासोच्छ्वास ऐकू येत राहतात.

मग ते म्हणतात, ‘‘ठीक हैं, चलो करते हैं.. पर एक काम करो.. उस लडम्के के आसपास कोई जो होगा उसका नंबर मुझे दे दो. मैं उससे बात कर के उस लडम्के.. क्या नाम उसका.. धर्मराज के कान पर फोन ले जाने को कहता हूँ और बात करता हूँ.. उसके जितना करीब पोहोंच पाऊँ उतना अच्छा है ना बेटा?’’

‘‘पर सर.. मैं शूट कर रहा हूँ.. मैं उस लडकी का नंबर आपको देता हूँ और आपका नंबर उसको शेअर करता हूँ.. आप प्लीज कोऑर्डिनेट कर लीजिये. प्लीज मैं शायद फिर फोन पर नहीं आ सकूँ..’’

‘‘अच्छा! तुम बम्बई में नहीं हो? कहाँ हो?’’

‘‘यहाँ राजगुरूनगर में सर.’’

‘‘ये कहाँ पडता है?’’

‘‘पुणे के पास सर.’’

‘‘तो हिमाचल में तो नहीं हो ना?’’

‘‘हाँ सर, पर यहाँ नेटवर्क का बहोत प्रॉब्लेम है सर.’’

ते पॉज घेतात. मग म्हणतात, ‘‘अच्छा, चलो ठीक है. मुझे भेजो उस लडकी का नंबर और मेरा उसको देना. क्या नाम उसका..?’’

‘‘रूपाली सर.. वो पुलिस सुप्रिटेंडन्ट ऑफ ठाणे है सर.’’

‘‘अच्छा..? ओके. उसको कहो- कोई अच्छा रेकॉर्डिगवाला फोन उस हॉस्पिटल में अरेंज करें और मुझे फोन करें. मैं रेडी रहेता हूँ इधर.’’

‘‘ओके सर..’’ असं बोलून मी फोन कट करतो. अमितला फोन लावतो. त्याचा फोन एंगेज येतो. सतत एंगेजच येत राहतो.

सगळं युनिट सीन अर्धवट ठेवून माझ्यासमोर उभं असल्याचा प्रचंड गिल्ट येऊन मी वैतागून फोन ठेवून सीन सुरू करणार इतक्यात अमितचा फोन येतो. तो रूपालीशीच बोलत असल्याचं सांगतो. मी त्याला गुलज़ारसाहेबांचा नंबर देतो. रूपालीचा नंबर मला पाठवायला सांगतो. बाकी कोऑर्डिनेट करून घ्या.. मी सीनमध्ये असल्याचं सांगतो. फोन ठेवतो. सीन सुरू होतो. पण सीन करताना सतत ‘तिकडे काय झालं असेल’ची उत्सुकता.. की निराशा.. की हतबलता घेरून टाकते. फोन परत वाजतो. तो रूपालीचा असतो. मी तिला पुन्हा सगळं एक्सप्लेन करतो. ती तिच्याकडे आयफोन असल्यामुळे फोनवरून रेकॉर्डिगचं कळत नसल्याचं सांगते. आयफोनला कंटाळलेला मीही आयफोनला शिव्या घालत फोन ठेवतो. सीन सुरू होतो. तरी मी सीनमध्ये जितकं विनोदी राहता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न करतो. सकाळचं ऊन आता तापायला लागलेलं असतं. आम्ही भरउन्हात एका घराच्या अंगणात हा विनोदी सीन करत असतो. पण काय झालं असेल तिकडे.. काय.. काय.. कायकायकायकायच्या माश्या मस्तकातल्या पोळ्याभोवती घोंघावत राहतात..

पंधरा मिनिटांनी रूपालीकडून एक व्हॉइस क्लिप येते. त्या क्लिपखाली ‘धर्मराज रिसायटिंग हिज पोएम’ असं लिहिलेलं असतं. आता युनिटभर सगळी उत्सुकता उन्हासारखीच पसरलेली असते. सगळं युनिट जमा होतं. मी ती क्लिप ऑन करतो. येणारा आवाज धर्मराजचा असतो.. तो गुलज़ारांसाठी लिहिलेली कविता त्याच्या दणकट आवाजात म्हणत असतो..

‘काफी वक्त बीता गुलजाऱ

तुम्हारा इंतज़ार करते करते

शायद चंद सदीयाँ बीती हों

मैं वहीं बैठा हूँ उस मोडपर

जहाँ तुम्हारे छाँव की उँगली

पहली बार थामी थीं मैंने

सोचा के तुम आओगे कभी

खुद की छाँव कि तलाश में

जिस पेडम् के नीचे मैं बैठा रहा

उसकी सारीं पत्तीयाँ अब

सुखकर गिर चुकी हैं गुलज़ार

हजारों बारिशें आकर चली गई

लाखों मुसाफ़िर गुज़्‍ारे यहाँ से

फिर भी एक पत्ता नया न आया

इस पेड की शांख आज भी

उसी तरह काँप उठती है गुलजार

समझा बुझाकर सुला देता हूँ

आओ कुछ बातें कर लें

नज्म्म के छाले देखें दिखाँए

कब तक मैं अपनी छाँव

घूमता रहूँगा ऐसे

जगाओ मुझे यहाँ से

जहाँ इंतजार भी पिघलने को है

काफी वक्त बीता गुलजार..’

तो आवाज ज्याच्या गळ्यातून येतो तो तिकडे कोमात आहे, ही जाणीव प्रत्येक ओळीमागून सरपटत येते.

 तो कोमात आहे.. त्याला नक्की काय होत असेल?

तो फक्त जिवंत असेल, की त्याला जाणवत असतील आसपासच्या हालचाली?

त्याला फट्कन उठून बसावं असं वाटत असेल?

तसा प्रयत्न त्याचं मन करत असेल?

त्याचं शरीर काही केल्या हलत नसल्याचं जाणून त्याला काय वाटत असेल?

कोमातून जागे होऊन पुन्हा नॉर्मल आयुष्य जगणाऱ्यांच्या गोष्टी त्याला आठवत असतील?

स्वत:च्या डाव्या, उजव्या हाताचं कुठलं तरी एक बोट हलवून पाहावं म्हणून तो सगळं भान त्या बोटापर्यंत नेत असेल?

ते भान तिथपर्यंत पोहोचत असेल?

पंधरा मिनिटांनी रूपालीचा गुलजारसाहेबांची क्लिप रेकॉर्ड झाल्याचा मेसेज येतो. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये धर्मराजजवळ असलेल्या त्याच्या सुगंधा नावाच्या मैत्रिणीने गुलजारसाहेबांशी बोलून.. तिचा फोन धर्मराजच्या कानाशी नेऊन तो त्याला ऐकवत असतानाच ती क्लिप रेकॉर्ड झाल्याचं सांगते.

आणि फोन धर्मराजच्या कानाशी असतानाच त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळल्याचं.. त्याने एक दीर्घ श्वास घेतल्याचं सांगते.

जवळजवळ अर्धा तास जातो आणि मला रूपालीकडून पुन्हा एक व्हॉइस क्लिप येते.

‘गुलजारजीज् एडिटेड क्लिप’ असं तिने त्याखाली लिहिलेलं असतं. मी सगळ्या युनिटला होल्ड करून व्हॉइस क्लिप ऑन करतो. अख्खं युनिट माझ्या फोनभोवती गोळा होतं. क्लिप सुरू होते. गुलज़ारसाहेब बोलत असतात..

‘‘धर्मराज! धर्मराज.. सुनो धर्मराज, मैंने सुना है.. तुम मुझसे मिलना चाहते थे. तुम्हे मेरी कविताएँ अच्छी लगती थी. तुम अच्छे हो जाओ जल्दीसे.. और अपने भाई के साथ आ जाओ मिलने.. मैं तुमसे कहता हूँ तुम्हारी पसंद का कोई भी गाना सुना दुँगा मैं.. जो तुम्हें पसंद था. धर्मराज.. आँखें खोलो धर्मराज और सुनो.. जब आओगे ना तो नई कविताएँ भी सुनाऊँगा.. बस जल्दीसे अच्छे हो जाओ धर्मराज.. मेरी आवाज़्‍ा सुन रहे हो ना धर्मराज..?’’

क्लिप संपते..

कडकडीत उन्हात माझ्यासकट अख्ख्या युनिटच्या अंगावर काटा आणि डोळ्यांत पाणी असतं.

धर्मराजने एकदाचा गुलजारजींचा आवाज ऐकला, या आनंदात आम्ही पुढला सीन शूट करून संपवतो.. दुपारी पुन्हा गुलज़ारजींचा फोन येतो. ते सगळं नीट झाल्याचं, व्हॉइस क्लिप झाल्याचं सांगतात आणि त्याची तब्बेत कशीये ते दर तासाभराने कळव- असा आदेश सोडून फोन ठेवून देतात.

दुपारी लंचच्या आसपास रूपालीचा आभाराचा फोन येतो. माझ्याशिवाय ते शक्य नव्हतं, असं ती म्हणते. मी फक्त निमित्तमात्र असल्याचं तिला सांगतो.

आपण सगळे निमित्तालाच जगत असतो असं वाटत राहतं.

पंचवीस तारखेला रूपालीचा सकाळी दहा अठ्ठावनला मेसेज येतो..

‘‘गुड मॉर्निग किशोरजी! टुडे गुलज़ारजी इन्क्वायर्ड अबाउट धर्मराजज् हेल्थ.. ही इज स्टिल इन आयसीयू.. फायटिंग फॉर लाइफ.. प्लीज प्रे फॉर हिम..’’

‘‘सर्टनली.. आय एम ऑलरेडी..’’ तिला रिप्लाय करतो.

मध्ये दिवस जात राहतात. सबकॉन्शस माइंडमध्ये धर्मराज गुलजारजींच्या आवाजाच्या लाटांवर तरंगताना दिसत राहतो.

१ मार्चच्या दुपारी साडेतीनला रूपालीचा मेसेज येतो..

‘वुई लॉस्ट हिम टुडे.. अवर बिल्व्हेड फ्रेंड धर्मराज पाटील पास्ड् अवे पीसफुली धिस आफ्टरनून ट्वेल्व्ह पीएम- ऑन मार्च टू थाउजंड ट्वेंटी टू.. अ‍ॅट दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल इन पुणे. हिज लास्ट राइट्स विल बी कंडक्टेड अ‍ॅट वैकुंठ क्रिमेटोरियम, नवी पेठ, पुणे.. अ‍ॅट फाइव्ह पीएम.. ऑल आर रीक्वेस्टेड टु बी प्रेझेंट फॉर द सेम.’

धर्मराज!

मृत्यूनंतर आयुष्य असतं की नाही, ठाऊक नाही. अजून तरी माणसांवर पक्षी बसत नाहीत.. ते झाडावरच बसतात. ज्या झाडांवर पक्षी बसतात, त्या झाडांना सेलिब्रेट करतात, त्या दिवशी तू जन्मलास हे काय कमी आहे!

धर्मराज! झाडांमध्ये, पक्ष्यांमध्ये राहिलेल्या कवितेच्या माणसा..

‘आनंद’मधली गुलज़ारसाहेबांची कविता त्यांच्या वतीने तुला सादर अर्पण..

‘मौत तू एक कविता है

मुझसे एक कविता का वादा है

मिलेगी मुझको

डूबती नब्ज़ो में जब दर्द को नींद आने लगे

ज़र्द सा चेहरा लिये जब

चांद उफक तक पहुँचे

दिन अभी पानी में हो

और रात किनारे के करीब

ना अभी रात, ना दिन

जिस्म जब ख़त्म हो

और रूह को जब साँस आए

मुझसे एक कविता का वादा है

मिलेगी मुझको..’