scorecardresearch

Premium

मातृभाषा ते राष्ट्रभाषा

‘नांदा सौख्यभरे’ची नांदी झाली आणि त्याच्या यशाने आम्ही साहजिकच मोहरून गेलो. आता तात्काळ नवीन नाटकाची गरज होती.

मातृभाषा ते राष्ट्रभाषा

‘नांदा सौख्यभरे’ची नांदी झाली आणि त्याच्या यशाने आम्ही साहजिकच मोहरून गेलो. आता तात्काळ नवीन नाटकाची गरज होती. कारण दिल्लीतल्या तमाम मराठी प्रेक्षकांचे ते नाटक पाहून झाले होते. नील सायमन या माझ्या आवडत्या नाटककाराचे ‘The Odd Couplel’ हे नाटक ब्रॉडवेवर गाजत होते. त्याचा सिनेमा पण झाला होता..
जॅक लेमन आणि वॉल्टर मॅथ्यू यांना घेऊन. सायमनच्या आणि माझ्या विनोदाची जातकुळी एक होती. या नाटकाचा विषयही माझ्या मते विश्वव्यापी होता. दोन जिवलग मित्र. टोकाचे स्वभाव. एक- अति चिकित्सक, टापटिपीचा, घरात नको तितकं लक्ष घालणारा. दुसरा- उनाड प्रवृत्तीचा, छाकटा, बेशिस्त, संसारात अजिबात रस न घेणारा. दोघांच्या बायका त्यांच्या स्वभावातील अतिरेकाला कंटाळून त्यांना सोडचिठ्ठी देतात. मग हे दोघे टाकलेले नवरे एकत्र राहण्याचे ठरवतात. पण गंमत म्हणजे त्यांच्या टोकाच्या स्वभावविशेषांमुळे त्यांचेही आपसात सतत खटके उडत राहतात. तेही विभक्त होण्याचा निर्णय घेतात.
हे नाटक मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमधून जवळजवळ एकाच वेळी आम्ही मंचावर आणले. ‘तुझी माझी जोडी जमली रे’ आणि ‘कैसी यह जोडी मिलाई मोरे राम.’ मराठी अवतारात विश्वास मेहेंदळे कर्तव्यकठोर मित्राचे काम करीत असे, तर उडाणटप्पू दोस्ताचे अरुण. हिंदी आवृत्तीमध्ये चमन बग्गा अरुणला साथ देत असे. नाटकात दोन उनाड मैना (जाहिरातपट‘तारका’) अधूनमधून अवतरतात आणि या दोन सडय़ाफटिंगांच्या कोरडय़ा आयुष्यात थोडी रंगत आणतात. मराठी नाटकात दया आणि मी तारका म्हणून ‘चमकत’ असू. तर हिंदीमध्ये माझ्या जोडीला सुधा चोपडा धमाल उडवून देई.
या जोडप्रयोगांची गंमत अशी, की मराठी प्रेक्षकांना नाटकाचा बाजच फारसा रुचला नाही. पती-पत्नीच्या पवित्र नात्याची टिंगल, त्यांचा बेबनाव, घटस्फोट, इ. गोष्टी विनोदाचा विषय होणे गैर आहे, असा एकूण सूर ऐकू यायचा. बाळ कोल्हटकर, मधुसूदन कालेलकर, वसंत जाधव यांच्या मेलोड्रामावर त्याकाळच्या मराठी प्रेक्षकांचा पिंड पोसला होता. त्यांना कौटुंबिक पाश्र्वभूमीवर व्रात्यपणा मंजूर नव्हता. याउलट, ‘कैसी यह जोडी’ला हिंदी-पंजाबी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. वनश्रीने वेढलेल्या ‘त्रिवेणी’च्या खुल्या प्रेक्षागृहात त्याचे प्रयोग बहारदार होत. खूप रंगत.
त्या काळात एक फार मजेचा.. वेगळाच प्रयोग केल्याचं स्मरतं. दिल्लीच्या वनिता समाजाच्या काही खास दिनानिमित्त विजय तेंडुलकरांच्या एकांकिकेचा एकच प्रयोग बसवल्याचं आठवतं. ‘चित्रगुप्त, अहो चित्रगुप्त!’ ही ती नाटिका. खटाराभर बायका मिळून कसल्याशा अधिवेशनाखातर अमेरिकेला निघाल्या आहेत. नाटक अपेक्षेप्रमाणे पुरुषी दृष्टिकोनातून लिहिलेले होते आणि नेहमीच्या ‘बायकी बाण्याची’ त्यात यथेच्छ टिंगल केलेली होती. हौशी वनितांचा दिल्लीत तोटा नव्हता. वेगवेगळ्या वयाच्या, आकाराच्या आणि प्रवृत्तीच्या चौदा-पंधरा बायका जमवून आम्ही तालमी सुरू केल्या. काकू (माझ्या सासूबाई) तेव्हा आमच्याकडे सुट्टीला आल्या होत्या. तेव्हा त्यांनाही मी नाटकात गोवले.
लोकसभेचे पहिले स्पीकर नानासाहेब कुंटे यांचा इंडिया गेटजवळच्या शाही परिसरात फार सुंदर बैठा बंगला होता. चारी बाजूंनी झाडांचा वेढा आणि सभोवताली दाट मखमली हिरवळ. तर त्या हिरवळीवर आम्ही ‘चित्रगुप्त’चा प्रयोग केला. सगळ्या बायका विमानतळावर उड्डाणपूर्व जमल्या आहेत अशी नाटकाची सुरुवात आहे. बागेत गोलाकार खुच्र्या मांडून प्रेक्षकवृंद उत्सुकतेने नाटक पाहायला बसला होता. पण नटांचा- खरं तर नटय़ांचा मागमूसही दिसेना, तेव्हा थोडीशी चुळबूळ सुरू झाली. आणि मग बंगल्याच्या पाठीमागून, त्याला वळसा घालून एक जुनाट मॉरिस गाडी पों-पों हॉर्न वाजवीत सुसाट वेगाने आली आणि प्रेक्षकांसमोर थांबली. गाडीमध्ये- विश्वास ठेवा- मोजून पंधरा साळकाया म्हाळकाया कोंबून बसल्या होत्या. काही एकमेकींना धरून चक्क बाहेर लोंबकळत होत्या, तर दोन-तीन तरुण पोरी वर कॅरिअरला पकडून देवाचा धावा करीत होत्या. सगळ्यांकडे जुजबी सामानपण होते. एक पोपटाचा पिंजरा (पोपटासकट) आणि एक कडेवरचे बाळ होते. काकूंनी आपली एक छानशी वळकटी बनवून आणली होती. बायकांच्या या भन्नाट ‘एंट्री’लाच अशी काही दाद मिळाली, की मला वाटतं, वर्षभर वनिता समाजमध्ये चर्चेचा दुसरा विषय नव्हता.
पाळामुळांपासून उखडून दूर वसलेले लोक नेहमीच आपल्या मुलखाच्या दिशेने कधी वाऱ्याची झुळूक येते आहे याची आतुरतेने वाट पाहत असतात. तसेच दिल्लीकर मराठी मंडळी संगीत कार्यक्रम किंवा नाटक पाहण्यासाठी टपून बसलेली असत. पण एका नाटकाचे चार किंवा फार तर पाच प्रयोग झाले की प्रेक्षकांची लाट ओसरत असे. कारण दिल्लीच्या इमानदार नाटय़प्रेमींची संख्या (तिकीट विकत घेऊन नाटक पाहणारी) मर्यादित होती. एक नाटक उभं करण्यासाठी घेतलेले परिश्रम, खर्ची घातलेला वेळ व पैसा आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ जुळत नव्हता. आमच्या व्यवहारदक्षतेची कमजोरी याआधीच नमूद केली आहे. पण वरचेवर ठेचा बसल्या की हळूहळू शहाणपण येते. राजधानीत मराठी नाटक करणे हा अव्यापारेषु व्यापार आहे हे कळून चुकले. तेव्हा तो उपक्रम बंद करणे इष्ट होते. पण अंगी मुरलेल्या आमच्या मराठी बाण्याचे काय? मायबोलीकडे पाठ कशी फिरवायची? .. मग एक शक्कल सुचली. निवडक मराठी नाटकांचं हिंदी रूपांतर मंचित करायचं. भाषांतर उपलब्ध नसेल तर मुद्दाम करवून घ्यायचं. त्यायोगे मराठी नाटकांचा प्रसार होईल आणि आपली दिंडीही चालू राहील. या उपक्रमाला हिंदी प्रेक्षक तर लाभेलच (टच्वुड); पण नाटय़प्रेमी मराठी बांधवही आवर्जून येतील.
पहिलेच नाटक निवडताना ते लोकांच्या पसंतीला पात्र ठरलेले असावे असा आम्ही विचार केला. आमचे लक्ष पु. ल. देशपांडय़ांच्या ‘अंमलदार’कडे वळले. गोगोलच्या ‘The lnspector Calls’ किंवा ‘The Government inspector’ या अप्रतिम मार्मिक नाटकाचे ते रूपांतर होते. त्याच नाटकावर बेतलेला डॅनी केचा सिनेमा मी पाच-सहा वेळा पाहिला असेल. अधिकारीवर्गामधल्या भ्रष्टाचाराचे अतिशय नेमके आणि खोचक वर्णन करणारे ते मूळ धमाल विनोदी नाटक दुर्दैवाने आजही तितकेच कालातीत आहे. किंबहुना, १८३६ साली निकोलाय गोगोलने लिहिलेले हे रशियन नाटक देशोदेशी भ्रष्ट सरकारांची चलती असेपर्यंत अमर आहे असेच म्हणावे लागेल.
सुदेश स्याल या आमच्या मित्राने शेवटी मूळ गोगालच्या संहितेवरूनच (म्हणजे त्याच्या इंग्रजी अनुवादावरून) फार सुंदर रूपांतर केले- ‘जी हुजूर’!
दूरदर्शन आणि राष्ट्रीय नाटय़विद्यालयाचा ((N. S. D)) गोतावळा सतत आमच्या भोवती असे. तेव्हा गुणी कलाकार मिळायला काहीच अडचण पडली नाही. A.I.F.A.C.S  (All India Fine Arts and Crafts) च्या दर्जेदार रंगमंदिरात नाटकाचे प्रयोग झाले. त्याकाळी कोणतेही चांगले नाटक सादर करण्यासाठी नाटकवाले सर्वप्रथम AIFACS कडे धाव घेत. हिंदी आणि मराठी रसिकांनी नाटकाचे छान स्वागत केले.
‘नाटय़द्वयी’ची आता ठाम दिशा ठरून गेली. अरुण आणि मी भराभर नवीन नवीन नाटके वाचू लागलो. पण आता संस्थेची रीतसर नोंदणी करणे आवश्यक होते. त्यासाठी कार्यकारिणी नेमायची निकड होती. दिल्लीमध्ये प्रकाश परिचारक म्हणून तेव्हा अरुणचा एक मित्र होता. अतिशय कर्तृत्ववान आणि धडाडीचा. मदत करणारा. तो नेमकं काय काम करायचा, ते आता आठवत नाही; पण अगदी ‘चलता पुर्जा’ होता, हे खरं. सरकारदप्तरी त्याच्या खूप ओळखी होत्या. त्याच्या ऑफिसात लब्धप्रतिष्ठित मंडळींची नेहमी ऊठबस असे. तो आमचा अनधिकृत सल्लागार होता. व्यवहारनिपुण. असेच आम्ही एकदा त्याच्या टेबलाभोवती बसून ‘नाटय़द्वयी’च्या कमिटीसाठी योग्य माणसांबद्दल ऊहापोह करीत होतो.
‘‘प्रकाश, अध्यक्ष तू हो. दुसरा कोणी मला तरी दिसत नाही,’’ अरुण म्हणाला. थोडे आढेवेढे घेऊन प्रकाश कबूल झाला. अरुण आणि मी ओघानेच सहचिटणीस झालो. पण बाकी दोन-तीन सदस्यांचे काय? कर्मधर्मसंयोगाने त्याचवेळी प्रकाशच्या ऑफिसात तीन वेगवेगळे सरकारी अधिकारी उपस्थित होते. त्यांची नावे आता आठवत नाहीत. पण एकजण चंदिगढला अंडर सेक्रेटरी होते, तर एक जयपूरहून आले होते. तिसरे महाशय आग्य्राला एका बऱ्यापैकी महत्त्वाच्या हुद्दय़ावर होते. हे तिघेजण डोळे विस्फारून आमच्या गप्पा ऐकत होते. एकूणच सर्वसामान्यपणे नाटक- टी. व्ही.- सिनेमातील  कलाकारांबद्दल लोकांना विलक्षण कुतूहल असते. त्यातून प्रकाश आमची (आणि पर्यायाने स्वत:ची!) भलामण करायला आमच्या खऱ्या-खोटय़ा करामतींची रसभरीत वर्णने करीत होता. मधेच तो नाटय़पूर्ण पॉझ घेऊन थांबला आणि म्हणाला, ‘‘अरुण, आपल्या कार्यकारी समितीसाठी दूर जायला नको. या इथे, या खोलीत तीन अतिशय लायक हस्ती मौजूद आहेत, हा फार विलक्षण योगायोग आहे. आपण त्यांनाच विचारू या. ते ‘नाही’ म्हणणार नाहीत..’’ नाटकाशी सुतराम संबंध नसतानाही ते तिघे ‘नाही’ म्हणाले नाहीत. उलट, अतिशय आनंदाने त्यांनी रूकार दिला. आमची गंगाजमनी कार्यसमिती नोंदवण्यात आली.
आपली रीतसर नाटक कंपनी स्थापन झाली आहे, तेव्हा आता एखादे वजनदार नाटक हाती घ्यावे असे आम्हाला प्रकर्षांने वाटले. मुंबईला तेव्हा ‘सखाराम बाइंडर’ गाजत होतं. त्याचा हिंदी अवतार दिल्लाला पेश करायचं आम्ही ठरवलं. विजय तेंडुलकरांनी आनंदाने परवानगी तर दिलीच; पण आम्हाला हिंदी अनुवादही मिळवून दिला.
रंगभूमीवर (किंवा कुठेच) अभिनय करण्यात मला फारशी रुची नव्हती. माझ्या अभिनयाची झेपही अगदी सीमित होती. ‘नांदा सौख्यभरे’मधली माझी भूमिका अगदी माझ्यासाठी (मीच) लिहिली असल्यामुळे ती चपखल वठली आणि थोडे कौतुक झाले, एवढेच. लेखन-दिग्दर्शन हा माझा प्रांत. तेव्हा त्यावर लक्ष केंद्रित करण्याचं मी ठरवलं. अरुण स्टेजवर अतिशय सहजतेने वावरत असे. त्याला दिग्दर्शनापेक्षा अभिनय करण्यात रुची होती. या पाश्र्वभूमीवर सखारामचे काम अरुणने करावे आणि नाटकाचे दिग्दर्शन मी करावे, हे आपसूकच ठरल्यासारखे झाले. लक्ष्मी आणि चंपा या दोन जबरदस्त स्त्रीपात्रांसाठी फार चांगल्या नटय़ा आम्हाला मिळाल्या. त्यातली कोण अधिक सरस होती, हे सांगणं कठीण आहे. सुधा चोपडा- लक्ष्मी आणि सुषमा सेठ- चंपा. सुधा टी.व्ही.मध्ये माझी सहायिका होती. आमचे छान सूर जुळले होते. रांगडा पंजाबी विनोद तिच्या अणुरेणूंत एरवी ठासून भरला असला, तरी लक्ष्मी म्हणून मंचावर ती उभी राहिली की करुणमूर्ती भासे. लक्ष्मी मुंगळ्याशी बोलते तो मनोहर प्रसंग सुधा इतका बेमालूम करीत असे, की केवळ तो पाहण्यासाठी मी तिला पुन: पुन्हा तालीम करायला लावी. मतलबीपणाची झाक असलेली नखरेल, मादक चंपा सुषमाने फारच सुरेख वठवली. सुषमा अमेरिकेहून नाटय़शिक्षण घेऊन आली होती. दिल्लीच्या नाटय़क्षेत्रात तिचा दबदबा होता. वास्तविक या दोघी स्वभावाने आपापल्या भूमिकांच्या अगदी उलट प्रवृत्तीच्या होत्या. सुधा चंट, काहीशी भडक, चंगळवादी; तर सुषमा सोज्वळ, सौम्य, थोडीशी भिडस्त. दोघींनी फार मोठय़ा ताकदीने आपापल्या भूमिका वठवल्या.
तालमी अधिककरून आमच्या घरी होत असत. पण सुषमाच्या मुलांना एकटं सोडण्याची अडचण उद्भवली की त्या तिच्या घरी होत. भोवताली मुलं बागडत असताना सखाराम-चंपाचे उघडय़ा भाषेतून प्रकटणारे भडक संवाद खुलेपणाने उच्चारायची चोरी! अशावेळी खबरदारीपूर्वक खालील प्रकारे तालीम चाले.
सखाराम : मैं तुम्हारी अं अं अं अं.. समझी?
चंपा : अरे, तू क्या उं उं उं उं.. इ.
त्या काळात दिल्लीमध्ये नाटकाचे व्यावसायिक प्रयोग करणे ही फार दुर्धर गोष्ट होती. परवानगी आणि करमणूककर माफ असल्याचे दिल्ली एन्टरटेन्मेंट टॅक्स डिपार्टमेंटचे पत्र मिळाले तरच तिकीट विक्री करण्याची मुभा होती. ही यंत्रणा इतकी गोगलगायच्या गतीने चाले, की बस्स! महिना- महिना आधी अर्ज करूनसुद्धा कुणी दखल घेत नसे. अधिकारीच काय, कारकूनसुद्धा भेटत नसत. भेटलेच तर बेफिकिरीची उत्तरं मिळत. एकूण नाटय़प्रपंच हीच मुळी फार गौण बाब मानली जाई. एक फालतू कटकट! त्यामुळे सगळाच मामला अगदी अघळपघळ (Informal) होता. अशावेळी छोटे-मोठे नाटय़संच सर्रास आमंत्रणे छापून ती विकत असत. दिल्ली स्टेटचा करमणूक-कर विभाग तिकडे काणाडोळा करीत असे.
सखारामच्या तालमी सुरू होण्याआधी- तीन महिने आधी आम्ही रीतसर अर्ज केला होता. वारंवार दार ठोठावूनही ते उघडले गेले नव्हते. आम्हाला उत्तर मिळाले नव्हते. ‘कशाला नसत्या फंदात पडता? बाकीच्यांप्रमाणे खुशाल पत्रिका छापा,’ असा सल्ला वरचेवर मिळू लागला.
प्रयोग जवळ आला. AIFACS  थिएटर आम्ही केव्हाच आरक्षित केले होते. जाहिराती छापून येऊ लागल्या होत्या. थिएटर भाडे, प्रसारण, तालमी, रोजची ये-जा, रिक्षा (दिल्लीत बसप्रवास अशक्यच!), सेट या सगळ्याचा मोठा खर्च झाला होता. पाहता पाहता प्रयोग चार दिवसांवर आला. आम्ही अद्याप टांगलेलेच होतो. अखेर ‘गरजवंताला अक्कल नसते’ या न्यायाने आम्ही पत्रिका छापल्या. हां-हां म्हणता त्या खपल्या. उरलेल्या थोडय़ा प्रवेशद्वारापाशी विक्रीसाठी ठेवल्या होत्या. खेळ ‘हाऊसफुल्ल’ झाला. त्याचा प्रचंड बोलबाला झाला. आणि मग ‘झोपी गेलेला जागा झाला’.. खडबडून! दिल्ली सरकारला आता ‘जाने दो’ म्हणून पाठ वळवणे शक्य नव्हते.
चार दिवसांनी घरी अरुणला आणि मला कोर्टाचे समन्स आले. पाठोपाठ प्रकाश परिचारकचा घाबऱ्याघुबऱ्या फोन.. ‘काय चाललं आहे तरी काय?’ चंदिगढ, आग्रा आणि जयपूरच्या आमच्या मान्यवर मेंबर्सनाही साहजिकच सरकारी फतवा गेला होता. हातातले काम टाकून बिचारे दिल्लीला धावून आले. सगळेजण वैतागले होते. विशेषत: प्रकाशवर!
‘‘आमच्या तोंडचं पाणी पळालं आहे. काही देणं नाही, घेणं नाही.. हा कसला व्याप आमच्यामागे लागला आहे? आम्ही तुमच्या संस्थेचा राजीनामा देतो. पण आम्हाला यातून सोडव.’’
प्रकाश म्हणाला, ‘‘सोडवणारे आम्ही कोण? प्रकरण आता हाताबाहेर गेलं आहे.’’
नाटकाच्या नाहक नादापायी बिचाऱ्यांना कोर्टात ‘नाटय़पूर्ण’ हजेरी लावावी लागणार होती. हौसेचा केवढा मोठा मोबदला!
आमच्या करमणूककर रद्द करण्याबाबतच्या अर्जाच्या प्रती, आमचा नाइलाज कसा झाला याचे सविस्तर निवेदन आणि सगळा चोख हिशोब, इ. कागदपत्रांची फाइल बनवून आम्ही आमच्या परीने आमची बाजू भक्कमपणे तयार केली. या ‘न’ नाटकाचे अध्वर्यु.. दिल्ली स्टेटचे वित्तमंत्री मांगेराम यांना भेटायचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला. पण त्यांच्या ऑफिसातला सामान्यतम नोकरही भेटणे दुरापास्त होते.
तारखांवर तारखा पडत होत्या. आम्हा सर्वाची ससेहोलपट चालली होती. आणि मग आम्हाला प्रकाश दिसला.. यशवंतराव चव्हाण! ते तेव्हा भारताचे गृहमंत्री होते. अखेर त्यांच्याकडे आम्ही थेट धाव घेतली. त्यांची तात्काळ भेट मिळाली.
फार पूर्वी- मी पुण्यात बालरंगभूमी करीत होते तेव्हा- माझे ‘पत्तेनगरीत’ हे बालनाटक बघायला ते पंडित नेहरूंना घेऊन आले होते. नेहरूंना प्रयोग अतिशय आवडला होता. त्या प्रसंगाची मी आठवण देण्याआधी त्यांनीच ती मला दिली.
‘‘आज काय काम काढलं?,’’ त्यांनी हसून सवाल केला. आणि मग आम्ही आमची रामकहाणी त्यांना ऐकवली. हसू दाबत यशवंतरावांनी विचारलं, ‘‘इतके दिवस का थांबलात? याआधीच का नाही तुम्ही मंडळी आलात?’’
‘‘तुमच्या कामात तुम्हाला क्षुल्लक गोष्टीसाठी त्रास देणं इष्ट वाटलं नाही,’’ मी म्हटलं.
‘‘अस्सं! तुरुंगात जाणं ही क्षुल्लक बाब झाली तर..!’’ असं मिश्कीलपणे म्हणून त्यांनी कागदावर काही लिहून तो कागद त्यांचे खाजगी चिटणीस डोंगरे यांच्याकडे दिला.
दोन दिवसांतच सगळा नूर पार बदलला. मांगेरामची मंडळी धावतपळत आमच्या घरी आली आणि आमच्या सह्या घेऊन निघून गेली. ‘सखाराम बाइंडर’च्या आमच्या या ‘विशेष’ नाटय़ावृत्तीवर कायमचा पडदा पडला.
जयपूर, चंदिगढ आणि आग्रावाले ते अधिकारी पुन्हा काही दृष्टीस पडले नाहीत. मला वाटतं, त्यांनी धसका घेऊन नाटक पाहणंच कायमचं सोडून दिलं असणार.
(भाग २)  

supriya sule on pankaja munde
पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”
uddhav thackeray sharad pawar
“…तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी ‘इंडिया’ आघाडीची साथ सोडली पाहिजे”, भाजपाचं थेट आव्हान
marathi book ibru review by author yashodhara katkar
आदले । आत्ताचे : लैंगिकतेचे कलात्मक समाजभान..
rohit mane
“…तर मी गावाला शेती करत असतो”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचे वक्तव्य चर्चेत

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mother tongue to national language

First published on: 27-04-2014 at 01:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×