संक्षेपात साहित्यिक व्यक्तिमत्त्वं
हा साहित्यिक आणि साहित्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींविषयीचा लेखसंग्रह आहे. यात एकंदर २३ लेख आहेत. हे सर्वच लेख निमित्तानिमित्ताने लिहिले गेलेले आहेत. त्यामुळे त्यात काही प्रमाणात औपचारिकता आणि प्रासंगिकता दिसते. यात पु. ग. सहस्रबुद्धे, वि. रा. करंदीकर, के. ज. पुरोहित, वसंत दावतर, हे. वि. इनामदार, म. द. हातकणंगलेकर, वि. बा. प्रभुदेसाई, ग्रेस, र. बा. मंचरकर, नागनाथ कोत्तापल्ले, वा. म. जोशी, रा. ग. जाधव इत्यादी साहित्यिकांचा समावेश आहे. यातील काहींचा लेखकाला प्रत्यक्ष सहवास लाभला, काहींशी या ना त्या कारणाने मैत्री झाली, तर काहींचं साहित्य आवडलं म्हणून त्यांच्याविषयी लिहिलं गेलं. पुस्तकाच्या शीर्षकावरून ही व्यक्तिचित्रे नसून सुहृदांविषयीचं लेखकाला करावंसं वाटलेलं गान आहे. ज्यांना निखळ साहित्यात स्वारस्य आहे, त्यांना हा संग्रह वाचनीय वाटू शकतो.
‘सुहृदगान’ – विलास खोले, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे,
पृष्ठे – २९५, मूल्य – ३०० रुपये.

कुष्ठरोग्याची जीवनकथा
ही एका कुष्ठरोग्याविषयीची कादंबरी आहे. या कादंबरीचा नायक राजेश हा कुष्ठरोगी असतो. पण त्यावर मात करत तो आंतरराष्ट्रीय कीर्तीचं संशोधन करतो, असे या कादंबरीचं कथानक. मात्र यासाठी लेखिकेने कुष्ठरोग्यांशी बोलून त्यांचा आजार, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, डॉक्टरांशी चर्चा केली. त्यामुळे लेखिकेच्या म्हणण्यानुसार ही सत्यघटनेवर आधारित कादंबरी आहे. पण कादंबरीच आहे. त्यात वास्तवाचा भाग कमीच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कादंबरीसारख्या वाङ्मय प्रकाराला प्रस्तावनेची गरज नसते. पण या कादंबरीला लेखिकेने घेतली आहे. तिला प्रस्तावना का म्हणायचे हा प्रश्न आहे. लेखिकेचे मनोगतही आहे. ते आणखी आटोपशीर करता आले असते. कुष्ठरोगाविषयी अलीकडे बरीच जागरूकता झाली आहे. त्यामुळे या कादंबरीच्या वाटेला जायला हरकत नाही.
‘उ:शापित’ – डॉ. अनघा केसकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – २८७, मूल्य – २५० रुपये.

निम्नमध्यमवर्गीय कथा
वासुदेव मुलाटे हे मराठवाडय़ातील ग्रामीण कथाकार, समीक्षक आणि प्रकाशक. ते गेली चाळीस-बेचाळीस वर्षे कथा लिहीत आहेत. या काळात निम्न- ग्रामीण भाग जसजसा बदलत गेला, त्या प्रमाणात ग्रामीण जनमानसही बदलत गेले. त्याचे प्रतिबिंब काही प्रमाणात मुलाटे यांच्या कथांमध्ये दिसते. तसे ते सर्वच ग्रामीण कथाकारांच्या कथा-कादंबऱ्यांमध्ये पाहावयास मिळते. यात एकंदर वीस कथा आहेत. या कथा तशा निम्नमध्यमवर्गीय कथा आहेत आणि सहकाराच्या फटक्यांनी जायबंदी झालेल्या लोकांच्या कथा आहेत, हा कोत्तापल्ले यांचा अभिप्राय. मुलाटे यांचे कथालेखन लक्षणीय आहे, पण काहीसे उपेक्षित आहे, असे त्यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे. या संग्रहाला कोत्तापल्ले यांनी सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. त्यामुळे या संग्रहाकडे कसे पाहावे, हे जाणकार वाचकांना लक्षात येईल.
‘वासुदेव मुलाटे यांच्या निवडक कथा’ – संपा. नागनाथ कोत्तापल्ले, मनोविकास प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १८९, मूल्य – १९० रुपये.

दमदार विनोदी कथा
हल्ली मराठीमध्ये विनोदी कथा फारशा लिहिल्या जात नाहीत. ज्या लिहिल्या जातात त्यांच्या विनोदाचा दर्जा यथातथाच असतो. चांगल्या विनोदी कथा लेखनाची मराठीतली परंपरा आजघडीला खूपच मंदावली आहे. अशा परिस्थितीत आधीच्या विनोदी लेखकांच्या चांगल्या कथांचा हा संपादित संग्रह चांगला उतारा ठरावा. या संग्रहात एकंदर दहा कथा आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं. वि. जोशी, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, शकंर पाटील, गंगाधर गाडगीळ, द. मा. मिरासदार, मुकुंद टाकसाळे आणि मंगला गोडबोले या बिनीच्या लेखकांच्या या कथा आहेत. या संग्रहाला संपादक भोसले यांनी प्रस्तावना लिहिली आहे. पण या कथा प्रस्तावना न वाचता वाचल्या तर त्यांची खुमारी अधिक चांगल्या प्रकारे भिडू शकते.
‘मराठी विनोदी कथा’ – संपा. डॉ. द. ता. भोसले, लीलावती प्रकाशन, अहमदनगर, पृष्ठे – १३७, मूल्य – ८० रुपये.

अजबगजब गूढकथा
हा बारा गूढकथांचा संग्रह. रंजक आणि रहस्यमय. मराठीमध्ये अलीकडच्या काळात विनोदी कथांप्रमाणेच गूढकथांचे प्रमाणही मंदावले आहे. अशा परिस्थितीत हा संग्रह वाचनीय ठरावा. यातील सर्व कथा या यापूर्वी १९९८ ते २०१२ या कालावधीत वेगवेगळ्या नियतकालिकांतून प्रकाशित झाल्या आहेत. मानवी आयुष्य हे गुंतागुंतीचं, अंतर्विसंगतींचं असतं. त्यात अनपेक्षित अशा घटना सतत घडत असतात. त्यामुळे आयुष्यात अनपेक्षित असं काही नसतं, असं म्हटलं जातं. यातूनच गूढकथांचा जन्म होतो. शिवाय माणसाचं मन ही तर मोठी अजब गोष्ट असते. त्या अजबगजबतेतून या कथा आकाराला आल्या आहेत.
‘पडसावली’ – चंदर भागवत, राजा प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १८२,
मूल्य  -१७५ रुपये.