पडसाद : आरक्षणाचे जातवास्तव

‘लोकरंग’मधील (२२ ऑगस्ट) अंजली चिपलकट्टी यांच्या ‘विचारांचे लगाम भाषेच्या हातात?’ या लेखातून वेगळे विचार मिळाले.

‘लोकरंग’मधील (२२ ऑगस्ट) श्रीरंजन आवटे यांचा ‘आरक्षण म्हणजे डिस्काउंटचा मेगा सेल?’ या लेखाद्वारे आरक्षण या विषयाच्या विविध बाजूंचा सविस्तरपणे ऊहापोह करण्यात आला आहे. आर्थिक निकषांवर आरक्षण देणे पूर्णपणे गैर आहे. गरिबांसाठी आर्थिक साहाय्य जरुर करावे; पण आरक्षणाचा निर्णय हा सामाजिकदृष्टय़ा मागास, प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्यांना सार्वजनिक क्षेत्रात समान संधी देण्यासाठी घेतला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी घडलेले नाटय़, छत्रपती संभाजी महाराजांविरोधात मंत्र्यांकडूनच केली गेलेली कट-कारस्थाने, तुकोबांच्या गाथा शिक्षा म्हणून इंद्रायणीच्या डोहात बुडवायला लावणे, छत्रपती शाहू महाराजांसाठी वेदोक्त मंत्र म्हणण्यास दिलेला नकार ही ऐतिहासिक उदाहरणे काय दर्शवतात? या सर्व महनीय व्यक्ती आर्थिकदृष्टय़ा संपन्न होत्या. तरीही त्यांना सामाजिक विषमतेचा सामना करावा लागला. याच पद्धतीचे राष्ट्रपतींचे उदाहरण लेखात समाविष्ट आहेच. ही जातीय मानसिकता टिकून असल्यामुळे आरक्षणाची आवश्यकता आजही आहे. आरक्षणामुळे वर्षांनुवर्षे अन्याय सहन केलेल्या जाती-जमातींचा आर्थिक-सामाजिक स्तर उंचावला. गुणवत्तेच्या ऱ्हासाला आरक्षणाचे धोरण कारणीभूत आहे असाही एक बिनबुडाचा आरोप केला जातो. रेल्वेसंदर्भातील सर्वेक्षणाचे उदाहरण देऊन याही मुद्दय़ावर लेखात भाष्य केलेले आहे. आरक्षण नसणे हाच तुमच्या प्रगतीतील अडथळा आहे, हे आरक्षणाचे लाभधारक नसलेल्या वर्गाला पद्धतशीररीत्या पटवून देण्याचे प्रयत्न होत असतात. निवडणुकीतील ध्रुवीकरणाच्या राजकारणाला यातून बळ मिळते. आणि काही तथाकथित नेते आरक्षण म्हणजे ‘डिस्काउंटचा मेगा सेल’ हे पटवून देण्यात यशस्वी होतात.

– सौरभ साबळे, कराड, जि. सातारा

वेगळ्या विचारांची मांडणी

‘लोकरंग’मधील (२२ ऑगस्ट) अंजली चिपलकट्टी यांच्या ‘विचारांचे लगाम भाषेच्या हातात?’ या लेखातून वेगळे विचार मिळाले. सद्य:स्थितीत शब्दांचे अर्थ बदलत असून, विशेषत: राजकीय नेत्यांची भाषणे, वक्तव्ये ऐकताना, पाहताना याचा प्रत्यय येतो. आपल्या फायद्यासाठी जनतेला सहजगत्या कसे फसवावे हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात येते. लोकांनाही हे समजत असते, पण सर्वसामान्य माणसाला सद्य:स्थिती व परिस्थितीने हैराण केलेले असताना, आहे त्या परिस्थितीतच नाइलाजाने जीवनाची वाटचाल होत आहे. आपले प्रश्न आपल्यालाच सोडवावे लागणार असून आश्वासने उपयोगी पडत नाहीत, हेच यातून समजते.

– प्र. मु . काळे, सातपूर, नाशिक

संभ्रम दूर करणारा लेख

‘आरक्षण म्हणजे ‘डिस्काउंटचा मेगा सेल?’ हा आरक्षणाचे विरोधक आणि लाभार्थ्यांना अंतर्मुख करायला लावणारा लेख वाचला.  खरं तर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनंतरही आरक्षणासंदर्भात किती भिन्न भिन्न प्रकारचे संभ्रम पसरलेले आहेत, हे लोकव्यवहारातील उदाहरणांच्या माध्यमातून लेखकाने तटस्थपणे निदर्शनास आणून दिले आहे. त्याकरता त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे.

वस्तुत: भारतीय राज्यघटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम १४ नुसार सर्व नागरिक समान आहेत असे म्हटलेले आहे. मात्र, असे असूनही प्रत्यक्षात सामाजिक दृष्टिकोनातून समता अस्तित्वात नसल्यामुळे कलम १५ आणि १६ नुसार अनुसूचित जाती (रउ), अनुसूचित जमाती (रळ), बालके व स्त्रियांसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. समाजात समता प्रस्थापित व्हावी यासाठी या तरतुदी केलेल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात मात्र अद्यापही लोकशाही समाजव्यवस्थेत ‘समता’ निर्माण होऊ शकलेली नाही, हे कटु सत्य आहे. या वास्तवाची तर्कशुद्ध कारणमीमांसा श्रीरंजन आवटे यांनी लेखात केली आहे, ती सर्वानीच मुळातून वाचली पाहिजे. जेणेकरून अभिजन वर्ग आणि आरक्षणविरोधी उच्चशिक्षित वर्गामध्ये आरक्षणाबद्दल जो गैरसमज व संभ्रम निर्माण झालेला आहे तो निश्चितपणे दूर होईल.

आरक्षणामुळे गुणवत्तेचा ऱ्हास होतो किंवा आरक्षणामुळे जातीयता निर्माण होते, या आरोपांचेही साधार विवेचन आवटे यांनी केले आहे. वस्तुत: आरक्षणाचा मूळ हेतू सामाजिक विषमतेचा पट नष्ट करणे हा आहे. म्हणून ‘आरक्षण म्हणजे डिस्काउंटचा मेगा सेल’ असे समजणे सामाजिक विकासाच्या दृष्टीने चुकीचे आहे. त्यामुळे आरक्षणामागच्या सामाजिक न्यायाच्या तत्त्वाला हरताळ फासला जाणार आहे, हे परखडपणे लक्षात आणून देणारा सत्यशोधकीय लेख प्रसिद्ध केल्याबद्दल आभार!

– डॉ. अशोक इंगळे, अकोला

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Reactions the essence of reservation ssh

ताज्या बातम्या