भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी परिश्रमपूर्वक तयार केलेले ‘व्हिजन डॉक्युमेंट’ पक्षांतर्गत मतभेदांमुळे सध्या धूळ खात पडले आहे. या ‘व्हिजन’साठी तात्या टोपे यांच्या वंशजांना अमेरिकेतून भारतात पाचारण करण्यात आले होते. अर्थ, संरक्षण, अल्पसंख्याक, पायाभूत सुविधांचे पुढील वीसेक वर्षांचे नियोजन असे या ‘व्हिजन’चे स्वरूप होते. परंतु, ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा, डॉ. मुरली मनोहर जोशी, अरुण जेटली या नेत्यांच्या नकारघंटेमुळे गडकरींना ‘व्हिजन’ बासनात गुंडाळावे लागले. विशेष म्हणजे निवडणुकीदरम्यान वाद टाळण्यासाठी खुद्द पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनीच गडकरींच्या ‘व्हिजन’ला ब्रेक लावला.
    तात्या टोपे यांचे वंशज पराग टोपे सध्या अमेरिकेत असतात. दोन महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाने त्यांना भारतात बोलाविले होते. त्यांच्या माध्यमातून आयटी क्षेत्रात भविष्यात होणारे संभाव्य बदल व त्यानुसार भारताचे आयटी धोरण काय असावे, याचे प्रारूप तयार करण्यात येणार होते. ‘व्हिजन २०२५’ या नावाने विकासाचे प्रारूप तयार करण्यासाठी पराग टोपे यांची मदत घेण्यात आली. विशेष म्हणजे पराग टोपे यांच्यासारख्या कित्येक तज्ज्ञांच्या मदतीने भाजपने व्हिजन डॉक्युमेंट तयार केले होते. त्यात प्रामुख्याने चालू करप्रणालीत लक्षणीय बदल सुचविले होते. नितीन गडकरी यांनीदेखील करप्रणालीत बदल करण्याचा आग्रह धरला होता. औद्योगिक क्षेत्रात वाढ, कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे प्रयोग करण्यास व्हिजनमध्ये सुचविले होते. परंतु, भाजपच्या प्रमुख नेत्यांसह राजनाथ सिंह व्हिजन डॉक्युमेंटमधील अनेक मुद्दय़ांशी
असहमत होते.
अध्यक्ष असताना गडकरी यांनीच व्हिजन डॉक्युमेंटची घोषणा केली होती. परंतु,  गैरव्यवहाराची कथित प्रकरणे समोर आल्याने दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याची गडकरींची इच्छा‘पूर्ती’ झाली नाही. मात्र, तरीही गडकरींनी व्हिजन डॉक्युमेंट पुढे रेटले. निवडणूक जाहीरनामा तसेच व्हिजन डॉक्युमेंटसाठी समिती नियुक्त करण्यात आली होती. ही समिती ८ मार्चपर्यंत पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांना व्हिजन डॉक्युमेंट सुपूर्द करणार होती. परंतु, मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीनंतर व्हिजन डॉक्युमेंटची संकल्पना बारगळली. गडकरींच्या आग्रहामुळे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात आले. परंतु, त्यातील अनेक सूचनांवर पक्षानेत्यांमध्ये एकमत झाले नाही. अखेरीस राजनाथ सिंह व नरेंद्र मोदी यांनीच गडकरींच्या व्हिजन डॉक्युमेंटला ब्रेक लावला.
दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध करण्यात येईल, असा दावा दिल्लीस्थित गडकरी समर्थक करीत आहेत. परंतु, भाजप सत्तेत आल्यास गडकरींच्या ‘व्हिजन’ऐवजी मोदींचेच ‘व्हिजन’ महत्त्वाचे ठरेल, अशी बोलकी प्रतिक्रिया भाजपच्या अन्य नेत्याने दिली.