लोकसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे ‘इंजिन’ रूळावर आणण्यासाठी राज ठाकरे यांनी प्रयत्न चालवले असताना पक्षातील ‘सखारामबापू बोकिलां’मुळे जागोजागी मतभेदांच्या दऱ्या रुंदावताना दिसत आहे. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये आमदार व सरचिटणीस वसंत गिते हे सध्या नेतृत्वावर कमालीचे नाराज असून पक्षांतर्गत निर्णयप्रक्रियेतून त्यांना बाजूला ढकलल्यामुळे गिते व त्यांचे समर्थक नगरसेवक बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परिणामी दस्तुरखुद्द राज ठाकरेच आता नाशिकमध्ये पोहोचल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मनसेच्या स्थापनेपासून नाशिकने राज ठाकरे यांना साथ दिली. वसंत गिते यांनी नाशिकमध्ये आंदोलने करून मनसेचा दबदबा निर्माण करत पक्षविस्तार केला. विधानसभा निवडणुकीत तीन आमदार निवडून आले तर पालिकेची सत्ताही आज मनसेच्या हाती आहे. तथापि लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत गेलेले हेमंत गोडसे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना लोकसभा निवडणुकीत चारीमुंडय़ा चित तर केले. मनसेलाही नाशिकमध्ये आपली अनामत रक्कम गमवावी लागली. नाशिकमध्ये मराठा विरुद्ध माळी अशा मनसेअंतर्गत लढाईत गोडसे यांना मनसेला सोडचिठ्ठी द्यावी लागली होती. तेव्हापासून मनसेत गटबाजीला उधाण आले. या साऱ्यात नाशिकमधील महापालिका तसेच पक्षांतर्गत निर्णय प्रक्रियेतून आमदार वसंत गिते यांना बाजूला करून पक्षाने सरचिटणीस अविनाश अभ्यंकर यांना नाशिकची सुभेदारी दिली एवढेच नव्हे तर आमदार उत्तमराव ढिकले यांचे चिरंजीव राहुल ढिकले यांची शहराध्यक्षपदी वर्णी लावली. एका घरात एकच पद देणार हे पक्षस्थापनेच्यावेळी राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात नाशिकमध्ये ढिकले यांना आमदारकी तर त्यांचे चिरंजीव राहुल यांना नगरसेवकाचे तिकीट दिले होते. शिवाय राहुल यांना शहराध्यक्षपद व स्थायी समितीचे सभापतीपदही देण्यात आले. मुदलात नाशिक महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत व स्थायी समितीतही भाजपने मनसेला साथ दिली व त्याची परतफेड यावेळी स्थायी समिती सभापतीपद भाजपला देऊन करण्याचा निर्णय वसंत गिते यांनी घेतला होता. मात्र गिते यांना बाजूला सारून मनसेने अपक्षांच्या मदतीने पुन्हा एकदा स्थायी समिती मिळवली. गिते यांनाच बाजूला सारले जात असल्यामुळे गितेसमर्थक पंधरा नगरसेवक बंडाच्या पवित्र्यात असून वसंत गिते हेही पक्ष सोडण्याचा गंभीपणे विचार करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. विधानसभेच्या तयारीसाठी एकीकडे राज ठाकरे सातत्याने पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. मनसेचे नेते आमदार बाळा नांदगावकर हे विधानसभा निवडणूक न लढवता राज्यभार प्रचार करणार असल्याचे मनसेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
मनसेचे ‘अॅप्स’ बंद
मनसेच्या वर्धापनदिनी मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेले अॅप्स सध्या बंद पडले आहे.
राज यांच्या स्वागतास ‘आजारी’ गिते अनुपस्थित
अगदी अलीकडील काळापर्यंत स्थानिक सर्व सूत्रे हाती एकवटलेले मनसेचे प्रदेश सरचिटणीस वसंत गिते हे रविवारी राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी विश्रामगृहात उपस्थित न राहिल्याने त्यांच्याविषयी वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त होत आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर गिते यांना पध्दतशीरपणे बाजूला सारण्यात येत असल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. गिते हे भाजप किंवा अन्य दुसऱ्या पक्षाची निवड करण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत असून या घडामोडींमुळे मनसेतील खदखद बाहेर पडू लागली आहे. राज ठाकरे यांचे रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विश्रामगृहात आगमन झाले त्यावेळीही कार्यकर्त्यांमध्ये केवळ याच प्रकरणाची चर्चा होती. यावेळी गिते, प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक, जिल्हाप्रमुख सचिन ठाकरे यांच्यासह गिते समर्थक काही नगरसेवक अनुपस्थित होते. या अनुपस्थितीचे कारण ‘आजारी’ असल्याचे दिले गेले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2014 रोजी प्रकाशित
नाशकात मनसे फुटीच्या उंबरठय़ावर!
लोकसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे ‘इंजिन’ रूळावर आणण्यासाठी राज ठाकरे यांनी प्रयत्न चालवले असताना पक्षातील ‘सखारामबापू बोकिलां’मुळे जागोजागी मतभेदांच्या दऱ्या रुंदावताना दिसत आहे.

First published on: 07-07-2014 at 03:32 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dissident in mns nashik bastion