वर्षांनुवष्रे सत्तेत असूनही प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींची दखल न घेणाऱ्या राज्यकर्त्यांना मतपेटीतून धडा शिकवण्याचा निर्धार सिंधुदुर्गातील विविध प्रकल्पग्रस्तांच्या समन्वय समितीने आज येथे व्यक्त केला.    कोकण प्रकल्प व प्रशासग्रस्त समन्वय समितीतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील चिपी विमानतळ, सी वर्ल्ड, मच्छिमार संस्था, कुडाळ व कासार्डे एमआयडीसी, धरणग्रस्त, खाणविरोधी संघर्ष समिती अशा पंधरा प्रकल्पविरोधी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी येथील एमआयडीसीमध्ये झाली. या वेळी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांचा समावेश असलेला हक्कनामा एकमताने जाहीर करण्यात आला. समन्वय समितीचे सदस्य रविकिरण तोरसकर यांनी मांडलेल्या मसुद्याला सर्व उपस्थित प्रतिनिधींनी हात उंचावून पाठिंबा जाहीर केला. या वेळी झालेल्या चर्चेत भाग घेताना, जिल्ह्य़ातील प्रकल्पग्रस्तांच्या सध्याच्या परिस्थितीला सत्ताधारी आणि विरोधकही जबाबदार असल्याचे मत मांडण्यात आले. मात्र काही सदस्यांनी स्थानिक खासदार निलेश राणे यांच्याकडे वेळोवेळी निवेदने देऊनही त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.