राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात १९ हजार २१८ नवे करोनाबाधित आढळले. तर, ३७८ जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८ लाख ६३ हजार ६२ वर पोहचली आहे. यामध्ये करोनामुक्त झालेले ६ लाख २५ हजार ७७३ जण, २ लाख १० हजार ९७८ अॅक्टिव्ह केसेस आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या २५ हजार ९६४ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

आज दिवसभरात राज्यभरात १३ हजार २८९ जणांना डिस्चार्ज मिळाला. आतापर्यंत राज्यात ६ लाख २५ हजार ७७३ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ७२.५१ टक्क्यांवर पोहचला आहे.

आजपर्यंत प्रयोगशाळेत तपासण्या करण्यात आलेल्या एकूण ४४ लाख ६६ हजार २४९ नमून्यांपैकी, ८ लाख ६३ हजार ६२ नमूने (१९.३२ टक्के) करोना पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या १४ लाख ५१ हजार ३४३ जण गृह विलगीकरणात (होम क्वारंटाइन) आहेत. तर, ३६ हजार ८७३ जण संस्थात्मक विलगीकरणात (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन)मध्ये आहेत.