महाराष्ट्रात बार आणि लिकर शॉप्स सगळीकडे सुरु झाली आहेत आणि मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? असा प्रश्न विचारत मिसेस फडणवीस अर्थात अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारविरोधात एक ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातली मंदिरं बंद असल्याने त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. वाह रे प्रशासन असं म्हणत उद्धव ठाकरे सरकारला त्यांनी टोलाही लगावला आहे. अनेकदा काही गोष्टींसाठी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राची गरज लागतेच असंही त्यांनी सुनावलं आहे.

महाराष्ट्रातील मंदिरं उघडण्यात यावीत यासाठी भाजपाने आज राज्यव्यापी आंदोलन केलं. मुंबईत तर सिद्धिविनायक मंदिराबाहेर भाजपाने गणपतीच्या मूर्तीची आरती केली त्यानंतर मंदिरात शिरण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं. एवढंच नाही तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं. ज्याला मुख्यमंत्र्यांनी खरमरित उत्तरही लिहिलं आहे. दरम्यान आज दिवसभर अनलॉक असताना महाराष्ट्रातील मंदिरं का बंद? बार आणि रेस्तराँ सुरु झाले आहेत मग मंदिरं का बंद ठेवण्यात आली आहेत हा मुद्दा भाजपाने उचलून धरला. अशात दिवस संपताना अमृता फडणवीस यांनीही याच मुद्द्यावरुन ट्विट करत उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाल्या आहेत अमृता फडणवीस?

” वाह प्रशासन! बार आणि लिकर शॉप्स सुरु झाले आहेत मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? अनेकदा असं होतं की बऱ्याच गोष्टींसाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते.  ”

अमृता फडणवीस यांनी केलेल्या या ट्विटबाबत विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. काहींनी भाजपाशासित राज्यात मंदिरं उघडण्यासाठी असाच जोर लावणार का? असा प्रश्न काहींनी विचारला आहे. तर काहींनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.