CAA म्हणजेच सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वे शरद पवार यांनी पुण्यात केलं आहे. CAA आणि NRC बाबत लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत. देशात सध्या वेगळं चित्र दिसतंय. देशासमोरचे अनेक गंभीर प्रश्न आहेत. केंद्र सरकारनं जो कायदा केला त्यात अफगाणिस्तान, पाकिस्तान बांगलादेशातून आलेल्या लोकांसंबंधी हा कायदा आहे. एका विशिष्ट नावाच्या लोकांवर त्यांचं लक्ष केंद्रीत झालंय. सुधारित नागरिकत्व कायद्याला संसंदेतही विरोध केला. कायद्यामुळे सामाजिक धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता आहे असंही पवार यांनी म्हटलं आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे म्हणून हा विषय समोर आणला जातो आहे असाही आरोप शरद पवार केला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. एका विशिष्ट नावाच्या लोकांवर लक्ष्य केंद्रीत करताना गरीबांवर अन्याय केला जातो आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आपल्या याच पत्रकार परिषदेत त्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणाचाही उल्लेख केला. याप्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी आम्ही महाराष्ट्र सरकारकडे करणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं. नेपाळमधून अनेक लोक येतात. पुणे शहरातही अनेक ठिकाणी अनेक संस्थांमध्ये नेपाळी काम करतात. दिल्लीत माझ्या सरकारी घरामध्ये दोन नेपाळी लोक माझं घर सांभाळतात. गेल्या ३० वर्षांपासून जास्त काळ ते काम करत आहेत. तसंच माझ्याकडेच नाही तर अनेक संस्थांमध्ये नेपाळी लोक पहारेकरी म्हणून काम करत आहे.

सध्याच्या घडीला देशात जे वातावरण आहे ते देशाची जी अर्थव्यवस्था संकटात आहे त्यापासून लक्ष वेधलं जातं आहे म्हणून निर्माण केलं गेलं आहे का? असा प्रश्न पडला आहे. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात हा उद्रेक पोहचेल असं वाटलं नव्हतं. मात्र देशात जे वातावरण निर्माण झालं आहे त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. देशातल्या आठ राज्यांनी आम्ही CAA आणि NRC लागू करणार नाही अशी भूमिका घेतली आहे. बिहारमध्ये भाजपाच्या पाठिंब्यावर नितीशकुमार यांचं सरकार आहे. नितीशकुमार सरकारनेही हीच भूमिका घेतली आहे असंही पवार यांनी सांगितलं.