खासदार हुसेन दलवाई यांची मागणी

राजापूर : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या स्वाक्षरीचा रिफायनरी रद्द करण्याचा अध्यादेश घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधावा असे आवाहन काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केले. यावेळी त्यांनी विनाशकारी प्रकल्प आणून कोकण उद््ध्वस्त करण्याचा घाट शासनाने घातला असून तो कधीही खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. काँग्रेस प्रकल्पग्रस्तांच्या पाठिशी ठाम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या सूचनेनुसार खासदार श्री. दलवाई यांच्या नेतृत्वाखाली आज  काँग्रेसचे  शिष्टमंडळ नाणार प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधण्यासाठी आले आहे. त्यांनी आज दुपारी दत्तावाडी आणि पडवे येथे लोकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शासनाच्या भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना त्यांनी शासनाच्या भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते हरीष रोग्ये, आमदार हुस्नबाबू खलिफे, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, माजी आमदार रमेश कदम, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश किर, माजी तालुकाध्यक्ष जयवंत दुधवडकर, प्रभारी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, यशवंत बाणे, युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद मोहरकर, रिफायनरी विरोधी समितीचे अध्यक्ष ओंकार प्रभूदेसाई, मजीद भाटकर आदी उपस्थित होते.

निसर्गसंपदेने सधन झालेल्या कोकणामध्ये विनाशकारी प्रकल्प आणून नेमके शासनाला काय साधायचे आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रकल्प उभारणीला लोकांचा विरोध असताना प्रकल्प रेटून नेण्यामागची शासनाची नेमकी भूमिका काय असाही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी त्यांनी प्रकल्पासंबंधित भूमिकेवरून सत्ताधारी शिवसेनेला चांगलेच टार्गेट केले. विनाशकारी प्रकल्पांपासून कोकण वाचविण्यासाठी सुरू असलेल्या भूमिपुत्रांच्या लढय़ाच्या पाठिशी काँग्रेस ठाम असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी प्रदेश प्रवक्ते श्री रोग्ये, माजी आमदार श्री. चव्हाण, आमदार सौ. खलिफे, काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा प्रभारी विश्वनाथ पाटील यादी आदींनी मनोगत व्यक्त केली. तर नाणारचे सरपंच ओंकार प्रभूदेसाई, रूपेश अवसरे, अंकुश कांबळे आदी प्रकल्पग्रस्तांनी मनोगते व्यक्त करताना प्रकल्प रद्दच करावा अशी मागणी केली.