वर्धा जिल्हा करोनामुक्त असण्याच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांच्या पाचशेपेक्षा अधिक ट्रकचालक व त्यांच्या सहकाऱ्यांची सीमेवरच आरोग्य तपासणी केल्या जात आहे.

सुदैवाने जिल्ह्यात आतापर्यंत एकही व्यक्ती करोनाबाधीत आढळली नसली तरी खबरदारी म्हणून प्रशासनाने जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या वाहनधारकांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे.  जिल्ह्यालगत असणाऱ्या अमरावती, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्ये करोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. वर्धा जिल्ह्यात भाजी व फळांची मोठ्या प्रमाणात आवक होते. मालवाहू ट्रकचालक व त्यांचे ट्रकमधील दोन-तीन सहकारी अशा जवळपास पाचशे पेक्षा जास्त व्यक्तींची चेकपोस्टवरच आरोग्य तपासणी करणे सुरू झाले आहे.

दहा तपासणी पथकात डॉक्टर, आरोग्यसेवक, नर्स अशा ९५ लोकांचा सहभाग आहे. पुलगाव, आष्टी, आर्वी, नागपूर, हिंगणघाट या थांब्यावर आरोग्य पथकाने वाहतूकदार, भाजी उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. तसेच ही वाहतूक व विक्रेत्यांची गर्दी कमी करण्यासाठी सोमवारी व मंगळवारी भाजी,फळं तसेच मांस विक्री बंद ठेवण्यात आल्याचे प्रशासनाने आज स्पष्ट केले.