राज्यातले काँग्रेसचे सर्वच उमेदवार ‘आदर्श’ आहेत. विविध घोटाळ्यात ते अडकले आहेत, अशी तिरकस टीका नरेंद्र मोदी यांनी केली. नांदेडच्या सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. आदर्श प्रकरणात अडकलेल्या अशोकराव चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेसने उशिराने घेतला. त्यांना उमेदवारी दिल्यानंतर झालेल्या पहिल्याच सभेत राज्यात भाजपचा मुद्दा ‘आदर्श’ प्रकरण असेल, असे संकेत देण्यात आले.
चव्हाण यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले, भारतीय संस्कृतीत बहिणीला किंवा मुलीला फसवण्याचा उद्योग होत नाही, पण माजी मुख्यमंत्र्यांनी चक्क बहिणीच्या नावावर लुटण्याचा उद्योग केला. बहिणीला तर फसवलेच, पण कारगिल युद्धातील शहिदांच्या विधवांनाही लुटले आहे. दिवसरात्र एक करून सीमेवर गस्त घालणाऱ्या जवानांच्या प्रती काँग्रेसची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे, असा आरोप त्यांनी केला. ज्यांनी देशाच्या जवानांच्या प्रती असंवेदनशीलता दाखवली. त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा फायदा स्वत: घेतला. अशांना माझे सरकार आल्यावर कधीच सोडणार नाही, असेही ते म्हणाले.
३० मिनिटांच्या भाषणात मोदी म्हणाले की, आमदार, खासदार यांच्यावर आरोप असलेली प्रकरणे एका वर्षांत निकाली काढण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येईल. जे निर्दोष असतील, ते सुटतील पण जे भ्रष्टाचार करतील त्यांचे उर्वरित आयुष्य कारागृहात असेल असे सांगून राजकारणाचे शुद्धीकरण करताना आपण पक्षीय भेदभाव करणार नाही, असे ते म्हणाले. ज्यांनी देशाला लुटले, गरिबांच्या तोंडचा घास पळवला, तिजोरी लुटली, अशांना राजकारणात स्थान असणार नाही. जसे जसे मतदान जवळ येत आहे, तसे तसे हे वारे सुनामीमध्ये बदलतील आणि भ्रष्टाचारी काँग्रेस व त्यांचे सहकारी त्यात गाडले जातील, असा दावा त्यांनी केला.