पुन्हा आगी लागण्याचे प्रकार सुरू
वसई: मागील आठवडाभरापासून जंगलाला आगी लागण्याचे प्रकार थांबले होते. परंतु पुन्हा एकदा आगी लागण्याचे प्रकार सुरू झाल्याचे चित्र दिसून आले आहे. नायगाव पूर्वेतील चंद्रपाडा येथील चंडिका मातेच्या डोंगराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे.
नायगाव पूर्व येथे डोंगरावर चंडिका माता मंदिर परिसर आहे. याच डोंगर भागाला लागून मोठ्या प्रमाणात जंगल पट्टा आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक पणे या डोंगराला आग लागल्याने खळबळ उडाली होती. सुरवातीला आग एकदम किरकोळ होती. परंतु सुकलेले गवत , पालापाचोळा यामुळे आगीने अधिक पेट घेतला होता. त्यामुळे अधिक प्रमाणात क्षेत्र आगीने वेढले होते. या डोंगराला लागूनच नागरिकांची मोठी वस्ती असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आग ही उंचावर असल्याने त्या आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण जात असून आजूबाजूचे नागरिक जागे राहून याकडे लक्ष ठेवून आहेत. लागलेली आग ही कोणीतरी लावली असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. तसेच आज संध्याकाळी पाझर तलाव येथील डोंगरात ही आग लागल्याची घटना घडली आहे.