News Flash

पालघरमधील हुतात्मा स्तंभाची दुरवस्था

१९४२च्या स्वातंत्र्यलढय़ात शहीद झालेल्या पालघर तालुक्यातील पाच हुतात्म्यांच्या बलिदानाची साक्ष देणाऱ्या पालघर शहरातील हुतात्मा स्तंभाची दुरवस्था झाली आहे.

देखभाल दुरुस्तीची मागणी करूनही त्याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

स्वातंत्र्यलढय़ातील पाच शहिदांचा नगरपरिषदेला विसर

लोकसत्ता वार्ताहर

पालघर : १९४२च्या स्वातंत्र्यलढय़ात शहीद झालेल्या पालघर तालुक्यातील पाच हुतात्म्यांच्या बलिदानाची साक्ष देणाऱ्या पालघर शहरातील हुतात्मा स्तंभाची दुरवस्था झाली आहे. देखभाल दुरुस्तीची मागणी करूनही त्याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढय़ात पालघर शहराच्या केंद्रस्थानी मोठा उठाव झाला होता. या आंदोलनादरम्यान सध्या हुतात्मा स्तंभ असलेल्या ठिकाणी पाच जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पालघर ग्रामपंचायतीमार्फत १९५० मध्ये हुतात्मा स्तंभाची निर्मिती करण्यात आली. भारताच्या राष्ट्रध्वजाचा रंग या स्तंभाला वरील बाजूस देण्यात आला असून पाच हुतात्म्यांच्या प्रतिकृती तसेच तत्कालीन ठाणे जिल्ह्यच्या नकाशाची प्रतिकृती व शहीद हुतात्म्यांची माहिती या स्तंभाभोवती कोरण्यात आली आहे.

स्तंभाभोवती असलेल्या प्रतिकृतीचा रंग उडत चालला आहे. त्यांच्या आवरणाचे  खपले उडत आहेत. येथे असलेल्या भारताच्या नकाशाच्या प्रतिकृतीचाही  रंगही पुसट होत चालला आहे.  नकाशा विद्रूप दिसत आहे.  स्मारकवर ढीगभर धूळ साचली आहे,  स्तंभावर पक्ष्यांची विष्ठा पडून तो विद्रूप झाला आहे. पाया असलेल्या ठिकाणी उभारलेल्या दगडसदृश आवरणाचा भाग ठिकठिकाणी निघून पडला आहे.त्यातून विद्युत तारा बाहेर पडल्या आहेत.   नगरसेवक चंद्रशेखर वडे यांनी हुतात्मा स्तंभ रोज साफसफाई व देखभाल दुरुस्ती करण्याबाबतचे पत्र नगरपरिषदेला तीन महिन्यांपूर्वी दिले होते.  परिषदेच्या अनेक सभा झाल्या असल्या तरी या पत्राची दखल घेतली गेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

दरवर्षी १४ ऑगस्टला हुतात्म्यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो.  त्यावेळी स्तंभाची साफसफाई करण्यात येते. त्यानंतर मात्र स्तंभ दुर्लक्षित राहतो.

१९४२ च्या स्मृती

इंग्रज साम्राज्याशी लढा देण्यासाठी पालघर तालुक्यात १४ ऑगस्ट १९४२ रोजी उठाव झाला होता.या उठावामध्ये पालघर तालुक्यातील सातपाटीचे काशिनाथ हरी पागधरे, नांदगावचे गोविंद गणेश ठाकूर ,पालघरचे रामचंद्र भीमाशंकर तिवारी ,मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी ,शिरगावचे सुकुर गोविंद मोरे हे हुतात्मे स्वातंत्र्यासाठी इंग्रजाशी लढा देताना शहीद झाले. या शहिदांची स्मृती म्हणून पालघर शहरामध्ये हुतात्मा चौक उभारलेला आहे.

हुतात्म्यांच्या बलिदानाची साक्ष देणारा हा स्तंभ जिल्ह्यची नव्हे तर महाराष्ट्राची शान आहे. त्याची दुरवस्था झाल्याने मान शरमेने झुकवावी लागण्याची वेळ ओढवली आहे. संबंधित प्रशासन याला जबाबदार असून हा स्तंभ तातडीने दुरुस्त करावा.

– शिवकांत दीक्षित, नागरिक,पालघर

पालघर शहरातील हुतात्मा स्तंभाच्या नूतनीकरणासाठी नव्याने प्रस्ताव तयार होत आहेत.  सभेची मान्यता घेऊन नूतनीकरण करण्यात येईल.

-प्रशांत पवार, अभियंता,बांधकाम विभाग, नगर परिषद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 2:13 pm

Web Title: hutatma stambh in bad condition at palghar dd70
Next Stories
1 एकाच दिवशी दोन पदांवर नियुक्ती
2 शिवेंद्रराजेंच्या जाहीर धमकीवर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
3 हिंदुत्व भाजपाची मक्तेदारी नाही म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
Just Now!
X