करोना प्रादुर्भावामुळेमुळे जलसंपदाच्या निधीस कात्री लागली असली, तरी केंद्राच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जलसंजीवनी या दोन योजनांतून निधी उपलब्ध होत आहे. यामुळे पाटबंधारे प्रकल्पांची कामे मार्गी लागणार आहेत. यासाठी कोणतेही कर्ज काढण्याची आवश्‍यकता नाही, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, “साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्‍न मिटला आहे. त्या जागेच्या बदल्यात खावलीची जागा पाटबंधारे परत घेणार आहे. त्यावर पाटबंधारे विभागाची कार्यालये स्थलांतरित केली जातील असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

कृष्णा खोऱ्याची साताऱ्यातील जमीन वैद्यकीय महाविद्यालयास देण्यात आली आहे. या दिलेल्या जमिनीच्या बदल्यात खावली येथील महसूल विभागाची जमीन कृष्णा खोऱ्याकडे हस्तांतरित केली जाणार आहे. या जमिनीची पाहणी, जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जलसंपदामंत्री पाटील आज इस्लामपूरकडे जाताना काही काळ साताऱ्यात थांबले, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाविद्यालयासाठी दिलेल्या जागेवर पाटबंधारे विभाग, लघुपाटबंधारे व कार्यशाळा ही जलसंपदा विभागाची कार्यालये आहेत. ही कार्यालये आता खावली येथील जागेत स्थलांतरित करावी लागणार आहेत. या कार्यालयांच्या इमारतींचा आराखडा तयार करण्यात येणार आहे, याची माहिती घेतल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.