चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचे दूरमागी परिणामी होतील, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

राज्य मंत्रिमंडळाने आज या संदर्भातील निर्णय घेतला. कोरोना काळात राज्यातील आरोग्याच्या स्थितीवर लक्ष देणे सोडून महाविकास आघाडी सरकारच्या प्राथमिकता काय आहेत, हेच या निर्णयातून दिसून येते. त्यामुळेच हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा- चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठवली, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!

गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्व महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधली दारूबंदी चर्चेचा विषय ठरली होती. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आलेली दारूबंदी उठवण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. अखेर राज्य सरकारने त्यासंदर्भातला निर्णय घेतला असून चंद्रपूर जिल्ह्यामधली दारूबंदी उठवण्यात आली आहे. गुरुवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. दारूबंदी उठवण्याला अनेक सामाजिक संघटनांचा विरोध देखील होता. मात्र, दारुबंदीनंतर अवैध दारू विक्री आणि त्याअनुषंगाने गुन्हेगारी घटना वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे जवळपास ३ लाख निवेदने देखील आली होती.

आणखी वाचा- लोकजागर : मोहफुलांची ‘मुक्ती’!

दरम्यान, यासंदर्भात माध्यमांना माहिती देताना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना आपली भूमिका मांडली आहे. “दारूबंदी लागू केल्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू सेवन आणि त्याची विक्री वाढली होती. तरुण वर्ग त्याच्या आहारी जाऊ लागला होता, तर महिला-लहान मुले या व्यवसायात उतरले होते. परिणामी जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीमध्ये वाढ होऊ लागली होती. यासंदर्भात सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार दारुबंदी करण्यात आली आहे”, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.