प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाने महाराष्ट्र पोलीस दलातील ५७ अधिकारी, अंमलदारांची शौर्य पदकासाठी, उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांसाठी आणि गुणवत्तापूर्ण सेवेप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पोलीस पदकासाठी निवड केली. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

“शौर्य, कर्तबगारीमध्ये महाराष्ट्र पोलीस नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळेच आपल्या पोलिसांनी गणराज्यदिनी १३ शौर्य पदके, विशेष सेवेची ४ पदके तर गुणवत्तापूर्ण सेवेबद्दलची ४० पदके पटकावली आहेत. खास सेवेसाठी एकूण ५७ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाले आहे.” असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

तसेच, “पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख नात्याने या सर्वांचा मला सार्थ अभिमान वाटतो. सर्व सन्मानित पोलीस अधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन! त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!” असं म्हणत त्यांनी पदक मिळवणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन देखील केलं आहे.

राज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभात कुमार, ‘फोर्स वन’चे अतिरिक्त महासंचालक सुखविंदर सिंह आणि पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांचा पदक विजेत्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे.