एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत त्यांची भूमिका मांडली आहे. “मनसे आणि शिवसेना हे दोन पक्ष औरंगाबादचं नामांतर होईल असं म्हणत आहेत. शिवसेनेचे माजी खासदार तर कुठल्याही क्षणी औरंगाबादचं नाव बदलून संभाजी नगर करण्यात येईल असं म्हणत आहेत. मात्र या दोन्ही पक्षांना माझा एक सल्ला आहे, आधी शहराच्या विकासासाठी काम करा. पुढच्या चार वर्षात शहराचा विकास करुन दाखवा. संभाजी महाराज हे महापुरुष होते. त्यांचं नाव द्यायचं असेल तर आधी शहराचा विकास करा. त्यानंतर नाव बदलण्यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ” औरंगबादमध्ये जलील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, ” इथल्या कट्टर शिवसैनिकांना विचारा की त्यांना औरंगाबादचं नाव बदलायचं आहे की विकास करायचा आहे? संभाजी महाराजांचं नाव औरंगाबादला देण्याच्या गोष्टी करणाऱ्या शिवसेना आणि मनसेने चार वर्षात शहराचा विकास करुन दाखवावा. तुम्ही कचरामुक्त शहर करुन दाखवा, विकास घडवून दाखवा. तसंच केल्यास मी स्वतः तुम्हाला नामांतरासाठी साथ देईन

औरंगाबादचे नाव बदलून संभाजी नगर असे होईल असे मी ३२ वर्षांपासून ऐकतो आहे. निवडणूक जवळ आली की हा मुद्दा उपस्थित केला जातो. आता महानगरपालिकेची निवडणूक येते आहे. त्यामुळेच नामांतराची मागणी केली जाणार हे २०० टक्के माहित होतं. कचरा, आरोग्य, शिक्षण हे शहरातले मुख्य प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी शिवसेना, मनसे प्रयत्न करणार आहेत का? असाही प्रश्न जलील यांनी विचारला आहे. शहराचं नाव बदलण्याची मागणी लोकांमध्ये आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असाही आरोप इम्तियाज जलील यांनी केला. चंद्रकांत खैरेंसारख्या लोकांना काही काम उरलं नाही. त्यामुळे ते असे मुद्दे पुढे करत आहेत. तुमच्या हाती सत्ता आहे त्यामुळे जे करायचं ते करा असंही जलील यांनी स्पष्ट केलं.

औरंगाबादचं नाव बदलून संभाजी नगर ठेवायचं अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. एवढंच नाही तर मनसेनेही हीच भूमिका हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा औरंगाबाद दौऱ्यावर आले तेव्हा संभाजी नगर असा उल्लेख असलेले बॅनर उभारण्यात आले होते. तसंच राज ठाकरेंनीही औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर केलं तर त्यात गैर काय असा प्रश्न विचारला होता. आता इम्तियाज जलील यांनी याबाबत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.